महेंद्रसिंग धोनी म्हणतो, 'मी पुन्हा येईन'

मंगळवार, 30 मे 2023 (11:45 IST)
“चाहत्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे मी भारावून गेलो आहे. त्यामुळेच पुढच्या हंगामात मी येऊन खेळणं हे चाहत्यांना माझ्याकडून गिफ्ट असेल”, असं सांगत महेंद्रसिंग धोनीने मी पुन्हा येईन हे स्पष्ट केलं आहे.
 
जेतेपदाचा करंडक उंचावण्यापूर्वी समालोचक हर्षा भोगले यांच्याशी बोलताना धोनीचा स्वर कातर झाला होता.
 
41वर्षीय धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाचव्या जेतेपदाला गवसणी घातली.
 
गुडघ्याच्या दुखापतीमुळे तसंच वयामुळे हा धोनीचा शेवटचा हंगाम असेल अशी चिन्हं दिसत होती.
 
संपूर्ण हंगामात धोनीला यासंदर्भात अनेकदा विचारण्यात आलं. पण त्याने स्पष्टपणे काहीही सांगितलं नाही. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतली आहे.
 
धोनी म्हणाला, “तुम्ही परिस्थितीनुरुप बघितलंत तर मी आता निवृत्तीची घोषणा करणं उचित होईल. माझ्यासाठी चाहत्यांचे आभार मानून येतो म्हणणं सोपं आहे पण आणखी आठ-नऊ महिने स्वत:ला फिट ठेवणं हे माझ्यासाठी आव्हान असेल. पण हे आव्हान स्वीकारून आणखी एक आयपीएलचा हंगाम खेळण्याचा माझा प्रयत्न असेल. शरीराने साथ द्यायला हवी”.
 
“संपूर्ण हंगामात आम्ही जिथे जिथे खेळलो तिथे चाहत्यांनी माझ्यावर कौतुकाचा, प्रेमाचा वर्षाव केला. त्यामुळेच त्यांच्यासाठी मी आणखी एक हंगाम खेळायला उतरेन. माझ्याकडून त्यांच्यासाठी हे गिफ्ट असेल. याच मैदानावर हंगामाची पहिली लढत झाली. मी कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. मी मैदानात येताच लाखभर चाहत्यांनी माझ्या नावाचा गजर केला. तो क्षण भावुक करणारा होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं. चेन्नईत तर याची अनुभूती नेहमीच येते. पुढच्या हंगामात येऊन खेळणं ही चाहत्यांप्रती कृतज्ञता असेल”, असं धोनीने सांगितलं.
 
“चाहत्यांना मी आपलासा वाटतो कारण मी अपारंपारिक स्वरुपाचं खेळतो. मी कोणासारखं व्हायला गेलो नाही. जसा आहे तसा राहिलो. मला गोष्टी साध्या राहिल्या तर आवडतं”, असं धोनी म्हणाला.
 
दडपणाचा सामना कसा करतोस या प्रश्नावर धोनी म्हणाला, “आयपीएल असो किंवा दोन देशांमधली मालिका-आव्हान खडतरच असतं. दडपणाच्या क्षणी खेळ उंचावणारे खेळाडू संघात असणं आवश्यक असतं. प्रत्येक खेळाडूची दडपण पेलण्याची क्षमता वेगवेगळी असते. आम्ही त्यानुसार खेळाडूंशी बोलतो. त्यांची संघातली भूमिका स्पष्ट करुन देतो. अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू हे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना फार काही सांगण्याचा प्रश्न येत नाही पण युवा खेळाडूंच्या मनात संभ्रम असतो. मी तसंच कोचिंग टीम त्यांच्याशी बोलून त्याचं निराकरण करतो”.
 
आयपीएल फायनल अंबाती रायुडूसाठी शेवटचा सामना होता. रायुडूबद्दल बोलताना धोनी म्हणाला, “अंबाती रायुडू हा खास खेळाडू आहे. तोही माझ्यासारखाच अतिशय कमी फोन वापरतो. आम्ही भारत अ संघासाठी एकत्र खेळलो. आयपीएलमध्ये आता इतकी वर्ष एकत्र खेळतोय. रायुडू हा संघासाठी सर्वतोपरी योगदान देणारा खेळाडू आहे. रायुडू नेहमीच 100 टक्के योगदान देतो. फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही आक्रमणांचा समर्थपणे सामना करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. तो खास काहीतरी करुन दाखवेल याची मला खात्री होती. फायनलसारख्या दडपणाच्या लढतीतही त्याने सर्वोत्तम खेळ केला”.
 
महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आयपीएल स्पर्धेची 5 जेतेपदं नावावर आहेत.
 
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या जेतेपदांच्या विक्रमाशी धोनीने 41व्या वर्षी बरोबरी केली आहे.
 
धोनीच्याच नेतृत्वात भारतीय संघाने 2007 साली पहिलावहिला ट्वेन्टी20 वर्ल्डकप जिंकला होता.
 
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2011 वनडे वर्ल्डकप पटकावला होता.
 
2013 साली धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. भारतीय संघ आणि आयपीएल यांना जेतेपदं मिळवून देण्याची धोनीची हातोटी विलक्षण अशी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती