प्रेषिता मोरे : ढोलकीवर कडकडून थाप देणाऱ्या नाजूक हाताची गोष्ट

रविवार, 1 जानेवारी 2023 (16:19 IST)
social media
“घरातले डबे काढून वाजवायचे, माठ वाजवायचे, जे हाताला सापडेल ते वाजवायचे. लहानपणापासूनच हायपर अॅक्टिव्ह होते,” बदलापूरची प्रेषिता आपल्या ढोलकीवादनाबद्दल सांगत असते.
तुम्ही ढोलकीच्या तालावर थिरकरणाऱ्या मुलींचे पाय पाहिले असतील. पण ढोलकीवर कडकडीत थाप देणारा नाजूक हात क्वचितच पाहिला असेल.
 
खरं मुली आजकाल अनेक वाद्यं वाजवताना दिसतात पण ढोलकीच्या क्षेत्रात आजही पुरुषांचाच दबदबा आहे. पण मुंबईच्या प्रेषिता मोरेने स्वतःचा रस्ता स्वतः निवडून ढोलकीवादनाच्या क्षेत्रात एक वेगळं स्थान तयार केलं आहे.
 
ढोलकीचं वेड प्रेषिताला घरातच मिळालं. तिचे आजोबा ढोलकी वाजवायचे.
 
“आजोबा ढोलकी वाजवात होते. म्हणजे माझ्याही जन्माच्या आधीची गोष्ट आहे ही. मलाही नंतर कळलं. शाळेत असताना मी हायपर अॅक्टिव्ह होते, खूप एनर्जी होती. मग लोकांनी सल्ला दिला की हिला कशात तरी गुंतवा. घरच्यांनाही वाटलं की हिला काहीतरी करायला दिलं पाहिजे. मग आजोबांनीच पुढाकार घेतला.”
 
प्रेषिताचे आजोबा तिला आपल्या मित्राकडे घेऊन गेले. ते मित्र तालवाद्य वाजवायला शिकवायचे.
 
त्या दिवसाचा किस्साही रंजक आहे.
 
“माझे गुरूजी आहेत जिथे मी पहिल्यांदा गेले, ते माझ्या आजोबांचे मित्र. तिथे गेल्यावर माझ्या आजोबांनी सांगितलं की ही माझी नात आहे, तालाची चांगली समज आहे तिला तर तू शिकव. बघुया पुढे काय करू शकते ते.”
 
प्रेषिता पहिल्यांदा गेली त्या दिवशी नुकतेच त्यांचे क्लासेस सुटले होते आणि सगळे इंन्स्ट्रुमेंट हॉलमध्ये पडले होते.
ती म्हणते, “सरांनी सांगितलं की ते तबला आहे तिथे जाऊन तू वाजव. प्रोफेशनली काही येत नव्हतं, पण ऐकून ऐकून जे येत होतं ते वाजवलं. ते वाजवल्यावर त्यांनी उठवलं. म्हणे उठ तिथून. ते थोडं इन्सलटिंग वाटलं की आपल्याला काय काहीच करता येणार नाही आयुष्यात. आजच उठवलं पहिल्या दिवशी...म्हणजे पुढे काही शक्यच नाही आपल्याकडून. पण शेजारी ढोलकी होती. त्यांनी मला तिथे बसायला सांगितलं आणि म्हणाले की तू आता जे काही वाजवलंस ते ढोलकीवर वाजव. माझं वाजवून झाल्यावर म्हणाले तू तबला वगैरे नको करू, ढोलकी कर, ते तुला जास्त चांगलं जमेल.”
 
तेव्हापासून प्रेषिताच्या हातात ढोलकी आली ती आजतागायत आहेच. गेली 7-8 वर्षं प्रेषिता व्यावसायिकरित्या वादन करतेय आणि इतरही अनेक तालवाद्य वाजवते. तिने कलर्स, झी मराठी सारख्या चॅनल्सच्या वाद्यवृदांतही काम केलंय. तिच्यासारख्या अनेक मुलींसोबत एकत्र येत तिने फक्त मुलींचा खास ऑर्केस्ट्राही स्थापन केलाय.
अर्थात हा प्रवासही तिच्यासाठी सोपा नव्हता. तिला घरच्यांच्या पाठिंबा होता पण शेजारी, नातेवाईकांकडून अनेकदा टोमणेही सहन करावे लागले.
 
ती सांगते, “आमच्या चाळीत एक आजी राहायच्या वरच्या मजल्यावर. त्यांना कळलं तेव्हा खास घरी आल्या आणि म्हणाल्या हे असलं काही करू नको तू. असलं मुली वाजवत नाहीत. त्याच्या हाताची चव जाते. मला फारच गंमत वाटली. मी काय करते, त्यापेक्षा माझ्या हाताला चव आहे की नाही, पर्यायाने मला लग्नाच्या बाजारात किंमत आहे की नाही याची त्यांना काळजी होती.”
 
“कॉलेजमध्येही अनेकदा मुलं चिडवायची. कोणी म्हणायचं, इसके साथ शादी करेगा उसका का क्या होगा, रोज मारेगी उसे.”
 
कार्यक्रम सुरू करायला लागल्यानंतरही अनेकदा प्रेषिता स्टेजवर वाद्यवृंदामध्ये एकटीच मुलगी असायची. एवढ्याशा मुलीला ढोलकी वाजवता येते यावरही कोणाचा विश्वास बसायचा नाही.
 
“असे अनुभव अनेकदा आले की कार्यक्रमाचे संयोजक मला सीरियसली घ्यायचे नाहीत किंवा स्टेजवर ढोलकी घेऊन जात असताना कोणीतरी खालून कमेंट पास करायचं की हिला ढोलकी पेलवत नाही आणि ही वाजवणार काय?”
 
पण आता परिस्थिती बदलली आहे. आता प्रेषिताचं कौतुक होतं. अनेक मुली आणि त्यांचे आईवडील तिच्याकडे प्रेरणा म्हणून पहातात.
 
त्याचा एक किस्सा ती सांगते.
“शो संपल्यानंतर तसे बरेच लोक भेटायला येतात. घोळका असतो. एकदा काय झालं स्टेजवरून उतरताना मला दिसलं की एक काकू खूप वेळ झाला फक्त माझ्याकडेच पाहात होत्या. आसपास बराच गोंधळ होता. फोटो वगैरे काढून झाल्यावर मी त्यांच्याकडे गेले आणि विचारलं की काय काकू काय झालं? बराच वेळ बघताय? त्या म्हणाल्या, मी तुझ्याकडे बघत होते.  माझी मुलगी पण बरेच दिवस संगीत क्षेत्रात येण्यासाठी म्हणत होती. तिची आवड होती पण मी तिला हे काहीच करू दिलं नाही कारण माझ्या डोक्यात इतकंच होतं की मुली या क्षेत्रात नाहीच. आता तुझ्याकडे बघून असं वाटलं की तू जर हे करू शकतेस तर मी माझ्या मुलीला का नाही करू देऊ शकत?”
 
प्रेषिताचं कौतुक होत असलं तरी आजकाल तिला एक खंतही आहे. फक्त मुलगी आहे म्हणून कौतुक करू नका असं ती म्हणते.
 
“हल्ली मला खूप वाटायला लागलंय की मुलगी आहे तरी ढोलकी वाजवतेय म्हणून तुम्ही कौतुक करताय. पण त्यापेक्षा मी माझं काम चांगलं करतेय यासाठी कौतुक करत असाल तर ते खूप जास्त आवडेल.”
 
प्रेषितासाठी संगीतच सगळं काही आहे. तिला हे जग सोडतानाही ते सोबत घेऊन जायचं आहे. त्यासाठी तिने खास टॅटू करून घेतला आहे.
 
“माझ्या हातावरचा टॅटू म्हणजे एक म्युझिक इंस्ट्रुमेंट आहे आणि याच्याबाजूला नोटेशन्स केलेत. याच्या मागचा हेतू हाच की जेव्हाही मी हे जग सोडेन, तेव्हा माझ्यासोबत संगीत शेवटपर्यंत असेल.”

Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती