विराट कोहलीचं आयपीएलमधलं ते स्वप्न जे अपूर्णच राहिलं...

शुक्रवार, 24 मे 2024 (15:25 IST)
-विमल कुमार
विराट कोहलीनं 2016 प्रमाणेच यंदाच्या मोसमात देखील ऑरेंज कॅप पटकावली आहे.
 
मात्र त्या वेळेस विराट कोहलीच्या एकट्याच्या फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूची टीम फायनल मध्ये पोचली होती आणि फक्त 8 धावांनी आयपीएलची ट्रॉफी त्यांच्यापासून लांब राहिली होती.
 
मात्र 2024 मध्ये ट्रॉफी जिंकणं दूरच राहिलं, विराट कोहली आणि त्यांची टीम आयपीएलच्या अंतिम फेरीत सुद्धा पोहचू शकले नाहीत.
 
पहिल्या 8 सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकल्यानंतर जो संघ स्पर्धेतून बाहेरच पडला आहे असं सर्वजण मानत होते, तोच संघ पुढील 6 सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत आला. ही खूप मोठी कामगिरी आहे.
 
मात्र ज्यांना विराटचा स्वभाव माहित आहे, त्यांना या गोष्टीचा अंदाज नक्कीच आला असेल की क्वॉलिफायर-2 सामन्यात न पोहोचल्यामुळे हा माजी कॅप्टन किती निराश झाला असेल.
 
अपेक्षाभंग आणि आरसीबी
योगायोग म्हणा की विचित्र योगायोग म्हणा, विराट कोहलीचा संघ दरवर्षी आयपीएलमध्ये खूप अपेक्षा निर्माण करतो, मात्र अखेरीस सर्वांच्या हाती अपेक्षाभंग येतो.
 
राजस्थान रॉयल्सबद्दल सांगायचं तर यंदाच्या आयपीएलमध्ये हा सामना त्यांच्यासाठी बेंगळूरूच्या तुलनेत एकदम उलटा प्रवास होता.
 
सुरूवातीच्या 9 सामन्यांमध्ये फक्त 1 सामना हारणारा संजू सॅमसनचा संघ टॉप दोन संघांमध्ये स्थान पटकावणार ही गोष्ट औपचारिक असल्यासारखीच मानली जात होती.
 
मात्र त्यानंतर या संघाला लागोपाठ 4 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर शेवटच्या सामन्यात पाऊस आला होता. या गोष्टींमुळे रॉयल्सच्या विजयी घोडदौडीला ग्रहण लागल्यासारखं झालं होतं.
 
मात्र महत्त्वाच्या नॉकआउट सामन्यात राजस्थान रॉयल्सनं बहुतांश क्षणी दबाव राखण्यात यश मिळवलं होतं.
 
याची सुरूवात झाली न्यूझीलंडचा मास्टर स्विंग गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्या भेदक गोलंदाजीने.
 
पहिल्या तीन षटकांमध्ये फक्त सहा धावा देऊन बोल्टने प्रतिस्पर्धी कॅप्टन डू प्लेसीचा बळी मिळवला होता. बोल्टला जर नशीबाची साथ लाभली असती तर त्याने आणखी 2-3 गडी सहज बाद केले असते.
 
अश्विनचा अनुभव
बोल्टने 4 षटकांमध्ये 19 धावा देऊन एक गडी बाद करून जबरदस्त कामगिरी करून दाखवली. त्याचप्रमाणे या महत्त्वाच्या सामन्यात आर अश्विननं आपल्या अनुभवाने कमाल केली.
 
अश्विनने 4 षटकांच्या गोलंदाजीमध्ये प्रतिस्पर्धी संघावर प्रचंड दबाव ठेवला होता. त्याचबरोबर त्याने कॅमेरुन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद करून आपल्या संघाचा मार्ग सुकर केला होता.
 
याचबरोबर अश्विनने फक्त 19 धावा दिल्या. त्यामुळेच त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं.
 
आयपीएलच्या सध्याच्या मोसमात आतापर्यत एक गोलंदाज म्हणून अश्विनची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. मात्र, ज्या पद्धतीनं त्यानं आपल्या खेळाचा दर्जा उंचावला आहे, त्यातून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी संघात अश्विनचा समावेश करण्याबद्दल भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा का बोलत होता.
 
बोल्ट-अश्विन यांच्या भेदक आणि किफायतशीर गोलंदाजीसमोर जलदगती गोलंदाज आवेश खानने चार षटकांमध्ये दिलेल्या 44 धावा थोड्या जास्त वाटत होत्या.
 
मात्र ज्या पद्धतीनं त्याने रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक सारख्या फलंदाजांना मोक्याच्या क्षणी पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले, त्यामुळे या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बेंगळूरू संघांला किमान 20 धावांचा फटका बसला.
 
हा सामना हारल्यानंतर डू प्लेसीनं मान्य केलं की त्यांच्या फलंदाजांना मोकळेपणानं खेळता आलं नाही.
 
यशस्वीची फलंदाजी
या खेळपट्टीवर कोणत्याच फलंदाजाला मनमोकळी फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळेच या सामन्यात एकदेखील अर्धशतक फटकावलं गेलं नाही.
 
एक फलंदाज मात्र सहज अर्धशतक पूर्ण करेल असं वाटत होतं. अर्धशतकासाठी 5 धावांची गरज असताना त्याने एक असा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला की ज्यानंतर तो स्वत:लाच दोष देत पॅव्हेलियनकडे परतला.
 
तरुण सलामीवर फलंदाज यशस्वी जायसवालनं आयपीएलच्या या संपूर्ण मोसमात फार प्रभावी फलंदाजी केलेली नाही. मात्र जेव्हा जेव्हा त्याने चांगल्या धावा केल्या तेव्हा त्याच्या संघाला विजय मिळाला आहे.
 
30 चेंडूमध्ये 45 धावा करणाऱ्या यशस्वी जायसवालने या सामन्यात एकही षटकार ठोकला नाही. मात्र अधूनमधून 8 चौकार ठोकून त्याने धावगती मात्र नक्कीच नियंत्रणात ठेवली.
 
आणखी एक तरुण खेळाडू रियान पराग यानं 26 चेंडूमध्ये 36 धावा काढल्या. तर शिमरन हेटमायरनं 14 चेंडूमध्ये 26 धावा ठोकल्या.
 
त्याचा कॅरेबियन साथीदार असलेल्या रॉवमन पावेलनं 8 चेंडूमध्ये 16 धावा काढून कोणत्याही प्रकारच्या चमत्काराद्वारे कमबॅक करण्याच्या आरसीबीच्या आशा धुळीस मिळवल्या.
 
मोहम्मद सिराजनं शेवटच्या षटकांमध्ये आपल्या गोलंदाजीद्वारे जोरदार प्रयास केलेत हा भाग वेगळा.
 
कोहलीचं व्यक्तिमत्व
सिराजने 18 व्या षटकात पराग आणि हेटमायर यांना बाद करून रॉयल्सच्या मनात थोडी आशा नक्कीच निर्माण केली होती.
 
एक प्रकारे पाहिल्यास दोन्ही संघांच्या फलंदाजांना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल थोडी तक्रार होती.
 
नाणेफेक जिंकल्याचा फायदा रॉयल्सला नक्कीच मिळाला आणि त्याचा प्रभाव सामन्याच्या निकालावरदेखील झाला.
 
बेंगळूरूच्या संघाच्या मनात ही गोष्टी नक्कीच आलीअसेल की कोहलीनं या सामन्यात तीन चौकार आणि एक षटकार ठोकूनदेखील 24 चेंडूमध्ये फक्त 33 धावाच केल्या.
 
बेंगळूरच्या अपयशाचा जेव्हा विचार केला जाईल तेव्हा स्वाभाविकपणे संघातील कोहली सारख्या बड्या खेळाडूचं नाव समोर येतं.
 
जरी अधिकृतपणे कोहली या संघाचा कॅप्टन नसला तरी नेतृत्वगुण म्हणून ड्रेसिंग रुममधील त्याचा प्रभाव डू प्लेसीपेक्षा जास्तच असेल कमी नक्कीच नाही.
 
भारतीय क्रिकेटप्रेमींना या गोष्टीमुळे धीर मिळू शकतो की कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गज खेळाडूंना यंदाच्या आयपीएलमध्ये यश मिळालं नाही. आता हे दोन्ही खेळाडू दोन दिवसांनंतर अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होतील.
 
आता कॅरेबियन धर्तीवर टी20 वर्ल्ड कप जिंकणं महत्त्वाचं आहे. एकत्रितपणे क्रिकेटच्या या फॉरमॅटमधील ट्रॉफी जिंकण्याची या दोघांसाठी कदाचित ही शेवटची संधी असेल. त्यामुळेच हा एक आठवड्याचा अतिरिक्त वेळ या दोघांना जिद्दीने खेळण्यासाठी प्रेरित करेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती