डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची नवी रणनीती काय असेल?
बुधवार, 24 जुलै 2024 (12:13 IST)
जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षातील सर्वोत्तम उमेदवार निवडून डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार लढत देण्याचं आव्हान डेमोक्रॅटिक पक्षासमोर आहे.कमला हॅरिस यांचं नाव सध्या उमेदवारीसाठी सर्वांत पुढे आहे.राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षासमोर जे आव्हान आहे त्याचं रूपांतर पक्षाला संधीत करता येईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे.
अमेरिकेतील पेन्सिल्वेनियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला होऊन एक आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र या हल्ल्यामुळे मागील आठ दिवसात अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीची दिशाच बदलली.
थोड्या कालावधीतच डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती वलय निर्माण झालं. या हल्ल्यानंतर झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांचं स्वागत एखाद्या देवदूताप्रमाणे करण्यात आलं.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
त्याउलट विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर फेकले गेले आहेत. बायडन यांना त्यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली.
मागील महिन्यात झालेल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये जो बायडन यांची कामगिरी अत्यंत सुमार होती. या डिबेटचं टीव्हीवर प्रसारण झालं होतं. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षात एकप्रकारची घबराट निर्माण झाली होती.
मात्र ते एवढ्यावरचं थांबलं नाही तर बायडन यांच्या उमेदवारीबद्दलच्या त्यांच्या शंका आणखी वाढत गेल्या.
प्रेसिडेन्शियल डिबेटसाठी बायडन यांनी ट्रम्प यांना आव्हान देण्याआधी बायडन काहीसे मागे पडले होते. निवडणूक प्रचारात मोठी आघाडी घेण्यासाठी बायडन यांना त्यांच्या प्रचार मोहिमेची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता होती.
त्यासाठी ही प्रेसिडेन्शियल डिबेटची कल्पना पुढे आली होती. त्यातून बायडन आपल्या प्रतिस्पर्ध्याला वादविवादातून थेट आव्हान देणार होते.
ट्रम्प जर पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले तर काय करतील यावर मतदारांचं लक्ष केंद्रित केल्यास त्याचा फायदा बायडन यांना होईल आणि त्यांना असलेला पाठिंबा वाढेल असं बायडन यांच्या टीमला वाटत होतं.
बायडन यांची प्रचार मोहीम या गोष्टीवर आधारलेली होती की ट्रम्प यांना निवडून द्यायला हवं की नको या मुद्द्याभोवती जर निवडणूक केंद्रित असेल तर त्याचा फायदा होत आपण विजयी होऊ.
मात्र प्रेसिडेन्शियल डिबेटमधील बायडन यांच्या असंबद्ध भाषणामुळे आणि दिशाहीन कामगिरीमुळे परिस्थिती बदलली.
संपूर्ण निवडणूक लगेचच बायडन यांच्याबद्दल, त्यांच्या तंदुरुस्तीवर, त्यांच्या वयावर आणि ते राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तंदुरुस्त आहेत की नाही या मुद्द्यावर केंद्रित झाली.
डिबेटमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या काही गोष्टी सुस्पष्ट नव्हत्या, सुसंगत नव्हत्या ही बाब अचानक एक उघड गुपित झाली. त्यांना सर्दी होती, त्यांना जेट-लॅग होता (विमान प्रवासानंतर होणारा जाणवणारा थकवा) या सबबी अतिशय तकलादू आणि न पटणाऱ्या होत्या.
डेमोक्रॅटिक पक्षातील अनुभवी, जाणत्या लोकांना सुद्धा यातील संभाव्य संधीची जाणीव झाली. या निवडणुकीत बदल घडवून आणण्याची संधी यात होतीच.
त्याचबरोबर मागील वेळी एकमेकांविरुद्ध लढलेल्या त्याच दोन वृद्ध व्यक्तींमधून निवड करावी लागणार असल्यामुळं प्रचंड नाराज झालेल्या मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याची संधी या परिस्थितीत होती.
डेमोक्रॅटिक पक्षाला नवीन उमेदवार निवडण्याची प्रक्रिया लगेच करावी लागेल. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात 19 ऑगस्टला त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.
