नाशिकमधून करण गायकर यांची माघार

शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (17:35 IST)
नाशिक लोकसभा मतदार संघात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकर यांनी माघार घेतली. त्यामुळे नाशिकमध्ये चौरंगी लढतीची शक्यता आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री बबन घोलप यांची सकाळपासून गायकर यांच्याशी चर्चा सुरू होती. अखेर त्यांची शिष्टाई फलद्रुप झाली. दुपारी १ वाजेच्या सुमारास अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या गायकर यांनी माघारीचा अर्ज सादर केला. 
 
गायकर यांच्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, खासदार तथा उमेदवार हेमंत गोडसे, बबन घोलप आणि खोतकर एकाच गाडीतून माघारीचा अर्ज सादर करण्यासाठी सोबत आले होते. घोलप आणि खोतकर यांचे निकटचे संबंध असल्याने, गायकर यांच्या मनधरणीसाठी त्यांनी खोतकर यांना बोलावल्याची चर्चा आहे. गायकर यांच्या माघारीमुळे आता नाशिक मतदार संघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यात चौरंगी लढतीची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती