राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेत जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई कमी करणे हा जाहीरनाम्यामागाचा उद्देश असल्याचे जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असून या जाहीरनाम्यात महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आले आहेत. हमारा, आपका, हम सबका भारत’अशी या जाहीरनाम्याची संकल्पना आहे. तसेच भारत हा सर्वांचा देश असून ही संकल्पना या जाहीरनाम्यातून समोर ठेवली आहे. त्याचप्रमाणे शेती आणि शेतकर्यांची हलाकीची परिस्थिती असून शेतकरी, युवा आणि महिला या वर्गाला समोर ठेवून जाहीरनामा बनवला असल्याचे देखील वळसे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
या जाहीरनाम्यात शेती, आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर (एमएसएमई) भर, कामगार कायद्यांत सुधारणा, कर सुधारणा, भांडवली आणि वित्तीय बाजारपेठा, मानव संसाधन विकास, डिजिटल भारत, आरोग्याचा हक्क, महिला आणि बाल कल्याण, बालसुरक्षा आणि महिला सक्षमीकरण, युवा आणि क्रीडा, ज्येष्ठ नागरिक, संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, व्यापारी धोरणे, नागरी विकास, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, समाजिक न्याय, अल्पसंख्याक, लोकशाही संस्थांची चौकट बळकट, सार्वजनिक खाजगी भागीदारीला नवसंजीवनी, मनरेगा आणि उत्पानातील असमानता आदी विषय या जाहीरनाम्यात घेण्यात आले आहेत.