अँप्सनी कापली पतंगाची दोर

सोमवार, 12 जानेवारी 2015 (14:15 IST)
मकरसंक्रांत म्हटली की डोळ्यासमोर येणार्‍या गोष्टी म्हणजे तीळगूळ, लाडू आणि आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग. मात्र सध्या स्मार्टफोनच्या जगात वावरणार्‍या तरुण पिढीला आकाशात उडणार्‍या रंगीत पतंगांपेक्षा अँप्सद्वारे डाऊनलोड केलेले पतंग जास्त आकर्षित करत असल्याचे पाहायला मिळते आहे. परिणामी मुंबई व उपनगरांत गेल्या तीन वर्षात 40 ते 45 टक्क्यांनी पतंगांची विक्री घटली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
 
सध्या लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध आकाराचे, कार्टूनचे चित्र असलेले तसेच मिनी पतंग बाजारात आणण्यात आले आहेत. मात्र मोबाइलमध्ये रमलेल्या तरुण पिढीला पतंग उडवायला वेळच नसल्याने पतंगाची मागणी मोठय़ा प्रमाणात होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत संक्रांतीच काही दिवस आधीच पतंग खरेदीसाठी तरुणांसह बच्चे कंपनींची दुकानांमध्ये गर्दी होत होती. मात्र मकरसंक्रांतीला काही दिवस शिल्लक राहिलेले असतानादेखील पतंगप्रेमी दुकानात फिरकले नसल्याने व्यापारी धास्तावले आहेत. 
 
सध्ये प्ले स्टोर्सवर पतंगाचे अनेक गेम व अँप्लिकेशन उपलब्ध आहेत. त्यात पतंग, फ्लाइंग काईट, वोलान्टिन्स मोड-काइट, काइट फन, काइट केक, कलरफूल काइट, काइट कम्युनिकेशन, काइटस्, एँगरी काइट, काइट एक्सटिरम्, काइटस् फोरेवर, सीटी काइट, काइट रेसर, काइट इन द रन, पोंगल काइटस्, काइट थ्रीडी, पतंग दोरी यांचा समावेश आहे.
 
सहा ते सात वर्षापूर्वी पतंग हे किराणा मालाल्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत होते. आता मात्र त्यांची जागा विशेष पतंगाच्या दुकांनानी घेतली आहे. त्यातच पूर्वीप्रमाणे मोकळ्या मैदानांची संख्यादेखील कमी झाली आहे. त्यातच मांजमध्ये अडकून पक्षी जखमी होतात. या सर्व गोष्टींचा विचार करूनच बहुदा तरुण पिढी पतंग उडवण्यापासून लांब गेली असावी असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा