मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात अनेक ठिकाणी विमानसेवा ठप्प; दिल्ली विमानतळावरही गोंधळ

शुक्रवार, 19 जुलै 2024 (16:18 IST)
जगभरातील अनेक बँका, एअरलाइन्स आणि टेलिकम्युनिकेशनचं कामकाज शुक्रवारी अचानक ठप्प झालं.
अनेक ठिकाणच्या हवाई वाहतुकीला याचा फटका बसला आहे. तसंच आयटीचा वापर करणाऱ्या इतर सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे.दिल्ली विमानतळावर इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया, आकासा या हवाई वाहतूक कंपन्यांना याचा फटका बसला आहे.

दिल्ली विमानतळावरही यामुळं गोंधळ उडाल्याची माहिती आहे. दिल्ली एअरपोर्टनं जागतिक आयटी संकटामुळे काही सेवांवर परिणाम झाल्याचं ट्वीट केलं.दिल्लीच्या विमानतळ प्रशासनाने माहिती दिली आहे की, जागतिक आयटी संकटामुळे त्यांच्या काही सेवांवर परिणाम झाला आहे.
 
दिल्ली विमानतळाने दिलेल्या माहितीनुसार ते त्यांच्या सर्व पार्टनर्सशी संपर्कात आहेत जेणेकरून प्रवाशांना कमीत कमी त्रासाला सामोरं जावं लागेल.एअर इंडियानेही ट्वीट करून म्हटलं आहे की, मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे आमच्या सिस्टीमलाही त्याचा फटका बसला आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल ते दिलगीर आहेत.
 
सध्याची परिस्थिती पाहून हवाई प्रवासाचे नियोजन करावे, असं आवाहन एअर इंडियाने प्रवाशांना केलं आहे.
इंडिगो एअरलाइन्सनेही ट्वीट करून सांगितलं आहे की, मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना एअरपोर्टवर जास्त वेळ वाट पहावी लागणार आहे.
 
स्पाईस जेटनेही या संकटाबद्दल ट्वीट केलं आहे की, विमानांची माहिती अपडेट करण्यात त्रास होत आहे आणि त्यांची टीम ही अडचण सोडवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत आहे.

दिल्ली विमानतळावर लिहिले गेले हाताने बोर्ड
बीबीसी प्रतिनिधी समीरा हुसैन दिल्ली विमानतळावर आहेत.
 
त्या सांगतात, “मी जेव्हा इथे आले तेव्हा अगदी त्रोटक माहिती देत होते. चेक-इन साठी कोणतीच इलेक्ट्रॉनिक यंत्रणा सुरू नव्हती. तसंच तिथल्या माणसांशी बोलणं पण कठीण होत कारण लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 
आम्हाला रिकामे बोर्डिग कार्ड देण्यात आले आणि आम्हाला माहिती हाताने भरायला सांगितली. बॅगेज टॅग्स रिकामे होते आणि त्यावर हाताने माहिती भरली जात होती.
त्यांनी पुढे म्हटलं की, "सिक्युरिटी चेक झाल्यानंतर टर्मिनल 3 वर एक व्यक्ती होती. तो गेटची माहिती व्हाइटबोर्डवर लिहित होता. सगळं मॅन्युअली करण्यात येत असल्यामुळे सगळ्या कामाचा वेग मंदावला होता. तरी विमानतळ सुरू आहे."
 
माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांचं ट्वीट
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या संकटाबद्दल ट्वीट केलं आहे.
 
ते म्हणतात, “माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या बिघाडासंदर्भात मायक्रोसॉफ्टच्या सातत्याने संपर्कात आहे. या बिघाडाचं कारण कळलं आहे आणि तो बिघाड दुरुस्त करण्यासाठी अपडेट्स जारी करण्यात आले आहेत."
 
कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) या संबंधी काही मार्गदर्शक सूचना जारी करत आहे. NIC नेटवर्कवर या बिघाडाचा कोणताही परिणाम झालेला नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
CERT ने एक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मायक्रोसॉफ्टच्या CrowdStrike या प्रणालीत बिघाड झाला आहे. हे प्रॉडक्ट अपडेट होत असल्यामुळे हे संकट ओढवलं आहे. त्यामुळे युजर्सना ब्लू स्क्रीन 'ऑफ डेथ' दिसत आहे.
 
CrowdStrike च्या टीमने यावर पावलं उचलली आहेत. तरीही सिस्टिम सुरू होत नसेल तर-
 
विंडोज सेफ मोड किंवा विंडोज रिकव्हरी इन्वॉन्मेंट मध्ये सुरू करा.
आता C:\\Windows\System 32\drivers\Crowdstrike directory वर जा
आता C- 000291*.sys, ही फाईल शोधा आणि डिलिट करा.
आता सिस्टिम पुन्हा नेहमीसारखी सुरू करा.
Crowdstrike पोर्टलवर अपडेट बघत राहण्याचा सल्लाही CERT ने दिला आहे.
सिडनीतील अनेक विमानांची उड्डाणं थांबली. तसंच युनायटेड एअरलाइन्सनंही उड्डाणं थांबवल्याचं पाहायला मिळालं. लंडन स्टॉक एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मलाही याचा फटका बसला.
 
अमेरिकेच्या युनायटेड, डेल्टा आणि अमेरिकन एअरलाइन्सं जगभरातील उड्डाणं स्थगित केली आहेत. कोणतीही नवी उड्डाणं न करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.

युकेतील रेल्वेलाही फटका
युकेतील एका मोठ्या रेल्वे कंपनीनंही त्यांना समस्यांचा सामना करावा लागणार असल्यानं, सेवांवर परिणाम होण्याचा इशारा दिला आहे.
ब्रिटनमध्ये स्काय न्यूज चॅनललाही याचा फटका बसला आहे. सकाळी लाईव्ह ब्रॉडकास्ट करता आलं नसल्याची तक्रार कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षांनी म्हटलं.
गोविया थेम्सलिंक रेल्वेच्या सदर्न, थेम्सलिंक, गॅटविक एक्सप्रेस आणि ग्रेट नॉर्दर्न या चारही रेल्वे ब्रँडनं सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
 
"आमच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये व्यापक आयटी समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचं मूळ कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत," असं त्यांनी म्हटलं.
बर्लिन विमानतळानंही तांत्रिक अडचणींमुळं चेक इनमध्ये उशीर होत असल्याची पोस्ट केली. स्पेनमध्येही विमानतळांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला.अमेरिकेच्या अलास्कामध्ये आपत्कालीन फोन सेवांवरही याचा परिणाम झाला आहे.अलास्काच्या पोलिसांनी फेसबूकवर याबाबत पोस्ट केली. संपूर्ण राज्यात या फोनसेवेशी संबंधित कॉल सेंटरचं काम बंद झालं आहे.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती