‘व्हॉटस् अँप’मुळे संसार ‘ब्लॉक’

मंगळवार, 11 ऑगस्ट 2015 (09:55 IST)
‘व्हॉटस् अँप’ या अँप्लिकेशनने मोबाइल युजर्सवर अक्षरश: भुरळ पाडली आहे. मोबाइल वापरणार्‍यांसाठी ‘व्हॉटस् अँप’ ही जीवनावश्यक गोष्टींएवढीच महत्त्वाची गोष्ट झाली आहे. मात्र, आता या ‘व्हॉटस् अँप’ने लोकांचे संसार मोडायला सुरूवात केली आहे. गेल्या वर्षभरात पुण्यामध्ये ‘व्हॉटस् अँप’ने शेकडो दाम्पत्यांना घटस्फोट घ्यायला भाग पाडले आहे. संपूर्ण जगाशी एका मिनिटात मैत्री करुन देणारे मोबाइल अँप्लिकेशन. पण ‘व्हॉटस् अँप’मुळेच जवळची नाती विसरत चालल्याचे दिसून येत आहे. मोबाइलमध्ये काही एमबीची जागा व्यापणार्‍या या ‘व्हॉटस् अँप’मुळे, पुण्यातल्या शेकडो दाम्पत्यांचा संसार घटस्फोटाच्या उंबरठय़ावर आणून ठेवला आहे. ‘व्हॉटस् अँप’वरून सुरू झालेल्या वादातून 15 दिवसांत तब्बल 67 दाम्पत्यांनी पोलीस ठाणे गाठले आहे.
 
गेल्या वर्षी या ‘व्हॉटस् अँप’ने तब्बल 550 दाम्पत्यांना घटस्फोटांचा विचार करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यातल्या 225 जोडप्यांनी समुपदेशनानंतर आपला निर्णय मागे घेतला. तर उर्वरित जोडप्यांच्या संसारात ‘व्हॉटस् अँप’ने घातलेला खो अजूनही कायमच आहे. ‘व्हॉटस् अँप’वरून पत्नीने परपुरुषाशी आणि पतीने परस्त्रीशी साधलेला संवाद संशयाचे भूत जन्माला घालतो आणि तिथूनच सुखी संसाराची कहाणी वेगळ्या वळणावर येऊन ठेपते. ‘व्हॉटस् अँप’ने प्रत्येकाला आपल्या मनातले विश्व मोबाइलच्या स्क्रीनवर मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. मात्र, ते स्वातंत्र्य उपभोगताना आपण जिव्हाळ्यांच्या माणसांशी संवाद साधणे विसरलो आहे का? याचा प्रत्येकाने अंतर्मुख  होऊन विचार करायलाच पाहिजे. ‘व्हॉटस् अँप’ नावाच्या खुळापायी आपण जिव्हाळ्यांची नाती तर कायमची ब्लॉक करत नाही ना याची सर्वानीच खबरदारी घेतली पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा