आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2024मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक खेळीनंतर हैदराबादने शाहबाज अहमदच्या अर्धशतकाच्या बळावर 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 266 धावा केल्या. हैदराबादने 250 पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार करण्याची ही तिसरी वेळ होती. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा हैदराबादचा संघ संयुक्तपणे पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडच्या कौंटी क्लब सरेनेही तीन वेळा टी-20 फॉर्मेटमध्ये 250 हून अधिक धावा केल्या आहेत.
याआधी याच हंगामात हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध तीन विकेट गमावत 287 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारण्याची ही तिसरी वेळ होती. हैदराबाद संघ हा IPL मधील एकमेव संघ आहे ज्याने IPL मध्ये 250+ धावा केल्या आहेत. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि हैदराबाद संघाने दोनदा अशी कामगिरी केली होती, मात्र आता हैदराबादने आरसीबीला मागे टाकले आहे.
सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या बनवण्याचा विक्रम केला आहे, परंतु त्यांनी दिल्लीविरुद्ध आयपीएलची चौथी सर्वोच्च धावसंख्या केली आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च पाचपैकी तीन सर्वाधिक धावा हैदराबादकडे आहेत. विशेष म्हणजे हैदराबादने या मोसमातच हे सर्व स्कोअर केले आहेत.
दिल्लीविरुद्ध ज्या स्फोटक शैलीने फलंदाजी केली त्यामुळे हैदराबादने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. हैदराबाद संघ आयपीएलच्या इतिहासात पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला आहे. 10 षटक संपल्यानंतर हैदराबादने चार षटकांत 158 धावा केल्या आणि त्याच हंगामात मुंबईविरुद्ध दोन गडी गमावून 148 धावा करण्याचा स्वतःचा विक्रम मोडला.