मोदी सुद्धा 'पी एम इन वेटिंग'

वेबदुनिया

शुक्रवार, 24 एप्रिल 2009 (17:20 IST)
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नावही आता पंतप्रधानांच्या यादीत समाविष्ट झाले असून, स्वतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच याची अधिकृत घोषणा केली आहे.

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव या यादीत सर्वात वरती असून, अडवाणीनंतर भाजपचे नेतृत्व मोदींकडेच येणार असल्याची घोषणा भाजप नेते अरुण शौरी यांनी गुजरातमध्ये तर प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारपरिषदेत केली.

मोदी कुशल प्रशासक असून, त्यांनी गुजरातचा विकास केला आहे. पक्षातील नेत्यांच्या मनातही मोदींविषयी चांगली भावना आहे. अडवाणींनंतर ते पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे मत शौरी यांनी व्यक्त केले.

मोदी यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, परंतु हा निर्णय पक्षातील नेत्यांनी घ्यायचा असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट करत शौरींच्या घोषणेला आपला पाठिंबा जाहीर केला.

आधी पहिले स्वप्न तर पूर्ण करा

भाजपच्या या घोषणेची कॉग्रेसने खिल्ली उडवली असून, आधी अडवाणींचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ द्या नंतर मोदींकडे पाहू या शब्दात कॉग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी शौरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा