IPL 2024 चा 17 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने 19.5 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले.
शशांक सिंगने 29 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 61 धावांची नाबाद खेळी करत पंजाब किंग्जला गुजरात टायटन्सवर विजय मिळवून दिला. आयपीएलच्या चालू मोसमातील चार सामन्यांमधला पंजाबचा हा दुसरा विजय आहे. पंजाबला याआधीच्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र संघाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुजरातचा घरच्या मैदानावर पराभव केला.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिलच्या 48 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर केलेल्या नाबाद 89 धावांच्या जोरावर चार गडी गमावून 199 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही, पण इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात उतरलेल्या शशांक आणि आशुतोष शर्माने संघाला सामन्यात परत आणले. या दोन फलंदाजांच्या जोरावर पंजाबने एक चेंडू बाकी असताना सात विकेट्सवर 200 धावा करून विजयाची नोंद केली. पंजाबने या मोसमातील सर्वात मोठे लक्ष्य यशस्वीपणे गाठले.