एफबीआयला हवा पासवर्ड चोरणारा हॅकर

मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (10:00 IST)
गेल्या वर्षी इंटरनेटवरील तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त यूजर पासवर्डची चोरी करून ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल साईट्सवर पोस्ट पब्लिश करण्यात आली होती. खरे तर आतापर्यंत असे चोरी झालेल्या यूजर पासवर्डची संख्या ही फक्त 20 लाखांवरून सव्वा अब्जांपर्यंत पोहोचली आहे.
 
अमेरिकेच्या एफबीआयकडे या प्रकरणाचा तपास होता. एका हॅकरपर्यंत एफबीआय पोहोचली आहे. मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात अजूनही यश आलेले नाही. एफबीआयने कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात या हॅकरला मि. ग्रे असे नाव दिले आहे. या मि. ग्रे ने रशियन सर्व्हरचा ई मेल वापरून जगभरातल्या त्यातल्या त्यात प्रामुख्याने अमेरिकी यूजर-पासवर्डवर डल्ला मारला होता. या मि. ग्रे ने या चोरी केलेल्या यूजर पासवर्डची ट्विटर-फेसबुकवर विक्री करण्याचाही प्रयत्न केला होता. अमेरिकी सायबर सिक्युरिटी फर्म होल्ड सिक्युरिटीने सर्वप्रथम जगभरातील यूजर पासवर्डची चोरी होत असल्याचा निष्कर्ष काढला होता. जगभरातील तब्बल सव्वाचार लाख वेबसाइटच्या लॉग इनसाठी आवश्यक यूजर पासवर्ड रशियन क्राईम रिंगने चोरल्याचे होल्ड सिक्युरिटीने जाहीर केले. गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या या राजरोस चोरीमधून आतापर्यंत किमान सव्वा अब्ज यूजर पासवर्डचे सेट चोरीला गेल्याचाही होल्ड सिक्युरिटीचा दावा आहे. ही चोरी अजूनही थांबलेली नसून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

वेबदुनिया वर वाचा