गुगलने वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढवला

मंगळवार, 28 जुलै 2020 (09:01 IST)
गुगलने आपल्या कर्मचार्‍यांचा वर्क फ्रॉम होमचा कालावधी पुढील वर्षाच्या जूनपर्यंत वाढविला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनीने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे कर्मचारी जुलै 2021पर्यंत घरातून काम करू शकतात. यासंदर्भात गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही कर्मचार्‍यांना ईमेल पाठविला आहे.
 
या ई-मेलमध्ये पिचाई यांनी लिहिले आहे की, 'कर्मचार्‍यांना पुढील नियोजन वाढवण्यासाठी आम्ही वर्क फ्रॉम होमचा पर्याय 30 जून 2021 पर्यंत वाढवत आहोत. हे अशा लोकांसाठी असेल ज्यांना कार्यालयातून काम करण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेच्या एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सुंदर पिचाई यांनी हा निर्णय गूगलच्या काही वरिष्ठ अधिका-यांशी सल्लामसलत केल्यानंतर घेतला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने गुगलच्या या घोषणाची माहिती दिली आहे. गुगलच्या 2 लाखांहून अधिक कर्मचारी आणि कंत्राटदारांना याचा फायदा होणार आहे. याआधी गुगलने घरातूनच कामाचा पर्याय जानेवारीपर्यंतच ठेवला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती