सामन्यातून सरकारवर टीका

गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:42 IST)
निवडणुकां अगदी काही दिवस शिल्लक असताना तर सरकार घोषणांचा धडाका लावते. त्यामुळे लोकांना खूश करणाऱ्या घोषणा किंबहुना लोकप्रिय निर्णयांचा धूमधडाका होलसेलात सुरू झाला की खुशाल समजावे निवडणुका जवळ आल्या आहेत, असा चिमटा काढत हेच चांगले निर्णय सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या एक-दोन वर्षांत होऊ शकत नाहीत का? हा सवाल शिवसेनेने भाजप सरकारला केला आहे. निवडणुका जवळ आल्या की मायबाप मतदारराजाला म्हणजेच प्रजेला सुखावणारे निर्णय लागोपाठ घेण्याचा मोह मी मी म्हणणाऱ्या पक्षांनाही सुटत नाही, असा टोलाही ‘सामना’च्या अग्रलेखात भाजपला लगावण्यात आला आहे.
 
अग्रलेखात म्हटले आहे की लोकांना खूश करणाऱ्या घोषणा किंबहुना लोकप्रिय निर्णयांचा धूमधडाका होलसेलात सुरू झाला की खुशाल समजावे निवडणुका जवळ आल्या आहेत! सरकार मग ते कुठल्याही पक्षाचे असो, निवडणुकीच्या तोंडावर ते अंमळ अधिकच वेगाने काम करू लागते. निवडणुका जवळ आल्या की मायबाप मतदारराजाला म्हणजेच प्रजेला सुखावणारे निर्णय लागोपाठ घेण्याचा मोह मी मी म्हणणाऱ्या पक्षांनाही सुटत नाही. पुन्हा असे निर्णय घेताना समाजातील सर्वच स्तरांतील वर्गांना काही ना काही देऊन चुचकारण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत असतात. तसेच एकंदर सध्या केंद्रात आणि राज्यातही सुरू आहे. सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांना विरोध असण्याचे कारण नाही, मात्र हेच चांगले निर्णय सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या एक-दोन वर्षांत होऊ शकत नाहीत का, हाच काय तो कळीचा मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. त्या निर्णयांचे वार्तांकन करताना बहुतांश मीडियाने ‘निवडणूक धमाका’ असेच वर्णन केले आहे. ते पुरेसे बोलके आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती