दिल्लीचा पंजाबवर 7 गडी राखून विजय

सोमवार, 3 मे 2021 (08:21 IST)
सलामीवीर  शिखर धवनने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर 7 गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करत कर्णधार मयंक अग्रवालने केलेल्या 99 धावांच्या नाबाद खेळीमुळे पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला 167 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने 3 गडी गमावत 17.4 षटकातच हे लक्ष्य गाठले.
 
पंजाबच्या 167 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सामनावीरचा मान पटकावलेला फिरकीपटू हरप्रीत ब्रार पुन्हा एकदा पंजाबसाठी धावून आला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात पृथ्वीची दांडी गुल केली. पृथ्वीने 3 चौकार व 3 षटकारांसह 39 धावांची खेळी केली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला साथीला घेत शिखर धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. रिले मेरिडिथने स्मिथला 24 वर बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. विजयाच्या जवळ पोहोचताना ऋषभ पंतने मोठा फटका खेळण्याच्या नादात आपला बळी दिला. पंतनंतर शिमरोन हेटमायरने 4 चेंडूत 16 धावा कुटत विजयावर शिक्कामोर्तब केले. धवनने 6 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 69 धावांची खेळी केली.
 
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 166 धावा केल्या. के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत प्रभासिमरन सिंगसह कर्णधार मयंक अग्रवालने सलामी दिली. मात्र, दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने प्रभासिमरनला 12 धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. रबाडाने गेलचा त्रिफळा उडवला. पदार्पणाचा सामना खेळणार्‍या डेव्हिड मलानने अग्रवालसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू अक्षर पटेलने मलानची दांडी गुल करत पंजाबला तिसरा धक्का दिला. मलान बाद झाल्यानंतर मयंकला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्याने एका बाजूने संघाला सावरले. मयंकने 58 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांसह 99 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 4 षटकात 36 धावा देत 3 बळी टिपले. आवेश खान व अक्षरला प्रत्येकी 1 बळी घेता आला.
आजचा सामना
कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
ठिकाण ः नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.
वेळ ः सायंकाळी 7.30 वाजता.
इथे पहा लाइव्ह ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क व हॉटस्टार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती