ऑनलाईन ऑर्डर केला स्मार्टफोन, मिळाला साबण

शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (11:59 IST)
भारतात ऑनलाईन शॉपिंग खूप लोकप्रिय होत आहे. यामुळेच भारतीय बाजारपेठेवर अमेझॉन, इबे या विदेशी शॉपिंगप्रमाणेच भारतातील मोठय़ा उद्योगसमूहांचा डोळा आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. टाटांनीही अलीकडेच स्नॅपडिलमध्येमोठी गुंतवणूक केली होती. 
 
टाटांची गुंतवणूक असलेल्या स्नॅपडिलकडून प्रॉडक्ट डिलेव्हरी करताना एक अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय. मुंबईत राहणार्‍या लक्ष्मीनारायण कृष्णमूर्ती यांना हा अतिशय विचित्र असा अनुभव आला. तो त्यांनी फेसबुकवरही शेअर केलाय. लक्ष्मीनारायण कृष्णमूर्ती यांनी सॅमसंगचा एक स्मार्टफोन स्नॅपडिलवरून ऑर्डर केला, पण त्यांना घरपोच डिलेव्हरी मिळाली ती चक्क भांडी धुण्याच्या साबणाच्या वडय़ांची! आपली ऑर्डर आणि मिळालेली डिलेव्हरी त्यांनी फेसबुकवर शेअर केलीय. 
 
24 ऑक्टोबरला पोस्ट केलेलं स्टेटस आतापर्यंत तब्बल साडे सतरा हजार जणांनी शेअर केलंय. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कृष्णमूर्ती यांना ज्या बॉक्समध्ये साबणाची वडी मिळाली तो बॉक्स मात्र त्यांना हव्या असलेल्या स्मार्टफोनचाच होता. त्यामुळे स्मार्टफोनची डिलेव्हरी घरपोच झाल्यावर झालेला आनंद त्यांना बॉक्स उघडेपर्यंतही टिकला नाही. 
 
एरवी ऑनलाईन शॉपिंगवरून कितीतरी वेळा ऑर्डर न केलेलं प्रॉडक्ट न मिळणं किंवा फॉल्टी प्रॉडक्ट हातात मिळणं किंवा वेळेवर डिलेव्हरी न होणं असे प्रकार सर्रास होतात. पण स्मार्टफोन ऑर्डर करून चक्क भांडी धुण्याचा साबण मिळणं हा प्रकार पहिलाच म्हणावा लागेल. 
 
स्नॅपडिलने सॅमसंग स्मार्टफोनऐवजी साबणाची वडी दिल्याचा अनुभव शेअर केल्यानंतर, त्याच पोस्टखाली काही कॉमेन्टला उत्तर देताना लक्ष्मीनारायण यांनी सुरुवातीला ही बाब स्नॅपडिलच्या वेबसाईटवर कॉमेन्ट सेक्शनमध्ये पोस्ट केल्याचंही स्पष्ट केलंय. मात्र तिथे काहीच उपयोग न झाल्याचा अनुभव नोंदवला आहे.

वेबदुनिया वर वाचा