काँग्रेसचे स्थानिक नेते गुड्डू चौहान व अनीस खान यांनी ही मागणी केली आहे. भोपाळ हा वर्षानुवर्षे भाजपचा गड राहिला आहे. हा गड जिंकायचा असेल तर तरुण मतदारांना आकर्षित करणार्या उमेदवाराची गरज आहे. करिना यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. भोपाळमध्ये तिचे असंख्य चाहते आहेत. तिच्या लोकप्रियतेचा पक्षाला फायदा होईल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.
अभिनेता सैफ अली खानयाची पत्नी असलेली करिना आता भोपाळच्या नवाब घराण्याची सून आहे. सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म भोपाळमध्ये झाला होता. त्यांनी 1991मध्ये भोपाळमधून लोकसभेची निवडणूकही लढली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. मन्सूर अली यांचे आजोबा भोपाळचे अखेरचे नवाब होते. त्यांच्या घराण्याचे भोपाळशी जिव्हाळ्याचे नाते आहे. करिना, सैफ, शर्मिला टागोर व सोहा अली खान हे सर्वच जण भोपाळला अधूनमधून आवर्जून भेटी देत असतात. या नात्याचा फायदा करिनाला निवडणुकीत होऊ शकतो, असा तर्कही काँग्रेसच्या नेत्यांनी मांडला आहे. या विषयी अधिक चर्चा करण्यासाठी चौहान व खान हे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याचे समजते.
काँग्रेसची ऑफर करिना स्वीकारणार का?
काँग्रेसने करिनाला निवडणुकीत उतरवण्याच्या चर्चेला तोंड फोडले असले तरी करिना ही ऑफर स्वीकारणार का, याबाबत उत्सुकता आहे. सैफ किंवा करिनाकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.