पवार व राहुल गांधी यांचा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न करत आहेत अमित शहा यांची टीका

गुरूवार, 18 एप्रिल 2019 (10:21 IST)
तासगाव येथे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली. त्यावेळी ते म्हणाले की, आपल्या काश्मिरमधील स्थिती अतिशय गंभीर असून, तेथील नेते फारूख अब्दुल्ला काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान मागत आहेत. ते असे विधान करत असून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पाठिंबा देत आहेत. कोणत्याही स्थितीत देशाला दोन पंतप्रधान नको आहेत असे म्हणत पवार व राहुल गांधी यांचा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आणि टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. तासगाव येथील विद्यानिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
 
शरदराव आणि कंपनीने पंधरा वर्षांच्या काळात ७२ हजार कोटींचा गैरव्यवहार सिंचन योजनेतून केला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी संजय पाटील यांना विजयी करावे लागेल, आवाहन त्यांनी यावेळी केले. 
 
शहा पुढे म्हणाले, राहुल गांधी आणि शरद पवार देशातील गरिबी हटवण्याची भाषा करतात, मात्र माझा त्यांना एक प्रश्न आहे की, त्यांनी आतापर्यंत गरिबी हटवण्यासाठी काय करून दाखवले आहे. मागील पाच वर्षात आम्ही ७ कोटी कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ दिला आहे. देशातील ८ कोटी कुटुंबांना शौचालये बांधून दिली. सोबतच  अडीच कोटी कुटुंबांना घरे दिली. २ कोटी ३५ लाख कुटुंबांना वीज तर ५० कोटी जनतेला आयुष्यमान भारत योजनेतून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण दिले आहे. देश काँग्रेसच्या हातात सुरक्षित राहू शकत नाही, असं शहा म्हणाले आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपाचा जोरदार प्रचार सुरु असून, ते विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती