आयपीएलमध्ये हवेत पाकिस्तानी खेळाडू: ऋषी कपूर

मुंबई- इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनाही सहभागी करून घ्यावे, अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रद्रोही असा वाद पेटला आहे.
 
आयपीएल स्पर्धेच्या दहाव्या मोसमाला आजपासून सुरूवात होत आहे. भारतात होत असलेल्या या स्पर्धेत पाकिस्तान वगळता सर्व देशांच्या खेळाडूंचा सहभाग आहे. भारत पाकमधील परंपरागत वादामुळे पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळू देण्यास अनेक राजकीय पक्ष व संघटनांचा विरोध आहे. मात्र, पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या सहभागाशिवाय अनेक क्रिकेटप्रेमींना ही स्पर्धा अपुरी वाटत आहे. ऋषी कपूर यांनी ट्विटद्वारे तीच भावना व्यक्त केली आहे.
 
आयपीएलमध्ये एकापेक्षा एक क्रिकेटपटू आहेत. अफगाणिस्तानचेही खेळणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचाही विचार व्हावा असे मला वाटते. तरच खरा सामना होईल. आपण मोठे लोक आहोत. कृपया विचार करा असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे. तर, पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ले व शहिदांचे दाखले देऊन काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.
 
आयपीएलचा यंदाचा हंगामा हा बहुविध कारणांनी महत्त्वाचा ठरतो आहे. गेल्या दहा वर्षांपासून क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणार्‍या या महाकुंभामध्ये यंदा अफगाणिस्तानातील क्रिकेटपटूंचीही वर्णी लागली आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्यांमध्ये वेगळीच रंगत पाहता येणार हे तर नक्की. पण, आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनाही संधी द्यावी, अशी मागणी करत याप्रकरणी ऋषी कपूर यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

वेबदुनिया वर वाचा