कमला हॅरिस यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीला बायडन यांचा पाठिंबा

सोमवार, 22 जुलै 2024 (09:51 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. 'पक्ष आणि देशाच्या हितासाठी' हा निर्णय असल्याचं सांगत बायडन यांनी ही घोषणा केली.
 
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघ्या 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, बायडन यांनी हा निर्णय घेतला आहे. बायडन यांनी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे कमला हॅरिस याच डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सर्वांत प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
 
या निर्णयानंतर आता व्हाइट हाऊससाठीच्या स्पर्धेत रंगत भरली जाणार आहे.
 
जूनच्या अखेरीस झालेल्या डिबेटमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरील कामगिरी निराशाजनक होती.
 
त्यांतर बायडन यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी डेमोक्रॅट नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दबाव आणण्यात आला होता.
 
रविवारी बायडन यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
 
सोशल मीडियावर याबाबत बायडन यांनी एक पोस्ट केली. त्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडणं, हा त्यांच्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान होता असं म्हटलं आहे.
 
या निर्णयानंतर बायडन यांनी त्यांच्या सहकारी कमला हॅरिस यांचे आभार मानले. त्या 'असामान्य पार्टनर' आहेत असं बायडन यांनी म्हटलं आहे.
 
गेल्या आठवड्यामध्ये बायडन यांना कोव्हिडची लागण झाली होती. त्यानंतर ते त्यांच्या डेलावेयर राज्यात परतले होते.
 
त्यावेळी बायडन यांनी कोव्हिडबाबत माहिती देताना, पुढच्या आठवड्यापर्यंत निवडणूक प्रचारात परतण्याची आशा व्यक्त केली होती.
 
दरम्यान, यापूर्वी राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीतून माघार घेण्याबाबत बोलताना बायडन यांनी, फक्त ईश्वरच त्यांची उमेदवारी मागे घेऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं.
 
पण, त्यानंतर बायडन असंही म्हणाले होते की, आरोग्यविषयक काही त्रास झाला तर ते त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा विचार करू शकतात.
 
कमला हॅरिस यांना पाठिंबा
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये बायडन यांनी विद्यमान उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.
 
बायडन म्हणाले की, "माझ्या डेमोक्रॅट्स मित्रांनो. मी उमेदवारी स्वीकारण्यास नकार देण्याचा आणि सर्व ऊर्जा उर्वरित कार्यकाळात कर्तव्यांचं पालन करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये पक्षाचा उमेदवार म्हणून माझा सर्वांत पहिला निर्णय उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना निवडणं हा होता. तो माझा सर्वोत्तम निर्णय होता."
 
"आजही कमला हॅरिस यांच्या नावाला पक्षाच्या उमेदवार म्हणून पूर्णपणे पाठिंबा देत आहे. डेमोक्रॅट्स-आता एकजूट होऊन ट्रम्प यांना पराभव करण्याची वेळ आली आहे," असंही ते म्हणाले.
 
निर्णयावर ट्रम्प काय म्हणाले?
जो बायडन यांच्या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथसोशल वर प्रतिक्रिया दिली आहे.
 
बायडन कधीच राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी फिट नव्हते, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळं ते राष्ट्राध्यक्षपदासाठीही फिट नाही आणि कधीही नव्हते, असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
 
ट्रम्प यांनी बायडन यांना कपटीही म्हटलं आहे.
 
"ते खोट्या, बनावट बातम्यांच्या आधारे राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचले. ते तर बेसमेंटमधून बाहेरही पडले नाही. त्यांच्या आजू-बाजूच्या सर्व लोकांना अगदी त्यांच्या डॉक्टर आणि माध्यमांनाही ते राष्ट्राध्यक्ष पदासाठी सक्षम नाही आणि नव्हते हे माहिती होतं," अशी टीकाही ट्रम्प यांनी केली.
 
"पाहा, त्यांनी आपल्या देशाची काय अवस्था केली आहे. लाखो लोक आपली सीमा ओलांडून देशात येत आहेत. त्यांची कोणतीही चौकशी होत नाही. अनेकजण तुरुंगांमधून आणि मानसिक आरोग्य केंद्रांमधूनही येत आहेत," असा दावाही ट्रम्प यांनी केला.
 
ट्रम्प पुढं म्हणाले की, "विक्रमी संख्येनं दहशतवादी येत आहेत. त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळामुळं आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यांनी जे नुकसान केलं, ते आपण लवकरच भरुन काढू."
 
आणखी काय म्हणाले बायडन?
जो बायडन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक नोट पोस्ट केली आहे.
 
त्यात बायडन यांनी लिहिलं की, "गेल्या साडे तीन वर्षांमध्ये आम्ही देश म्हणून खूप प्रगती केली आहे. आज अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था आहे. राष्ट्राला पुन्हा उभं करण्यासाठी आपण ऐतिहासिक गुंतवणूक केली. ज्येष्ठांसाठी औषधांच्या किमती कमी केल्या. तसंच विक्रमी संख्येत अमेरिकेच्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या."
 
जो बायडन यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये, गन सेफ्टी लॉ, सुप्रीम कोर्टातील आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या जजची नियुक्ती, लाखो माजी सैनिकांसाठीच्या सुविधा आणि संसदेत मंजूर केलेल्या अनेक कायद्यांचा उल्लेख केला आहे.
 
बायडन यांनी कोरोना साथीनंतर आलेल्या आर्थिक तंगीच्या संकटातून देशाला बाहेर आणल्याचा उल्लेखही पोस्टमध्ये केला आहे. "आम्ही लोकशाहीला वाचवलं आणि संरक्षण केलं," असंही बायडन म्हणाले.
 
निवडणूक, त्यानंतर निकाल आणि निकालानंतर नवीन राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी होऊन पदभार स्वीकारण्यापर्यंत काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या काळात बायडन हे राष्ट्राध्यक्ष राहतील आणि आपण आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे बायडन यांनी स्पष्ट केले आहे.
 
बायडन म्हणतात, "राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळणं हा माझ्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान होता. तसंच पुन्हा निवडून यावं अशी माझी इच्छा होती. पण मी माघार घेणं हेच माझ्या आणि देशाच्याही हिताचं आहे, असं मला वाटतं. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उर्वरित कार्यकाळात मी माझ्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करणार आहे."
 
"या निर्णयानंतर मी याच आठवड्यात देशाला संबोधित करणार आहे. मला दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी प्रचंड परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. या सर्व खास कार्यांमध्ये माझ्या सहकारी असलेल्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचेही मी आभार मानतो."
 
जो बायडन यांनी त्यांच्या या नोटच्या शेवटी, अमेरिकेच्या नागरिकांना त्यांच्या विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभर मानले आहेत. "आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहोत, हे आपण लक्षात ठेवायला हवं," असं बायडन म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती