चेन्नई फायनलमध्ये

WD
फेरोजशहा कोटला मैदानावर मुंबई इंडियन्सचा ४८ धावांनी पराभव करून चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रूबाबात प्रवेश केला. शानदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर चेन्नईने हे यश मिळवले. चेन्नईच्या तुलनेत मुंबईच्या फलंदाजी फिकी पडले. सलामीवीर ड्वेन स्मिथच्या तुफानी ६८ धावा वगळता अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. मायकेल हसी सामनावीर ठरला.

१९३ धावांचा पाठलाग करताना मुंबईला चांगला प्रारंभ मिळाला नाही. तारे अवघ्या सात धावांवर बाद झाला. त्यानंतर स्मिथ आणि कार्तिकने दुस-या विकेटसाठी ७५धावांची तुफानी भागीदारी केली. यात स्मिथचा वाटा मोठा होता. स्मिथने केवळ २८ चेंडूत ६८ धावांचा पाऊस पाडताना ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्यानंतर मुंबईच्या फलंदाजीचे अक्षरश: धिंडवडे उडाले. एकही मोठी भागीदार झाली नाही. कार्तिक ११ धावांवर बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा ८ धावांवर परतला. तर ज्याच्यावर खूप आशा होत्या तो केरॉन पोलार्ड २४ धावा काढून बाद झाला. त्याने १ चौकार आणि २ षटकार ठोकले. रायडू -१५, हरभजन -०, जॉन्सन - ६. आणि त्यानंतर ३ भोपळे अशी धावसंख्या निघाली. मुंबईच्या घसरगुंडीस प्रारंभ केला तो रवींद्र जडेजाने त्याने ३१ धावांत ३ बळी घेतले. त्यावर शेवटचा हात फिरवताना ब्राव्होने ९ धावांत ३ बळी घेतले. आयपीएल स्पर्धेत पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सविरूद्ध १ बाद १९२ अशी दणदणीत धावसंख्या उभी केली ती माईक हसी आणि सुरेश रैनाच्या जंगी खेळ्यांच्या जोरावर. दोघांनीही नाबाद अर्धशतके फडकावली. हसीने ५८ चेंडूत ८६ तर रैनाने ४२ चेंडूत ८२ धावा काढल्या.

टॉस धोनीने जिंकला आणि फलंदाजी घेतली. हसी- मुरली विजयने ४४ चेंडूत ५२ धावांची सलामी दिली. २० चेंडूत २३ धावा काढणारा विजय पोलार्डच्या चेंडूवर स्मिथद्वारा झेलबाद झाला. हसी सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याने एका बाजूने धावा झोडपणे सुरूच ठेवले. हसीने ४० चेंडूत अर्धशतक काढताना ७ चौकार ठोकले. रैनाने हसीला सुरेख साथ दिली. त्याने प्रारंभापासूनच षटकारांचा भडीमार सुरू केला. रैनाने केवळ २९ चेंडूत अर्धशतक ठोकताना २ चौकार आणि ४ षटकार ठोकले. चेन्नईच्या १०० धावा ७६ चेंडूत तर दीडशे धावा १०१ चेंडूत पूर्ण झाल्या. या जोडीने ७६ चेंडूत १४० धावांची भर टाकली. मुंबईच्या जॉन्सन, मुनाफ पटेल, मलिंगा आणि ओझाला खरपूस मार मिळाला. जॉन्सनने ४०, पटेलने ३ षटकांत ३२, मलिंगाने ४५ तर ओझाने २ घटकांत २० धावा दिल्या. रैनाने प्रत्येकी ५ चौकार आणि षटकार ठोकले.

वेबदुनिया वर वाचा