मोदींच्या आघाडी सरकारबद्दल अमेरिकेने नेमकं काय म्हटलं?

गुरूवार, 6 जून 2024 (09:59 IST)
भारतातील लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (4 जून)आले आणि यासोबतच देशातील आगामी सरकार हे आघाडीचे सरकार असेल हेही स्पष्ट झालं आहे.
 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणारा भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकला नाही.
 
भारतीय जनता पक्षाचे 240 खासदार निवडून आले आहेत. भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत.
 
निवडणूक विश्लेषक आणि एक्झिट पोल्सचे अंदाज खोटे ठरवत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने 234 जागा जिंकल्या आहेत.
 
संपूर्ण जगाचं भारताच्या निवडणुकीवर लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचा निकाल आता लागला असून जगभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
 
बुधवारी (5 जून) अमेरिकेच्या सरकारचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी भारतातील निवडणूक निकालांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर सांगितलं की, “आम्ही भारतीय मतदारांच्या इच्छेचा आदर करतो, पंतप्रधान आणि त्यांच्या युतीने बनलेलं सरकार हे लोकांच्या निवडीने बनलेलं सरकार असेल. बायडन प्रशासन मोदींसोबत काम करत आलं आहे आणि त्यात बदल होणार नाही. भविष्यातही आम्ही असंच काम करू.”
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालात विरोधकांनी जोरदार मुसंडी मारत संसदेत पुनरागमन केलं आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होईल आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप '370 जागा' जिंकेल असं भाकीत वर्तवलं होतं.
 
निकाल मात्र वेगळा लागला. भाजपला स्वबळावर बहुमत मिळू शकलं नाही आणि एनडीए देखील 300 चा आकडा गाठू शकली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती