भारतामध्ये दर शंभर मैलावर भाषा बदलते असे म्हणतात. त्यामुळे भाषेची मोठी अडचण होते. याच समस्येवर उपाय म्हणजे सर्व भाषा वाचता येणारी अशी एक नवी लिपी तयार केली जात आहे. आयआयटी मद्रासमधील वैज्ञानिकांची टीम ही लिपी तयार करत आहेत. तिला ‘भारती लिपी’ असे नाव देण्यात आले आहे. या लिपीद्वारे भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा वाचता येणार आहेत. तसेच या लिपीच्या विकासामुळे निरनिराळ्या प्रांतांमधील लोकांना परस्परांची भाषा समजणे सोपे होणार आहे.
या लिपीची कल्पना आयआयटीच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्राध्यापक व्ही.श्रीनिवास चक्रवर्ती यांची आहे. त्यांना ३ वर्षांपुर्वी या लिपीची कल्पना सुचली. भारतीमध्ये प्रत्येक स्वर समुहासाठी एक प्राथमिक अक्षर तयार करण्यात आले आहे. वेगवेगळ्या स्वरांमधील फरक दाखविण्यासाठी प्राथमिक अक्षरांमध्ये थोडेसे बदल करण्यात आले आहेत. भारती लिपी अतिशय सोपी असल्याने डिस्लेक्सिया असणाऱ्या व्यक्तींनाही ही लिपी वाचण्यास मदत होणार आहे. या लिपीचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त व्हावा यासाठी मोबाईल ॲप बनवण्यात येणार आहे.