सिद्धू मुसेवालाची आई 58 व्या वर्षी गरोदर, IVF द्वारे पालक होण्याचा निर्णय
बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (13:50 IST)
पंजाबी पॉप गायक शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवालाची 2022 मध्ये हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्याच्या आई-वडिलांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला असून सिद्धू मुसावालाची आई चरण कौर या 58 व्या वर्षी गरोदर आहेत.
बीबीसीचे सहकारी सुरिंदर मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाची आई गरोदर असल्याच्या वृत्ताला कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
त्यांच्या मते, सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर या वर्षी मार्चमध्ये बाळाला जन्म देतील.
कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळाचा जन्म होईल.
सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत.
मुसेवाला दाम्पत्य हे उतारवयात आई-बाबा होणार असल्यामुळे काही माध्यमांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. त्याबाबत बीबीसी प्रतिनिधीने त्यांना प्रतिक्रिया विचारली असता मुसेवाला कुटुंबाने सांगितलं की ही त्यांची वैयक्तिक आणि कौटुंबिक बाब आहे. त्यांना याबद्दल अधिक माहिती द्यायची नाहीये.
28 वर्षीय सिद्धू मुसेवालाला गायक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळाली होती. 29 मे 2022 रोजी भरदिवसा त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. ही घटना मनसा जिल्ह्यातील जवाहरके गावात घडली.
15 मे 2020 रोजी सिद्धू मुसेवालाने त्याच्या आईसाठी समर्पित असं 'डिअर ममा' गाणं रिलीज केलं होतं.
आईच्या वाढदिवसानिमित्त त्याने हे गाणं रिलीज केलं होतं. या व्हिडिओमध्ये सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर आणि वडीलही दिसत होते.
या गाण्याचे बोल होते, 'माँ माँ लाला रहे में जमा तेरे वरगा आं'. यूट्यूबवर रिलीज झालेलं हे गाणं आतापर्यंत 143 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलंय.
आईने लढवली होती सरपंच पदाची निवडणूक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धू मुसेवालाची आई 58 वर्षांची असल्याचं सांगितलं जातंय.
2018 मध्ये त्यांनी मानसा जिल्ह्यातील मुसा गावातून सरपंच पदासाठी निवडणूक लढवली होती आणि त्यात त्या विजयी झाल्या होत्या.
सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर यांनी मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या गोष्टींसंबंधी जाहीर वक्तव्यं केली हो
2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू मुसेवालाने काँग्रेस पक्षाकडून मनसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून त्याचा पराभव झाला.
आयव्हीएफ तंत्रज्ञान काय आहे?
जेव्हा नैसर्गिक गर्भधारणा होत नाही किंवा गर्भधारणेच्या इतर सर्व पद्धती अयशस्वी होतात तेव्हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आयव्हीएफ तंत्राची सुरुवात 1978 मध्ये झाल्याची माहिती डॉ. नयना पटेल यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
गुजरातमधील आकांक्षा हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैद्यकीय संचालक डॉ. पटेल म्हणाल्या, "आयव्हीएफचा वापर अशा महिलांसाठी केला जातो ज्यांच्या गर्भनलिका (फॅलोपिअन ट्युब) संसर्गामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब झाल्या आहेत."
त्यांनी सांगितलं की, अशावेळी भ्रूण तयार करण्यासाठी अंडी आणि शुक्राणू यांचं मिलन केलं जातं. ही प्रक्रिया प्रयोगशाळेत केली जाते.
जेव्हा हे भ्रूण तयार होतं तेव्हा ते संबंधित महिलेच्या गर्भाशयात सोडलं जातं. पटेल सांगतात की, या तंत्रज्ञानामुळे अनेक जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळाला असून अनेक महिलांवरील वंध्यत्वाच्या अडचणीवर मात झाली आहे.
कायद्याने निश्चित केलेली वयोमर्यादा
भारतामध्ये 2021 साली सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान (एआरटी) कायदा लागू झाला. डॉ. सुनिता अरोरा या दिल्लीतील ब्लूम आयव्हीएफ केंद्रातील आयव्हीएफ तज्ज्ञ आहेत.
या विषयावर त्यांनी बीबीसीशी संवाद साधला. डॉ. सुनीता अरोरा सांगतात, या कायद्यानुसार आईचं कमाल वय 50 आणि वडिलांचं वय 55 वर्ष असावं.
डॉ. अरोरा म्हणतात, "हे वय निश्चित करण्याचं एक कारण म्हणजे मुलांच्या संगोपनाचा प्रश्न. समजा मूल 15 -20 वर्षांचे झाले आणि आई-वडील 70 वर्षांचे झाले तर ते त्याची काळजी कशी घेतील? पण सर्वांत मोठं कारण म्हणजे पन्नाशीनंतर आई होणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही."
त्या सांगतात की, "आम्ही 45 वर्षांवरील आयव्हीएफ प्रकरणांमध्ये महिलांच्या आरोग्याकडे खूप लक्ष देतो. कारण गरोदरपणात हृदयावरील दाब वाढतो आणि रक्तदाबही सातत्याने वर-खाली होत असतो. काही वेळा स्त्रिया असे बदल सहन करण्याच्या स्थितीत नसतात."
डॉ. पटेल ही सांगतात की, उतारवयात आयव्हीएफचा अवलंब करू नये. परंतु काही प्रकरणांमध्ये एक-दोन वर्षांची सूट मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे.
उदाहरण देताना त्या म्हणतात, "जर पत्नीचं वय 40-45 वर्ष आणि पतीचं वय 56 वर्षं असेल किंवा पत्नीचं वय 51 वर्ष आणि पतीचं वय 53 वर्ष असेल, तर फिटनेसच्या आधारावर आयव्हीएफची शिफारस करता येऊ शकते.
यात बाळ होण्याची हमी आहे का?
यावर डॉ. नयना पटेल सांगतात की, 35 वर्षांखालील महिलांच्या बाबतीत 80 टक्के हमी असते.
जर महिलेचं वय 35 ते 40 दरम्यान असेल तर मूल होण्याची शक्यता 60 टक्क्यांपर्यंत असते. आणि जर वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर केवळ 18 ते 20 टक्के प्रकरणं यशस्वी होताना दिसतात