#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार

मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (16:26 IST)
आता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; त्या दृश्याच्या चित्रीकरणापूर्वी ते वगळण्याचा आग्रह सेलिब्रिटींकडून करण्यात येत आहे. दृश्य वगळण्याची मागणी निर्माते- दिग्दर्शकांकडे करण्यात येत आहे. असं करणं शक्य नसल्यास दृश्याच्या चित्रीकरणापूर्वी किंवा चित्रीकरणानंतर संपूर्ण टीमच्या उपस्थितीत अभिनेत्रींकडून ना हरकत (नो ऑब्जेक्शन) पत्रक लिहून घेण्याची मागणी कलाकार करत असल्याचंही कळत आहे. 
 
अभिनेते दलीप ताहिल यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही याचा प्रत्यय आला. सुधीर मिश्रा यांच्या आगामी चित्रपटामध्ये ते व्यग्र आहेत. पण, ज्यावेळी या चित्रपटात बलात्कारंच दृश्य असणार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी या दृश्यास स्पष्ट नकार दिला. चित्रपटाच्या दृष्टीने हे दृश्य वगळणं अशक्य असल्यामुळे अखेर या दृश्यासाठी तयार झाले. मात्र एक अट ठेवली. ज्या अभिनेत्रीसोबत दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं तिने एका पत्रकावर चित्रीकरणादरम्यान तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही असं त्या पत्रकात नमूद करणं अपेक्षित होतं. चित्रीकरणानंतर लगेचच त्या महिला कलाकाराची व्हिडिओ मुलाखतही घेण्यात आली, ज्यामध्ये तिने चित्रीकरणादरम्यान आपल्याला कोणतीच अडचण आली नसल्याचं स्पष्ट केलं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती