स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकसत्र सुरूच

WD
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटकसत्र सुरूच आहे. फिक्सिंगप्रकरणी आणखी एक क्रिकेटपटू आणि बुकीला अटक करण्यात आली आहे.

रणजीपटू आणि चंडीलाचा मित्र बाबूराव यादव याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो रेल्वेचा खेळाडू आहे. तर तिकडे तामिळनाडूमध्ये प्रशांत नावाच्या बुकीला अटक करण्यात आली आहे. यादव हा चंडिलाचा मित्र आहे. यादवनेच चंडिलाची सट्टेबाज सुनिल भाटियाशी गाठ घालून दिली होती. त्यामुळे फिक्सिंगबाबत त्याचाही संबंध असून, त्याची चौकशी केली जात आहे. यापूर्वी भाटियाला अटक करण्यात आली आहे. यादव हा फिक्सिंगप्रकरणात अटक करण्यात आलेला, सहावा खेळाडू आहे. यापूर्वी श्रीशांत, अंकित चव्हाण, अजित चंडिला, अमित सिंग आणि मनिष गुड्डेवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी कोणाला अटक होणार याकडे आता लक्ष लागले आहे.फिक्सिंगप्रकरणात आत्तापर्यंत १९ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आयपीएलचे तीन खेळाडू, चार माजी क्रिकेटर आणि १२ सट्टेबाजांचा समावेश आहे.दरम्यान, पोलिस श्रीशांत, चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा