राहुलच्या पंजाबपुढे विराटसेनेच्या बंगळुरूचे कडवे आव्हान

शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (15:48 IST)
सलग खराब कामगिरीमुळे बॅकफुटवर गेलेल्या पंजाब किंग्जला आयपीएलमध्ये विजयी सूर गवसण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूध्द शुक्रवारी होणार्याग सामन्यात आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागणार आहे. पंजाबपुढे बंगळुरूचे कडवे आव्हान असणार आहे, कारण बंगळुरूचा संघ प्रत्येक विभागात दमदार कामगिरी करत आहे. पंजाबचे चार पराभव व दोन विजयासह चार गुण झाले  आहेत. तर बंगळुरूचे पाच विजयासह दहा गुण झाले आहेत.
 
बंगळुरूचा एमकेव पराभव चेन्नई सुपरकिंग्जकडून झालेला आहे. स्पर्धेत खिताब जिंकण्याच्या दृष्टीने बंगळुरूचे बरेच खेळाडू चांगल्या लयीत दिसत आहेत. पंजाबला त्यांच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे नुकसान सोसावे लागत आहे. त्यांना सहापैकी तीन सामन्यांमध्ये सव्वाशे धावसंख्येचा आकडाही गाठता आलेला नाही. कर्णधार राहुलकडून संघाला चांगल्या सुरूवातीची अपेक्षा आहे. तर मयंक अग्रवाल चांगल्या सुरूवातीचा लाभ उठविण्यात अपयशी ठरत आहे. 
 
स्फोटक ख्रिस गेल सहापैकी केवळ दोन सामन्यांमध्येच चमकला आहे. निकोलस पूरनऐवजी डेव्हिड मलानला संघात घेतले पाहिजे, असा एक मतप्रवाह आहे. ज्यावेळी संघ मोठी धावसंख्या उभारू शकत नाही, त्यावेळी पंजाबचे गोलंदाज कोणताही चमत्कार दाखवू शकत नाहीत. त्यांच्या गोलंदाजीत आक्रमकतेचा अभाव दिसत आहे. दुसरीकडे बंगळुरूचा संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसत आहे. एबी डिव्हिलिअर्सने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. तर गोलंदाजांनी मिळवून चांगल्या प्रयत्नाने संघाला पाचवा विजय मिळवून दिला आहे. त्यांची फलंदाजी विराट कोहली, देवदत्त पड्रिकल, डिव्हिलिअर्स व ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर बरीच अवलंबून आहे. 
 
या चौघांच्या चांगल्या कामगिरीआधारेच बंगळुरू बाजी मारताना दिसत आहे. रजत पाटीदार व कायले जेमीसन हेदेखील तळात धावा करताना दिसत आहे. तर गोलंदाजीत हर्षल पटेल व मोहम्मद सिराज चांगली कामगिरी करत आहेत.
 
आजचा सामना : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स 
स्थळ : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद 
वेळ : संध्या. 7.30 वाजता 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती