‘रॅन्समवेअर’मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुमच्याकडे खंडणीची मागणी करतो. एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो की तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केला असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या ‘पेमेंट’ ऑप्शनला क्लिक करून अमुक इतकी रक्कम या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासांत जर ही जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंटडाऊन सुद्धा चालू झालेले असते.
अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा या हॅकर्सने घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही. अर्थात, तुमची ऑपरेटिंग सिस्टम चालूच होत नाही. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला ‘रॅन्समवेअर’ असे म्हणतात. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.