दिल्लीतील एका तरुणाने अॅमेझॉनला लाखोंचा गंडा घातला आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून १९ महागडे फोन, १२ लाखांची रोख रक्कम आणि ४० विविध बँकाचे पासबुक जप्त केले.
दिल्लीत राहणाऱ्या शिवम चोप्रा (२१) या तरुणाने दिल्लीतल्या विद्यापीठातून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र नोकरी मिळाली नाही. त्यानंतर त्याने फिल्मी स्टाईलने अॅमेझॉनला लुबाडायला सुरूवात केली. यातून त्याने एप्रिल ते मे महिन्यात जवळपास ५० लाख रुपये कमावल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. शिवम अॅमेझॉनवरून महागडे मोबाईल मागवायचा. त्यांने आतापर्यंत सॅमसंग, अॅप्पल, वन प्लस अशा कंपनीचे १६६ फोन अॅमेझॉनवरून मागवले. दरवेळी तो वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरून आपली ऑर्डर द्यायचा. पत्ताही चुकीचा द्यायचा. जेव्हा मोबाईलची डिलिव्हरी घेऊन डिलिव्हरी बॉय पोहोचायचा तेव्हा पत्ता शोधण्यासाठी त्याला अडचणी यायच्या. डिलिव्हरी बॉय पत्ता विचारण्यासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करायचा, फोन आला की दिलेल्या पत्त्याच्या आसपास असणाऱ्या ठिकाणी डिलिव्हरी बॉयला बोलावून शिवम आपली ऑर्डर स्वीकारायचा.यामुळे कोणालाही शंका यायची नाही. ऑर्डर मिळाल्यानंतर आपल्याला फोनऐवजी रिकामा खोकं आलं असं खोटं सांगून तो रिफंड मागायचा. असं करून त्याने लाखो रुपये कमावले.