मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा अपवाद वगळता अख्खे पवार कुटुंबिय पार्थ यांच्या प्रचारासाठी मावळात तळ ठोकून होते. अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी तब्बल दोन लाखांच्या मताधिक्क्याने पार्थ यांचा पराभव केला.
पार्थ यांच्या पराभवाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. संजोग वाघेरे म्हणाले की, इतका दुर्देवी पराभव होईल, असे वाटले नाही. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. काम करुनही मिळालेले अपयश धक्कादायक आहे. इतका दारुण पराभव होईल, असे वाटत नाही. आजचा निकाल आश्चर्यकारक आहे. इव्हीएम बाबत गडबड असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.