अफगाणिस्तानातील मानवी हक्कांच्या परिस्थितीवर वाढत्या चिंतेमध्ये तालिबान आता आपले खरे रंग दाखवत आहे.तालिबानचा सर्वोच्च नेता मौलवी हेबतुल्ला अखुंदजादा याने न्यायाधीशांना देशात इस्लामिक कायदा पूर्णपणे लागू करण्याचे आदेश दिले आहेत.तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, सर्वोच्च नेत्याने न्यायाधीशांच्या गटाची भेट घेतल्यानंतर हैबतुल्ला अखुंदजादा यांचा आदेश आला.
न्यायाधीशांच्या बैठकीत चोर, अपहरणकर्ते आणि देशद्रोही यांच्यावर इस्लामिक कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जबिहुल्ला मुजाहिद यांनी दिली.तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्लामिक अमिरातच्या नेत्याचा आदेश देशभरात लागू केला जाईल.
अफगाण वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, इस्लामिक गट सत्तेत आल्यानंतर तालिबान नेत्याने इस्लामिक कायद्याच्या सर्व पैलूंची संपूर्ण देशभरात पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा औपचारिक आदेश जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तालिबानने सर्व महिलांना नागरी सेवेतील नेतृत्व पदावरून काढून टाकले आहे आणि बहुतेक प्रांतांमध्ये मुलींना माध्यमिक शाळेत जाण्यास बंदी घातली आहे.तालिबानच्या फर्मानमध्ये म्हटले आहे की पुरुष नातेवाईकासोबत असल्याशिवाय महिला प्रवास करू शकत नाहीत.याशिवाय महिलांना संपूर्ण शरीर (चेहऱ्यासह) झाकण्याचा आदेश देण्यात आला आहे.यामध्ये महिला टीव्ही न्यूजकास्टरचाही समावेश आहे.