फेसबुकमुळे ‘यू-टय़ूब’चे साम्राज्य धोक्यात

गुरूवार, 30 एप्रिल 2015 (15:46 IST)
आता फेसबुकने ऑनलाइन व्हीडीओ सेवा देणार्‍या ‘यू-टय़ुब’च्या साम्राज्याला जबरदस्त टक्कर द्यायला सुरुवात केली आहे. दहा वर्षापूर्वी ‘यू-टय़ूब’वर जेव्हा पहिला व्हीडीओ अपलोड झाला होता तेव्हापासून ते आजतागायत या कंपनीची ऑनलाइन व्हिडिओ मार्केटवर एकहाती सत्ता होती पण सोशल नेटवर्किगच्या जगामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या फेसबुकने संवादाची सारी परिमाणेच बदलून टाकली आहेत. विशेष म्हणजे बर्‍याच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आता व्हिडिओ प्रमोशनसाठी फेसबुकचाच आधार घेतल्याचे दिसून येते. एका दिवसात तब्बल चार अब्ज लोक फेसबुकवरील एक व्हिडिओ पाहतात. जानेवारीमध्ये हेच प्रमाण एक अब्ज एवढेच होते. व्हिडिओ पाहणार्‍या नेटिझन्सच्या संख्येत चक्क तीन अब्जांनी वाढ झाल्याने कंपनीचा रोखे बाजारातील भावदेखील चांगलाच वधारला आहे. एकीकडे फेसबुकच्या तिमाही नफ्यामध्ये मोठी घट झाली असताना कंपनीच्या रोख्यांच्या भावावर याचा कसलाही परिणाम झालेला नाही. व्हिडिओ जाहिरातींसाठी फेसबुक हेच परिणामकारक माध्यम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वेबदुनिया वर वाचा