65 टक्के नेटिझन्स इंटरनेटच्या आहारी

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (11:27 IST)
भारतातील अंदाजे 65 टक्के लोक हे इंटरनेटच संपूर्ण आहारी गेल्याचे, टेलिनॉर समूहाने ‘वर्स्ट इंटरनेट हॅबिटस्’ या विषयावर केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. सकारात्मक डिजिटल फ्युचर या ध्येयाशी सुसंगतता साधत भारत, थायलंड, सिंगापूर व मलेशिया येथे हे सर्वेक्षण करण्यात आले.
 
भारतात इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर झपाटय़ाने वाढत असताना त्यांच्या काही त्रासदायक इंटरनेट सवयीदेखील वाढत आहेत. त्यात प्रामुख्याने खोट्या अफवा पसरविणे (40 टक्के), लोकांना ऑनलाईन गेम्स खेळण्यासाठी आमंत्रित करणे (34 टक्के), अयोग्य मजकूर शेअर करणे (30 टक्के), चित्रवाणीखोर मजकूर (18 टक्के) यांचा समावेश आहे. या सर्वेक्षणानुसार 33 टक्के भारतीयांना सतत उगाचच जास्त सेल्फी काढणारी लोकं आवडत नाहीत. हे प्रमाण सर्वेक्षणाच पूर्ण क्षेत्रांमध्ये 21 टक्के आहे. तर 65 टक्के भारतीयांनी ते इंटरनेट अँडिक्ट असल्याचे मान्य केले.
 
यासंदर्भात टेलिनॉर इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी शरद मेहरोत्रा म्हणाले, हे सर्वेक्षण म्हणजे नेटिझन्सच पसंती व नापसंतीकडे पाहण्याचा एक मार्ग आहे. देशात ऑनलाईनचा वापर वाढत असताना सर्वेक्षण केलेल्यांपैकी 94 टक्के भारतीयांना इंटरनेटमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे वाटते. माझ्या दृष्टीने भारतीय लोक त्यांच्या ऑनलाईन सवयींबद्दल जागरूक असून त्यांना इंटरनेट हे सर्वसमावेश व नियंत्रित व्यासपीठ म्हणून हवे आहे. सर्वेक्षण केलेल्या देशांमध्ये भारत हा एकमेव देश आहे जिथे सहानुभूती मिळविणार्‍या पोस्टचा सर्वात त्रासदायक सवयींमध्ये समावेश झाला आहे. तर 23 टक्के भारतीयांनी फेसबुक चेक करणे आणि काहीच पोस्ट न करणे, नाहक ई-कार्ड्स पाठविणे ही त्यांची सर्वाधिक सवय असल्याचे मान्य केले. 
 
हे सर्व असतानाही 94 टक्के भारतीय म्हणाले की, इंटरनेटमुळे त्यांच्या आयुष्यात सुधारणा झाली आहे. तर 83 टक्के लोक सोशल मीडियामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर व स्नेहींबरोबर संबंध अधिक बळकट करता आल्याचे मान्य केले.

वेबदुनिया वर वाचा