मात्र त्याचवेळी पक्षातील प्रतिभावान आणि तरुण अनुभवी उमेदवारांबरोबर चार आठवडे वादविवाद, राजकीय घडामोडी, भाषणं आणि कार्यक्रम अतिशय रोमांचक ठरू शकतात. यातून नव्या उमेदवारासाठी आवश्यक असलेलं लक्ष वेधलं जाऊ शकतं.मात्र असं दिसतं आहे की डेमोक्रॅटिक पक्ष राष्ट्राध्यक्षपदाचा नवीन उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या पाठीशी वेगानं एकत्र होतो आहे. त्यामुळे निवडून आलेले अनेक प्रतिनिधी, सिनेटर्स आणि पक्षातील जुने जाणते लोक कमला हॅरिस यांना पाठिंबा देत आहेत. जेणेकरून त्यांच्याविरोधात आव्हान उभं राहू नये.
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसन, मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचेन विटमर किंवा पेन्सिल्वेनियाचे गव्हर्नर जॉश शापिरो यासारखे कमला हॅरिस यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण करू शकणारा कोणताही दावेदार या स्पर्धेत उतरणार नाही असं दिसतं आहे.कारण बहुधा कमला हॅरिस यांनाच उमेदवार म्हणून घोषित करायचं अशी डेमोक्रॅटिक पक्षाची मानसिकता झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमेभोवती रिपब्लिकन पक्ष एकत्र आल्याचं डेमोक्रॅटिक पक्षानं नुकतंच पाहिलं आहे. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य त्यांच्या उमेदवाराला फक्त पाठिंबाच देत नाही, तर ते त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्याविषयी आदर बाळगतात.
ट्रम्प यांना त्यांच्या पक्षाने प्रचंड पाठिंब्यानिशी उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. सध्या त्यांच्या उमेदवारीभोवती मोठे वलय निर्माण झाले आहेत.अशावेळी डेमोक्रॅटिक पक्षातील मोठा वर्ग कमला हॅरिस यांच्या उमेदवारीबाबत उत्साही नसण्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना लढत देणं हे नक्कीच खूपच आव्हानात्मक आहे.
जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्याच्या काही दिवस आधी, डेमेक्रॅटिक पक्षाच्या एका सदस्यानं मला सांगितलं होतं की "कमला हॅरिस यांचं व्यक्तिमत्त्व अजिबात प्रभावी नाही. त्यांच्याकडे कोणताही विचारधारा नाही किंवा नैतिक अधिष्ठान देखील नाही." मात्र त्यांनी सांगितलं होतं की बायडन यांना उमेदवारीतून माघार घ्यायला लावण्यासाठी जर आवश्यक असेल तर ते कमला हॅरिस यांना पाठिंबा देतील.
कमला हॅरिस आपला सहकारी म्हणजेच उपराष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून कोणाची निवड करतात याबाबत सर्वाधिक स्पर्धा किंवा संघर्ष होऊ शकतो. माजी राष्ट्राध्यक्षांच्या (ट्रम्प) विरोधात लढत असलेल्या या निवडणुकीत मतदारांचं लक्ष वेधून घेणं हे डेमोक्रॅटिक पक्षासमोर सर्वांत मोठं आव्हान असणार आहे. कारण निवडणूक प्रचारात डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं स्वत:कडे लक्ष वेधून घेत आहेत. निवडणूक त्यांच्याभोवती केंद्रित होते आहे.
"कधीही एखादं गंभीर संकट वाया जाऊ देऊ नका" हे राहम इम्यॅन्युएल (Rahm Emanuel) यांचं आवडतं सुभाषित आहे. ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊसमधील चीफ ऑफ स्टाफ होते. बहुधा त्यांनी हे सुभाषित चर्चिलकडून घेतलं असावं. या वाक्याचा अर्थ असा की संकट म्हणजे तुम्ही आधी कधीही न केलेली गोष्ट करण्याची संधी असते.
जो बायडन यांच्या प्रेसिडेन्शियल डिबेट मधील खराब कामगिरीनंतर उद्भवलेल्या संकटावर डेमोक्रॅटिक पक्षानं याच प्रकारे ताबा मिळवला आहे आणि संकटातील या संधीचा वापर आगामी निवडणुकीची दिशा बदलण्यासाठी केला आहे. स्वत: बायडन यांनी म्हटलं आहे की अमेरिकेच्या लोकशाहीचं भवितव्य ठरवण्यासाठी या निवडणुकीचा निकाल अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे देशाच्या लोकशाही संस्थांच्या अस्तित्वाला धोका आहे.अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकेल असा उमेदवार शोधण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. या निवडणुकीत परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की डेमोक्रॅटिक पक्षानं आपल्या विद्यमान राष्ट्राध्यक्षाला उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलं. मात्र बायडन यांच्या जागी सर्वोत्तम उमेदवाराची निवड खुल्या स्पर्धेद्वारे करण्याइतकं धाडस कदाचित ते दाखवणार नाहीत.