स्मार्टफोन न वापरणार्‍या चालकांना मोफत कॉफी देणारे अँप

बुधवार, 28 सप्टेंबर 2016 (15:02 IST)
आजकाल लोकांना स्मार्टफोन्सची एवढी सवय झाली आहे की, काहीजणांना त्याचा थोडावेळही विरह सहन होत नाही. त्यावर नवीन काय आले हे पाहण्यासाठी मधूनमधून त्यांचे हात स्मार्टफोन तपासण्यासाठी जातातच. मात्र वाहन चालविताना ही सवय जीवावर बेतणारी ठरू शकते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी जपानमध्ये अनोखी शक्कल शोधण्यात आली आहे. त्यासाठी तिथे 'ड्रायव्हिंग बरिस्ता' हे नवीन स्मार्टफोन अँप बनविण्यात आले आहे. टोयोटा मोटार कॉर्पोरेशन, कोमेडा को. लिमिटेड आणि केडीडीआय कॉर्पोरेशन यांनी संयुक्तपणे बनविलेल्या या अँपनुसार समजा एखाद्या चालकाने शंभर किलोमीटरपर्यंत वाहन चालविताना आपला स्मार्टफोन एकदाही तपासून पाहिला नाही तर त्याला मोफत ब्लेंडेड किंवा आइस्ड कॉफी कुपन देण्याची व्यवस्था केली जाते. आयची प्रीफेक्चर येथे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, मागील १३ वर्षांच्या कालावधीत जपानमध्ये ४ लाख ४३ हजार ६९१ अपघात झाले. त्यापैकी सुमारे ५0 हजार अपघात हे केवळ वाहन चालवितेवेळी स्मार्टफोनचा वापर केल्याने झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच यावर उपाययोजना करण्यासाठी या अनोख्या अँपची निर्मिती करण्यात आली आहे. चालकाने वाहन सुरू केल्यानंतर या अँपवरील 'सेफ ड्राईव्ह स्टार्ट'वर क्लिक करुन ड्रायव्हिंग सुरु करायचे असते. जीपीएसचा वापर करुन वाहन शंभर किलोमीटर अंतर धावून गेल्यानंतर त्यामध्ये आपोआप एक कॉफी कुपन अँड होण्याची सोय करण्यात आली आहे. या अँपद्वारे चालकाला मिळालेली कॉफी 'कोमेडा कॉफी शॉप' या स्थानिक कॉफी शॉपमध्ये रिडिम करण्याची सोय देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा