लॅपटॉप चार्जरनं घेतला युवकाचा बळी

लॅपटॉप चार्ज करताना काम करणं दिल्लीतल्या एका युवकाच्या जीवावरच बेतलं. लॅपटॉप चार्ज करताना लॅपटॉपवर काम करत असलेल्या ब्रजेशला करंट लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत पावलेला ब्रजेश हा एक्सपोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून काम पाहात होता. विशेष म्हणजे अडीच महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. 
 
पोलिसांनी घटनास्थळावरून लॅपटॉप ताब्यात घेतला असून ब्रजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रजेश लॅपटॉपवर काम करत होता. त्यावेळी त्यानं लॅपटॉप चार्ज व्हावा म्हणून चार्जरही चालू ठेवलं होतं. मात्र, त्याला अचानक शॉक लागला आणि तो बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखलही केलं. मात्र, तिथं त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 
 
ब्रजेशच्या मृत्यूनं त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लॅपटॉपमुळे झालेल्या मृत्यूनं ब्रजेशच्या शेजार्‍यांनाही धक्का बसला आहे. तज्ज्ञांच्या मते, लॅपटॉप चार्ज करताना सुरक्षितता बाळगणं महत्त्वाचं आहे. कारण की, खराब स्विच किंवा लॅपटॉप धोकादायक ठरु शकतं.

वेबदुनिया वर वाचा