32 वर्षापूर्वी भारतीयांनी लावला ई-मेलचा शोध

मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (18:28 IST)
आज ईमेल 32 वर्षाचा झालाय. आजच्या काळातील संदेशवहनाचे महत्त्वाचे माध्यम झालेला हा ईमेल म्हणजे मुंबईत जन्मलेल्या एका अमेरिकन-भारतीयानं जगाला दिलेली देणगी आहे, हे फारच कमी जणांना माहीत असेल. व्ही. ए. शिवा अय्यादुराई या भारतीय-अमेरिकनानेच 1978 मध्ये ईमेलचा शोध लावला होता आणि त्यावेळी ते जेमतेम 14 वर्षाचे होते!
 
अय्यादुराई यांनी 1978 मध्ये ‘ईमेल’ नावाच्या एका कम्प्युटर प्रोग्रॅमची निर्मिती केली. आजच्या ईमेलचा अविभाज्य भाग असलेल्या इनबॉक्स, आऊटबॉक्स, फोल्डर्स, मेमो, अँटॅचमेंटस्, अँड्रेस बुक आदी सर्व फीचर्सशी साधम्र्य असलेले फीचर्स अय्यादुराईच्या ईमेलमध्ये होते. 
 
1982 मध्ये अमेरिकन सरकारनं अय्यादुराई याला ईमेलचा कॉपीराईट बहाल करून ईमेलचा निर्माता म्हणून त्याच्या नावावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केलं. त्यावेळी सॉफ्टवेअरमधील संशोधनाच्या संरक्षणासाठी कॉपीराइट हा एकमेव मार्ग होता. या ईमेलच्या संशोधनासाठी मोठे बजेट आखण्यात आलं नव्हतं, की एखाद्या मोठय़ा प्रयोगशाळेत किंवा लष्करासारख्या बलाढय़ यंत्रणेत या ईमेलची निर्मिती झाली नाही. अशा प्रकारची संदेशवहनाची यंत्रणा तयार करणं ही या संस्थांना फार गुंतागुंतीची, अशक्यप्राय बाब वाटत होती. मुंबईत एका तमिळ कुटुंबात जन्मलेले अय्यादुराई हे वयाच्या सातव्या वर्षी कुटुंबासोबत अमेरिकेत गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या कोरंट इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसनं आयोजित केलेल्या कम्प्युटर प्रोग्रॅमिंगविषयक उन्हाळी वर्गाला त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर लिव्हिंगस्टनमधील लिव्हिंगस्टन हायस्कूलमध्ये शिकत असतानाच युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीन डेंटिस्ट्री ऑफ न्यूजर्सी इथं ते संशोधनही करत होते. तिथल्या लॅब कम्प्युटर नेटवर्कचे लेस्ली मायकलसन यांनी त्यांची गुणवत्ता हेरली आणि संस्थेतील कागदावरील पत्रव्यवहाराची जुनी पद्धत इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत रुपांतरित करण्याचं आव्हान त्यांच्यापुढं ठेवलं.

वेबदुनिया वर वाचा