जगातील सर्वात लांब नखे कापली

शुक्रवार, 13 जुलै 2018 (08:56 IST)
जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम नावावर असलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद असलेल्या श्रीधर चिल्लाल यांनी अखेर नखे कापली आहेत. 2015 मध्ये हा विक्रम त्यांनी नोंदवला होता. चिल्लाल यांनी वयाच्या 14 व्या वर्षी नखं वाढवण्याचा निर्णय घेतला. शाळेत असताना एका शिक्षकाचे नख श्रीधर यांच्यामुळे तुटले होते. त्यावेळी शिक्षकांनी रागवत त्यांनी म्हटले होते की, मी या नखाची किती काळजी घेतली होती, हे तुला समजणार नाही. या घटनेनंतर श्रीधर यांनी डाव्या हाताची नखं वाढवण्यास सुरुवात केली. 
 
श्रीधर यांनी १९५२ सालापासून आपल्या हाताची नखे कापलीच नव्हती. त्यांनी नखे कापली तेव्हा सर्व बोटांची मिळून नखांची लांबी ही ९०९.६ सेंटी मीटर इतकी होती. चिल्लाल यांच्या अंगठ्याचे नख सर्वात लांब असून त्याची लांबी १९७.८ से.मी इतकी होती. तर तर्जनी बोटाच्या नखाची लांबी १६४ से.मी, मधले बोटची १८६.६ से.मी, अनामिका बोटची १८१.६ से.मी आणि करंगळीच्या नखाची लांबी १७९.१ से.मी इतकी होती. तब्बल ६६ वर्षांनंतर त्यांनी आपली नखे कापली आहेत. आता श्रीधर यांचीही नखे न्यूयॉर्कच्या टाईम्स स्व्केरमधील रिपले’स बिलिव्ह इट ऑर नॉट येथे प्रदर्शनासाठी देखील ठेवण्यात येणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती