तुम्ही जर फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडियावर असाल, तर सावध राहा. केंद्रातील मोदी सरकार यापुढे सर्व सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने एका खासगी कंपनीला कंत्राट देऊन असे सॉफ्टवेअर तयार केले आहे की, ज्याद्वारे तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल.
तुम्ही यूट्यूबवर काय पाहत आहात, व्हॉटस्अॅपवर तुम्हाला काय संदेश वा छायाचित्रे, व्हिडिओज येत आहेत वा तुम्ही पाठवत आहात, फेसबुकवर तुम्ही काय पोस्ट केली आहे, तुमच्या ईमेलद्वारे तुम्ही कोणाला व काय मेल केला आहे, त्यात काय लिहिले आहे, ही सर्व माहिती या सॉफ्टवेअरमुळे केंद्र सरकारला कळेल. या सर्वाचे सरकार रेकॉर्ड ठेवेल आणि जेव्हा वाटेल, तेव्हा रेकॉर्डमधील माहितीचा उपयोग केला जाईल.
त्याचा हॅब तयार करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने 42 कोटी रुपयांची निविदाही दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी हे काम सुरू होईल. त्याद्वारे तुमची माहिती, पत्ता, फोन व मोबाइल क्रमांक हा सारा डेटाही सरकारला मिळेल.