टिकटॉक बंदी: रिपोसो, चिंगारी, शेअरचॅट चिनी अॅप्सची जागा घेऊ शकतील का?

शनिवार, 4 जुलै 2020 (15:46 IST)
अबिनाश कंदी

टिकटॉक भारतात प्रचंड लोकप्रिय होतं, भारतात जवळपास 20 कोटी युजर्स होते. मात्र भारत सरकारनं नुकतीच बंदी आणलेल्या 59 चिनी अॅप्सपैकी तेही एक होतंच.
या 59 अॅप्समुळे देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि शांततेला धोका असल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे.
टिक टॉकवर भारतात बंदी आणल्यानं 'बाईटडान्स' या कंपनीचं 45 हजार कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, असं 'ग्लोबल टाइम्स' या चिनी वृत्तपत्राचं म्हणणं आहे.
बाईटडान्स ही टिकटॉकची मुख्य कंपनी आहे. या रकमेवरूनच टिकटॉकनं भारतातील किती बाजार व्यापला होता, हे आपल्या लक्षात येऊ शकतं.
मात्र टिकटॉकवर बंदी आणल्यानं आता याच प्लॅटफॉर्मवरील काही भारतीय कंपन्या टिकटॉकची जागा घेण्यासाठी धडपड करू लागल्या आहेत. त्यात विशेषत: 'चिंगारी' आणि 'रोपोसो' या कंपन्यांनी आघाडी घेतली आहे.

भारतात सध्या 'चीनविरोधी भावना' प्रचंड आहे. त्यामुळे या भावनेवर स्वार होऊन कदाचित या कंपन्या आपली पोळी भाजून घेऊनही शकतात. किंबहुना, या भारतीय कंपन्यांसाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याहून मोठी संधी नाही.
मात्र, चिंगारी असो किंवा रोपोसो, या 'देशी' कंपन्यांना टिकटॉकसारखं मार्केट काबिज करता येईल का? याचं उत्तर आपण शोधणार आहोत.
तत्पूर्वी चिंगारी, रोपोसो किंवा तत्सम भारतीय कंपन्या नेमक्या काय आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, हे आपण जाणून घेऊया.

'चिंगारी' काय आहे?

टिकटॉकची भारतातील बाजाराची स्पेस काबिज करण्यासाठी 'चिंगारी' हे अॅप सर्वांत जास्त प्रयत्नशील दिसतं. काही दिवसांपूर्वी महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी म्हटलं होतं की, "मी कधीच टिक टॉक वापरलं नव्हतं, पण आता 'चिंगारी' डाऊनलोड केलं आहे."
आनंद महिंद्रा यांच्यासारखेच अनेक भारतीय 'स्वदेशी'चे पुरस्कर्ते आहेत. ते हे अॅप वापरण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

चिंगारीचे तासागणिक तीन लाखांनी युजर्स वाढत असल्याचा दावा चिंगारीचे सहसंस्थापक सुमित घोष यांनी केला आहे.
चिंगारी नोव्हेंबर, 2018 पासून गूगल प्ले तर 2019च्या जानेवारीपासून अॅपल स्टोरवर उपलब्ध आहे. चिंगारीचे आताचे युजर्स 80 लाखांच्या वर पोहोचले आहेत.

चिंगारीची वैशिष्ट्यं काय आहेत?

चिंगरीची रचना टिकटॉकच्या जवळ जाणारी आहे. नवीन व्हीडिओ पाहण्यासाठी स्क्रीन स्वाईप करावी लागते. कुठल्याही व्हीडिओला लाईक किंवा कमेंट करायची असल्यास, युजर्सचा चिंगारी अॅपवर अकाऊंट असणं बंधनकारक आहे.
चिंगारी अॅप इन्स्टॉल करताना कॅमेरा, लोकेशन आणि माईकच्या वापराची परवानगी अॅपला द्यावी लागते.
अॅपवरील परफॉर्मन्सच्या हिशोबानं काही पॉईंट्स मिळतात. या पॉईंट्सचे रोख रकमेतही रूपांतर करतात आणि युजर्सना देतात.
हे अॅप इंग्रजीत तर आहेच, मात्र हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, गुजरात इत्यादी भारतीय भाषांमध्येही उपलब्ध आहे.

रोपोसो, मित्रों, शेअर चॅट.... असेही अनेक पर्याय


गुगल प्लेस्टोरवरील मोफत अॅप्सच्या यादीत रोपोसो हे अॅप सध्या अव्वल स्थानी आहे.
सरकारनं चिनी अॅप्सवर बंदी आणण्याआधी रोपोसो अॅप साडेसहा कोटीवेळा डाऊनलोड केलं गेलं होतं. मात्र बंदीनंतर 10 कोटी डाऊनलोड्सच्या जवळ पोहोचलं आहे, असा दावा रोपोसो अॅपच्या कंपनीनं केला आहे.

प्रत्येक तासाला सहा लाख नवीन युजर्स रोपोसो अॅपवर येत आहेत, असंही कंपनीचं म्हणणं आहे.
चिंगारी, रोपोसो यासारखेच मित्रों, शेअरचॅट, ट्रेल इत्यादी आणखीही अॅप्स आहेत.
चिनी अॅप्सवरील बंदीनंतर मित्रों अॅप जवळपास एक कोटी लोकांनी डाऊनलोड केलं. मात्र, हे अॅप इतर अॅपपासून क्लोन केल्याचं वृत्त आहे. शिवाय, या अॅपचा सोर्स कोड सुद्धा पाकिस्तानी डव्हलपर्सकडून केवळ अडीच हजार रुपयांमध्ये घेतल्याचंही वृत्त आहेत.
शेअरचॅट अॅपही भारतीय आहे. हेही टिक टॉकच्या 'स्पेस'वर नजर ठेवून आहे. ग्रामीण भागातील अनेक युजर्समध्ये शेअरचॅट आधीच लोकप्रिय आहे.

संधी आणि आव्हानं

चिनी अॅप्सवरील बंदीनंतर चिंगारी, शेअरचॅटसारख्या अॅप्सकडे युजर्सचा ओढा हजारो-लाखोंच्या पटीत वाढला. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येतील युजर्सना सांभाळणं (हँडल करणं) हे जिकिरीचं काम आहे. अॅपही तितकं सुरक्षित आणि मोठ्या संख्यातील युजर्स आल्यानंतरही हँग न होणारं असायला हवं. हेच या अॅपसमोर मोठं आव्हान आहे.
बऱ्याचदा मोठं ट्राफिक आल्यनंतर, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त संख्येत युजर्स एखाद्या अॅपवर आल्यानंतर ते अॅप क्रॅश होण्याची भीती अधिक असते.
चिंगारीचे सहसंस्थापक सुमित घोष यांनी हे मान्यही केलंय.
चिंगारी अॅप सध्या अशा अडचणींना तोंड देतंय. अॅपवरील विविध अडणचींना कंटाळलेले युजर्स गुगल प्लेस्टोर किंवा सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रियाही नोंदवत आहेत. अशीच स्थिती कायम राहिल्यास युजर्स या अॅप्सकडे पाठ फिरवू शकतात.

या अॅप्सनी आपले रिसोर्सेस जास्तीत जास्त वाढवले पाहिजेत. जर रिसोर्सेस वाढवले नाहीत तर जितक्या वेगानं युजर्स वाढलेत, तेवढ्याच वेगानं कमी होतील, असा सल्ला तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार नल्लामोथू श्रीधर देतात
"अशाप्रकारच्या लहान अॅपकडे रिसोर्सेस खूपच कमी असतात. त्यात हे व्हीडिओ शेअरिंग अॅप असल्यानं होस्टिंगची क्षमता मोठी असावी लागते. एकाचवेळी अनेक लोक असे अॅप वापरू लागतात, त्यावेळी भार सांभाळण्याची क्षमता सर्व्हरमध्ये नसते. त्यामुळे या अॅप्सनी रिसोर्सेस शक्य तितके वाढवायला हवेत.
"गुंतवणूकदारांकडून निधी मिळवण्यासही तातडीनं सुरुवात केली पाहिजे. किंबहुना सरकारनंही अशा लहान कंपन्यांना कर्ज पुरवठा केला पाहिजे," असंही श्रीधर म्हणतात.

माहिती सुरक्षेबाबत प्रश्न

हे लहान-सहान अॅप माहिती सुरक्षेची ठाम हमी देत असतील असं मला वाटत नाही, असं श्रीधर म्हणतात.
"साधरणत: अशी लहान-सहान अॅप्सची निर्मिती दोघे-तिघे एकत्र येऊन करतात. त्यांना अॅपबाबत अगदीच मुलभूत माहिती असते. फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटा बेस यांचं कोड फक्त ते करू शकतात. त्यांच्या रिसोर्सेस जास्त नसल्यानं आणि यातील माहितीही जास्त नसल्यानं डेटा सुरक्षेकडे फारसं ते लक्षही देत नाहीत. अॅप दिसत जरी चांगलं असलं, तरी डेटा सुरक्षा महत्त्वाचं आहे," असं श्रीधर म्हणतात.
एलियट अँडरसन या फ्रेंच हॅकरच्या मते, चिंगारीची मुख्य कंपनी ग्लोबसॉफ्टची वेबसाईटच व्हायरसग्रस्त आहे.

चिंगारीचे सहसंस्थापक सुमित घोष यांनी मात्र अँडरसन यांचा दावा फेटाळला आहे. शिवाय, चिंगारी आणि ग्लोबसॉफ्ट वेबसाईट आणि चिंगारी अॅपचा काहीच संबंध नसल्याचं सुमित घोष यांचं म्हणणं आहे.
शिवाय, "ग्लोबसॉफ्ट वेबसाईट आणि चिंगारी अॅप या दोन्हींच्या वेगवेगळ्या सुरक्षा/इंजिनिअरिंग टीम आहेत. शिवाय, त्यांचा एकमेकांशीही काहीही संबंध नाही. तसंच, चिंगारी लवकरच स्वतंत्र कंपनी असेल," असंही सुमित घोष यांनी सांगितलं.

जर टिक टॉक परत आलं तर....

टिकटॉकवर बंदी आणली गेली असली, तरी टिकटॉकची मुख्य कंपनी बाईटडान्स भारत सरकारशी चर्चा करत आहे. भारतात परतण्यासाठी टिकटॉककडून प्रयत्न केले जात आहेत, कायदेशीर मार्गांचीही चाचपणी केली जाते आहे.
टिकटॉकवर पॉर्नोग्राफिक कंटेट प्रसिद्ध केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टानं टिकटॉकवर बंदीची कारवाईक केली होती. मात्र टिकटॉकनं यापुढे सुरक्षेसाठी काय काळजी घेतली जाईल, हे सांगितल्यानंतर काही अटींसह ही बंदी उठवली गेली.
 

यावेळीही ठोस कारणं देऊन बंदी उठवण्यासाठी टिकटॉकचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या शक्यता आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही.
जर या शक्यता सत्यात उतरल्या, म्हणजे टिकटॉक पुन्हा परतलं, तर ते पुन्हा त्यांचा मार्केट व्यापून टाकेल यात शंका नाही, असं श्रीधर म्हणतात.
"भारतीयांमध्ये आता चीनविरोधी भावना आहे, हे मान्य आहे. मात्र, ही भावना काही कायम राहणार नाही. तणाव दूर होईल. जर टिकटॉक पुन्हा भारतात परतलं, तर त्यांची लोकप्रियता ते पुन्हा मिळवतील यात शंका नाही," असंही श्रीधर म्हणतात.
टिकटॉक पुन्हा भारतात परतल्यास चिंगारी, रोपोसो यांसारख्या अॅपचं भवितव्य पुन्हा कठीण होऊन बसेल, असं श्रीधर यांना वाटतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती