गाझामधलं युद्ध थांबवण्यासाठीच्या इस्रायलच्या नव्या प्रस्तावात कशाचा समावेश? बायडेन यांनी सांगितले

शनिवार, 1 जून 2024 (12:29 IST)
गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इस्रायलनं दिलेला नवा प्रस्ताव हमासनं स्वीकारावा अशी विनंती, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. "गाझामधील युद्ध संपवण्याची वेळ आली आहे," असं बायडेन यांनी म्हटलं आहे. तीन भागांमध्ये विभागलेल्या या प्रस्तावाची सुरुवात सहा आठवड्यांच्या शस्त्रसंधीने होईल. त्यात इस्रायल डीफेन्स फोर्(आयडीएफ) गाझातील नागरी वस्ती असलेल्या भागांमधून मागे हटेल. त्याचबरोबर पुरवल्या जाणाऱ्या मदतीमध्येही वाढ केली जाईल. तसंच काही बंदींच्या मोबदल्यात पॅलिस्टिनी कैद्यांची देवाण-घेवाणही केली जाईल.
 
हमासनंही या प्रस्तावाकडं "सकारात्मक" दृष्टीनं पाहत असल्याचं म्हटलं आहे. शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये बोलताना बायडेन मयांनी या संपूर्ण प्रस्तावाबाबत माहिती दिली. "प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यात ‘पूर्ण शस्त्रसंधी’, दाट लोकवस्ती असलेल्या भागातून आयडीएफची माघार आणि बंदी तसंच पॅलिस्टीनी कैद्यांची सुटका," याचा समावेश असेल असं बायडेन म्हणाले. बायडेन म्हणाले की,"हा प्रत्यक्षात एक निर्णायक क्षण आहे. शस्त्रसंधी हवी असल्याचं हमासचं म्हणणं आहे. पण त्यांची खरंच तशी इच्छा आहे का? हे सिद्ध करण्यची ही संधी आहे." शस्त्रसंधीमुळं युद्धामुळे कठीण परिस्थिती निर्माण झालेल्या भागात अधिक मदत पोहोचू शकेल. रोज 600 ट्रक मदत घेऊन गाझाला जातील, असंही ते म्हणाले. दुसऱ्या टप्प्यात सर्व जिवंत बंदींना सोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यात पुरुष सैनिकांचाही समावेश असेल. त्यानंतर ही शस्त्रसंधीचं रुपांतर "शत्रुत्वाच्या समाप्ती" मध्ये होईल.
 
कायमस्वरुपी शस्त्रसंधी हमासची प्रमुख मागणी
बायडेन यांच्याशिवाय ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमरून यांनीही हमासला या प्रस्तावाला सहमती देण्याची विनंती केली आहे. या संधीचा लाभ घेऊन हा संघर्ष संपवावा असं त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलं. “योग्य पावलं उचलली तर, या संघर्षात काही काळ विराम आला तरी युद्ध कायमचं थांबू शकतं असं आम्ही खूप दिवसांपासून म्हणत आहोत. या संधीचा लाभ घेऊन संघर्ष संपवायला हवा,” असं लॉर्ड कॅमरून म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही एक्सवर याबाबत एक पोस्ट करत याचं स्वागत केलं आहे. "जगानं गाझामध्ये प्रचंड वेदना आणि विनाश पाहिला आहे. आता हे सर्व थांबण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. "राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उचललेल्या पावलाचं मी स्वागत करतो. तसंच शस्त्रसंधी, बंदींची सुटका आणि मदत पोहोचवण्यासह आखाती भागात कायमस्वरुपी शांततेसाठी या संधीचा लाभ घ्यावा," असंही ते म्हणाले. दरम्यान, यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चर्चा कठिण ठरू शकतात, असंही बायडेन यांनी भाषणात मान्य केलं.
 
काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी करारात युद्ध संपवण्याच्या प्रस्तावाचा विरोध केला होता. त्यामुळं बायडेन यांच्याकडून विशेषतः युद्ध संपवण्याचा प्रस्ताव देणं हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यामध्ये या योजनेत आधी चर्चा झालेल्या काही मुद्द्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. पण, अमेरिकेकडून कायमस्वरुपी शस्त्रसंधीची चर्चा होणं हे प्रत्यक्षात हमासला पुन्हा चर्चेसाठी तयार करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी आधीच अनेक अटींसंदर्भात त्यांचा होकार दर्शवला होता. कायमस्वरुपी शस्त्रसंधी हा मुद्दा हमासच्या प्रमुख मागण्यांपैकी एक आहे. तिसऱ्या टप्प्यात इस्रायलच्या अखेरच्या बंदीला सुपूर्त करावं लागेल. तसंच घरं, शाळा आणि रुग्णालयं बनण्यासाठी अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय मदतीनं मोठ्या पुनर्निर्माण योजना अंमलात आणल्या जातील.
 
तीन टप्प्यातील या प्रस्तावाचा इस्रायलच्या सरकारमध्ये असलेल्या काही अधिकारी आणि आणि इतर काही इस्रायलीही विरोध करतील, असंही बायडेन यांनी मान्य केलं. "कोणत्याही प्रकारचा दबाव आला तरी, इस्रायलमधील नेत्यांना मी या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे," असं बायडेन म्हणाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलच्या लोकांना थेट संबोधित केलं. "आपण हा क्षण दवडू शकत नाही,"असं त्यांनी म्हटलं.
 
बायडेन म्हणाले की, हमास आता पुन्हा सात ऑक्टोबरसारखा हल्ला करण्याच्या स्थितीत नाही. हे वक्तव्य म्हणजे इस्रायलसाठी, वॉशिंग्टनच्या दृष्टीनं आता या युद्धाचा उद्देश पूर्ण झाला आहे, याचे संकेत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जोर देत म्हटलं की, युद्ध संपत नाही तोपर्यंत याबाबतचं ध्येय पूर्ण होत नाही. यात सर्व बंदींना सोडणं आणि हमासच्या सैन्य आणि प्रशासकीय यंत्रणेला संपवणं याचा समावेश असून नवीन प्रस्ताव यावरच आधारित आहे. या प्रस्तावात कायमस्वरुपी शस्त्रसंधी, इस्रायली लष्कर गाझामधून बाहेर जाणं आणि पुनर्वसनासह बंदींची देवाण-घेवाण याचा समावेश आहे. त्यामुळं प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचं हमासनं म्हटलंय.
 
हमासने काय म्हटलं?
कायमस्वरुपी शांततेचा उल्लेख आणि इस्रायलची स्पष्ट कटिबद्धता असेल अशा, कोणत्याही प्रस्तावाबाबत "सकारात्मक आणि रचनात्मक" दृष्टीकोनातून विचार करण्यास तयार असल्याचं हमासनं म्हटलं आहे. याबाबत माहिती असलेल्या आणि इस्रायलचा हा नवा प्रस्ताव पाहिलेल्या एका पॅलिस्टिनी अधिकाऱ्यानं सांगितलं की, यात युद्ध संपण्याची किंवा इस्रायलचं सैन्य गाझामधून पूर्णपणे माघार घेण्याबाबत गॅरंटी नाही. कतारमधील काही मध्यस्थांच्या माध्यमातून हा प्रस्ताव हमासपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. गाझामध्ये मृतांची वाढती संख्या पाहता राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना इस्रायलबाबत घेतलेल्या भूमिकेमुळं त्यांच्याच देशाच विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळं दोघांमध्ये तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी वाढत आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला, रफामध्ये सुरू असलेली लष्करी मोहीम लाल रेषा ओलांडेल आणि त्यामुळं अमेरिकेचं धोरण बदलेल असं वाटत नसल्याचं व्हाइट हाऊसनं म्हटलं होतं.
 
गेल्या रविवारी रफावर झालेला इस्रायलचा हवाई हल्ला आणि त्यामुळं लागलेल्या आगीत 45 पॅलिस्टिनी मारले गेले होते, त्यानंतर हे वक्तव्य करण्यात आलं होतं. शुक्रवारी एक वेगळं वक्तव्य करत दोन्ही बाजूंच्या अमेरिकेतील प्रतिनिधींनी नेतन्याहू यांना वॉशिंग्टनमध्ये काँग्रेसला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केलं. पण ते कधी बोलणार आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयानुसार, संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत गाझामध्ये 36,000 लोक मारले गेले आहेत. हमासच्या सदस्यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये सीमेपलिकडून इस्रायलवर हल्ला केला होता. त्यात 1,200 लोक मारले गेले होते. तर 252 जणांना बंदी बनवून गाझाला नेण्यात आलं होतं.
 
Published By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती