गिनीज बुक ऑफ वर्ल्ड, यूएमसीए रेकॉर्ड्स मध्ये होणार नोंदणी

बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (08:54 IST)
नाशिक सायकलीस्ट डॉ. महेंद्र महाजन यांचा काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर 12 दिवसात पूर्ण करण्याचा मानस 
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड, यूएमसीए रेकॉर्ड्स मध्ये होणार नोंदणी
 
नाशिक : नाशिककर सायकलीस्ट बंधूपैकी डॉ. महेंद्र महाजन एका विश्वविक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत असून काश्मीर ते कन्याकुमारी हे 4000 किमीचे अंतर केवळ 12 दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. वेगवान सायकलिंगचा विक्रम करण्यासाठीच्या या मोहिमेस ‘के टू के सायकलिंग चॅलेंज’ असे नाव देण्यात आले आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड, यूएमसीए रेकॉर्ड्स मध्ये याची नोंद घेण्यात येणार आहे. 
 
महाजन बंधू फाउंडेशन आणि नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन आणि जायंट स्टारकेन यांच्यातर्फे आयोजित या मोहिमेत 'खेलो इंडिया' आणि 'तंबाखू बंद' या उपक्रमांना समर्थन करण्यात येणार आहे. केवळ अभ्यास करूनच करिअर बनवता येते हा समज काढून पालकांनी आपल्या पाल्यांना खेळामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे असा संदेश या मोहिमेदरम्यान देण्यात येणार आहे. तर केवळ आरोग्य विषयी जागरूक लोकच मजबूत राष्ट्र निर्माण करू शकतात, या उक्तीप्रमाणे तंबाखू बंद (Quit Tobacco) या अभियानाला समर्थन करणार असल्याची माहिती आज (दि. 9) झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. महेंद्र महाजन यांनी यावेळी दिली. यावेळी डॉ. हितेंद्र महाजन, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, ज्येष्ठ सायकलीस्ट मोहिंदर सिंग भराज आदी उपस्थित होते.
 
टूर ऑफ ड्रॅगन, रेस अॅक्रॉस अमेरिका त्यानंतर भारतात गोल्डन क्वाड्रीलेटरल मोहीम असे प्रत्येकवेळी वेगळे उपक्रम राबवून सायकलिंगचा प्रचार प्रसार आणि त्याद्वारे समाजोपयोगी उपक्रम लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम महाजन बंधू करत आहेत. या मोहिमेत देखील डॉ. महाजन यांची जर्सी, सायकल आणि सोबत करणारी वाहनांवर हे संदेश असणारे फलक लावण्यात येणार आहेत.
 
दोन नोव्हेंबर 2018 रोजी लाल चौक, श्रीनगर येथून ही मोहीम सुरु होणार पुढे श्रीनगर, उधमपूर, पठाणकोट, दशुआ, होशियारपूर, अंबाला, दिल्ली बायपास (पूर्व परिधीय महामार्ग), आग्रा, ग्वाल्हेर, झाशी, सागर, छिंदवाड, नागपूर, आदिलाबाद, कामारेड्डी, हैदराबाद, कुर्नूल, अनंतपुर, बंगळूरू, कृष्णागिरी, सेलम मदुराई,तिरुनेलवेली मार्गे कन्याकुमारी समुद्रकिनारा (विवेकानंद स्मारक) येथे मोहिमेचा समारोप होणार आहे. 
 
या वेगवान सायकल प्रवासात भारताच्या जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या 12 राज्यातून प्रवास होणार आहे. या मोहिमेदरम्यान झेलम, चेनाब, तावी, बीस, सतलज, यमुना, चंबळ, नर्मदा, पेनगंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या पार कराव्या लागणार आहेत. तर हिमालय, विंध्याचल, चंबळ, सातपुडा या महत्वाच्या भारतीय पर्वत रंगातून हा रोमहर्षक वेगवान सायकल प्रवास घडणार आहे. विशेष म्हणजे रस्त्याने प्रवास करण्यासाठी खडतर मानला जाणाऱ्या चंबळ खोऱ्याचाही या सायकलिंग मार्गात समावेश आहे. मात्र मी संबंध भारतातील अनेक लोकांना भेटण्यासाठी आणि आपल्या स्वत: च्या देशाला उत्तरे पासून दक्षिणेकडे पाहण्याचा एक चांगला मार्ग म्हणून एक अद्भुत संधी म्हणून या मोहिमेकडे बघत असल्याचे डॉ. महाजन म्हणाले. 
 
मोहीम सुरू करताना काश्मीर खोऱ्यातील रात्रीचे तपमान 2 ते 5 डिग्री सेन्सिअस पर्यंत खाली घसरले असेल. तर मध्य आणि दक्षिण भारतात दिवसाचे कमाल तपमान40 डिग्री सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता आहे. मात्र अशा खडतर नैसर्गिक आव्हानांशी चार हात करण्याची तयारी असून गोल्डन क्वाड्रीलेटरल ऑफ इंडिया या मोहिमेत आलेल्या विविध अनुभवांचा फायदा या मोहिमेत करून घेणार असून सी (समुद्र) ते स्काय (आकाश) या पुढील मोहिमेची पूर्व तयारी म्हणून या मोहिमेकडे बघत असल्याचे डॉ. महाजन यावेळी म्हणाले. 
 
ही मोहीम पूर्ण करताना डॉ. महाजन रोज 350 ते 400 किमी सायकल चालविणार आहेत. मोहिमेच्या तयारी विषयी बोलताना डॉ. महाजन म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून ही मोहीम मोहीम करण्याचे ठरवले होते. त्यानुसार तयारी सुरु असून दर रविवारी कसारा घाट चढण्याचा सराव करत आहे. तसेच गेल्या तीन महिन्यापासून आपले क्लिनिक सांभाळत आठवड्यातील सहा दिवस किमान 50 ते 100 किमी सायकल चालवत आहेत. रोज जिम मध्ये पाठीचे विशेष व्यायाम करत आहे. प्रशिक्षक मितेन ठक्कर यांचे मार्गदर्शन डॉ. महाजन यांना लाभत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती