लता मंगेशकर यांचं खरं नाव काय होतं?

रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (12:18 IST)
एखाद्या प्रस्थापित गायिकेला संगीतकारानं कोरसमध्ये गायला सांगितलं तर कसं वाटेल? आणि ती गायिका दुसरी कणी नसून साक्षात लता मंगेशकर असतील तर...?
 
दिग्गज संगीतकार अनिल विश्वास एकदा सुरिंदर कौर यांचं गाणं रेकॉर्ड करत होते. योगायोगाने त्या दिवशी लतादीदीही त्या ठिकाणी उपस्थित होत्या.
 
अनिलदांनी प्रेमानं आणि हक्कानं लतादीदींना बोलवलं, "लतिके! इकडे ये, तू कोरस (समूह गायन) मध्ये गाणं म्हणशील? त्यानं हे गाणं आणखी चांगलं होईल, असं मला वाटतं."
 
लतादीदींनी स्वतःहून ही आठवण सांगितलेली आहे.
 
''अनिलदांनी उत्साहानं मला हे काम सांगितलं होतं. म्हणून मीही ते काम मनापासून केलं. खरं म्हणजे तेव्हा समूह गायनामध्येही गातानाही मुख्य गायिकेप्रमाणेच आनंद व्हायचा," दीदी नम्रपणे सांगतात.
 
हा एका गायकाने दुसऱ्या गायकाचा सन्मानच केल्यासारखं आहे हे. कारण त्या वेळीही लतादीदी हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय गायिका म्हणून प्रस्थापित झालेल्या होत्या. या आठवणी आहेत कवी आणि संगीतज्ज्ञ यतिंद्र मिश्रा 'लता - एक सुर गाथा' या पुस्तकातल्या.
 
या पुस्तकासाठी यतिंद्र यांनी तब्बल सहा वर्षं टप्प्याट्प्प्याने लतादीदींच्या आणि संगीत क्षेत्रातील संबंधित दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहेत. संगीताच्या दुनियेतील लता नावाच्या आश्चर्याचा प्रवास शब्दबद्ध करण्यात आला आहे.
 
'महल' सिनेमातील 'आएगा आने वाला... आएगा' गाण्याविषयीचा एक गमतीशीर प्रसंग या पुस्तकात सांगितला आहे. तो 1948-49 चा काळ होता जेव्हा रेकॉर्डिंग स्टुडिओ उपलब्ध नव्हते. एकतर मोकळ्या स्टुडिओमध्ये किंवा झाडांखाली किंवा टेम्पोमध्ये गाणी रेकॉर्ड करावी लागत होती. सुपरहिट ठरलेलं 'आएगा आनेवाला' असंच बाहेर रेकॉर्ड केलेलं.
 
'आएगा आनेवाला... आएगा' हे गाणं सुरुवातीला खूप गाजलं. पण हे गाणं बाजारात येण्याअगोदर संगीतकार खेमचंद प्रकाश यांचं निधन झालं, ही गोष्ट अजूनही लतादीदींना सलते.
 
या गाण्याविषयीचा अजून एका अनुभव लताजी सांगतात.
 
लाहोर सिनेमाचं शूटिंग सुरू असताना गायिका-अभिनेत्री जद्दनबाई आणि त्यांची मुलगी नर्गिस दोघीही बॉंम्बे टॉकीजमध्ये आल्या होत्या. मी तिथेच गाणं रेकॉर्ड करायला सुरुवात केली. जद्दनबाई लक्ष देऊन ऐकत होत्या. शेवटी मला बोलावून म्हणाल्या, "इधर आओ बेटा. क्या नाम है तुम्हारा? (इकडे ये बेटा. तुझ नाव काय?)"
 
"मी लता मंगेशकर," लताजी म्हणाल्या.
 
"अच्छा, तुम तो मराठन हो ना? (तू मराठी आहेस ना?)"
 
"जी हा. मैं मराठी हूँ. (होय, मी मराठी आहे.)"
 
यावर जद्दनबाई खुश होऊन म्हणाल्या, "माशाअल्लाह! क्या बग़ैर कहा है. (माशाअल्लाह! काय कमालीनं 'बग़ैर' म्हंटलं आहेस!)"
 
'दीपक बग़ैर कैसे परवाने जल रहे हैं' या वाक्यातील बग़ैर ऐकून खूप बरं वाटलं त्यांना. जद्दनबाईंकडून मिळालेला आशीर्वाद लतादीदी आवर्जून नमूद करतात, "ऐसा तलफ़्फ़ुज़ हर किसी का नहीं होता बेटा. तुम निश्चित ही एक रोज़ बड़ा नाम करोगी. (प्रत्येकालाच असे उच्चार शक्य नसतात बेटा. तू एक दिवस मोठं नाव कमवशील)".
लता मंगेशकर यांना मिळालेल्या या शाबासकीनं त्या भारावून गेल्या. पण आनंदाबरोबरचं त्यांच्या मनात भीतीनेही प्रवेश केला. त्या याबाबत बोलतात की, "बाप रे ! इतके मोठे लोक माझं गाणं ऐकायला येतात आणि माझ्या प्रत्येक शब्दावर बारिक लक्ष ठेऊन असतात."
 
या पुस्तकात लतादीदींच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. 1943 मध्ये त्या 14 वर्षांच्या होत्या. त्या वेळी त्या कोल्हापूरहून मुंबईला नाट्य महोत्सवात सहभाग घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या मावशी गुलाब गोडबोले त्यांच्यासोबत होत्या.
 
लतादीदी आपले काका कमलनाथ मंगेशकर यांच्या घरी राहिल्या आणि तिथंच त्या नाट्यसंगीताचा रियाज करत असत. आपल्या वडिलांचं नाव आपल्याला पुढं न्यायचं आहे आणि नाट्य महोत्सवात उत्तम प्रदर्शन करायचं आहे, हाच विचार त्यांच्या मनात असे.
 
पण त्यांचे काका त्यांच्यावर नाराज झाले. कुठे पंडित दीनानाथ मंगेशकर सारखा कसलेला गायक आणि कुठं ही मुलगी, असा विचार ते करत असत.
 
हिला नीट गाता येणार नाही, आणि हिच्यामुळं घराण्याचं नाव जाईल, असं त्यांना वाटत होतं. हीच चिंता लतादीदींची आत्या विजया आणि मामा (आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांचे आजोबा) कृष्णराव कोल्हापूरे यांना देखील होती. त्यांना देखील असं वाटत असे की ही लता मंगेशकर नीट गाणार नाहीत. हे ऐकून लतादीदींना वाईट वाटलं आणि त्या रडू लागल्या.
 
त्यांनी ही गोष्ट आपल्या मावशीला सांगितली. मावशींनी त्यांना धीर दिला. तू कुणावरही नाराज होऊ नको. फक्त आपल्या वडिलांचं स्मरण कर. तेच तुला मार्ग दाखवतील.
 
दीनानाथ मंगेशकर यांचं 1942 मध्ये हृदयरोगानं निधन झालं होत. लतादीदी नाट्य महोत्सवाला येण्यापूर्वी ते त्यांच्या स्वप्नात आले होते.
 
मुंबई नाट्य महोत्सवातून त्यांच्या उज्ज्वल कारकीर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागं वळून पाहिलं नाही.
 
सात दशकांच्या आपल्या कारकीर्दीत त्यांनी 36 भाषांमध्ये गायन केलं, हजारो लोकप्रिय गाण्यांना त्यांनी आवाज दिला.
 
लता मंगेशकर यांचं खरं नाव काय होत?
मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला.
 
त्यांचं जन्मनाव हेमा होतं. मात्र,वडिलांच्या एका नाटकात लतादीदींनी लतिका नावाचं पात्र साकारलं.
 
तेव्हापासून सगळेच त्यांना लता म्हणून हाक मारायचे आणि अशाप्रकारे 'लता' हे नाव त्यांना मिळालं.
 
त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्वतः उत्तम गायक, नाट्य-कलावंत आणि संगीत नाटकांचे निर्माते होते. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.
 
त्यांच्या भावंडांनीही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत आणि गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवला.
 
लतादीदी त्यांच्या प्रवासाविषयी सांगताना एकदा म्हणाल्या होत्या, "मीच स्वतःला घडवलं आहे. लढायचं कसं हे मी शिकले. मला कधीच कुणाची भीती वाटली नाही. मात्र, मला जे मिळालं ते मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती