टायटॅनिक पाहायला गेलेली पाणबुडी अब्जाधीश प्रवाशांसह बेपत्ता, ऑक्सिजनही संपण्याच्या मार्गावर

मंगळवार, 20 जून 2023 (16:43 IST)
मध्य अटलांटिक महासागरामध्ये सध्या एक मोठी शोध मोहीम सुरू आहे. एका पाणबुडीचा तपास घेतला जात आहे. ही पाणबुडी आजही जगभरात चर्चेचा विषय असलेल्या टायटॅनिकला पाहायला पर्यटकांना घेऊन गेली होती.
 
समुद्रात उतरलेल्या या पाणबुडीचा संपर्क रविवारी (18 जून) तुटला आणि तेव्हापासून तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
यूएस कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार पाण्यात उतरल्यानंतर 1 तास 45 मिनिटांनीच या पाणबुडीचा संपर्क तुटला.
 
ओशियनगेट या टूर कंपनीच्या या पाणबुडीमध्ये पाच लोक होते. पाणबुडीच्या शोधासाठी सर्व पर्याय अवलंबले जात आहेत, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
 
या आठ दिवसाच्या पर्यटन यात्रेचं तिकीट जवळपास अडीच लाख डॉलर (जवळपास दोन कोटी रुपये) आहे.
 
या टूरमध्ये पाणबुडी समुद्रात टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या आसपास 3800 मीटर खोल घेऊन जाते.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी तपास यंत्रणा, अमेरिका आणि कॅनडाच्या नौसेना आणि व्यावसायिकरित्या समुद्रात खोलवर जाणाऱ्या कंपन्या या पाणबुडीचा शोध घेत आहेत.
 
टायटॅनिकचे अवशेष कॅनडामधील न्यू फाउंडलँडच्या सेंट जोन्सपासून 700 किलोमीटर दूर अटलांटिक महासागरात आहेत.
 
अर्थात, या पाणबुडीची शोध मोहीम अमेरिकेतील बोस्टनमधून चालवली जात आहे.
 
हरवलेली पाणबुडी ही ओशियन गेट कंपनीची टायटन सबमर्सिकल आहे. ती आकाराने एका ट्रकएवढी आहे आणि त्यात पाच प्रवासी होते. आपात्कालीन परिस्थितीचा विचार करून पाणबुडीमध्ये चार दिवसांपुरता ऑक्सिजन साठा असतो.
 
सोमवारी (19 जून) दुपारी अमेरिकन कोस्ट गार्डचे रियर अ‍ॅडमिरल जॉन मॉगर यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं, “पाणबुडीचा शोध घेण्यासाठी आमच्याकडे 70 ते 96 तास आहेत.”
 
या पाणबुडीच्या शोधासाठी दोन विमानं, एक पाणबुडी आणि सोनार यंत्रणा असलेले तरंगते बांध कार्यरत असल्याचंही मॉगर यांनी सांगितलं.
 
रियर अ‍ॅडमिरल जॉन मॉगर यांनी म्हटलं की, बचाव कार्यात सहभागी झालेले लोक पाणबुडीतील लोकांना शोधणं ही व्यक्तिगत जबाबदारी मानत आहेत आणि त्यादृष्टिने सर्वतोपरी प्रयत्नही करत आहेत.
 
ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार तेसुद्धा या पाणबुडीमध्ये होते.
 
58 वर्षीय हार्डिंग स्वतःही एक एक्सप्लोअरर आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं की, “टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचण्याच्या मोहिमेचा मी सुद्धा एक भाग आहे, याचा मला अभिमान आहे.”
 
त्यांनी असंही म्हटलं होतं की, न्यू फाउंडलँडमध्ये गेल्या चाळीस वर्षांतली सर्वांत भीषण थंडी पडली आहे. त्यामुळेच 2023 मध्ये टायटॅनिकपर्यंत पोहोचणारी ही एकमेव मानवी मोहीम असेल.
 
पुढे त्यांनी लिहिलं, “हवामानामुळे एक संधी मिळाली आहे आणि आम्ही उद्याच बुडी मारण्याचा प्रयत्न करू.”
 
ओशियन गेटने आपल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, त्यांनी पूर्ण लक्ष पाणबुडीमधील प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केंद्रित केलं आहे.
 
कंपनीने म्हटलं, “पाणबुडीसोबत पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये अनेक सरकारी एजन्सी आणि डीप सी कंपन्यांकडून जे व्यापक सहकार्य मिळत आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”
 
हरवलेली पाणबुडी कार्बन फायबरने बनली आहे. या पाणबुडीच्या प्रसिद्धीबद्दल कंपनीने दावा केला होता, “तुमच्या रोजच्या आयुष्यातून बाहेर पडून काही वेगळं शोधण्याची ही एक संधी आहे.”
 
कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ही मोहीम सुरू आहे आणि जून 2024 पर्यंत अजून दोन मोहिमा निघतील.
 
पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपतीही बेपत्ता
 
या पाणबुडीमध्ये पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमानही आहेत.
 
शहजादा दाऊद पाकिस्तानातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक आहेत. ते एसईटीआय इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी आहेत. ही जगातील ना नफा तत्वावर चालणाऱ्या प्रमुख वैज्ञानिक संस्थेपैकी एक आहे.
 
दाऊद 48 वर्षांचे आहेत आणि त्याचा मुलगा 19 वर्षांचा आहे.
 
पाकिस्तानी वंशाचे असलेले शहजादा दाऊद सध्या ब्रिटनमध्ये राहतात. त्यांचं कुटुंब ब्रिटनच्या सरे भागात राहतं.
 
त्यांच्या कुटुंबातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं होतं, “आमचा मुलगा शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान अटलांटिक समुद्रात टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पाणबुडीमधून गेले होते. आता त्या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे आणि त्याबद्दल अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे."
 
टायटन सबमर्सिबल
साधारणपणे या पाणबुडीत एक पायलट, तीन पर्यटक आणि कंपनीच्या शब्दांत सांगायचं झालं तर एक ‘कन्टेन्ट एक्सपर्ट’ असतो.
 
हा प्रवास न्यूफाउंडलँडमधल्या सेंट जोन्सपासून सुरू होतो. टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहचून परत येईपर्यंत पाणबुडीला आठ तासांचा वेळ लागतो.
 
ओशियनगेटच्या वेबसाइटवरील माहितीनुसार त्यांच्याकडे तीन पाणबुड्या आहेत. मात्र, केवळ टायटन ही पाणबुडीच टायटॅनमिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम आहे.
 
ही पाणबुडी 10432 किलो वजनाची आहे आणि वेबसाइटवरील माहितीनुसार ती 13100 फूट खोल जाऊ शकते. पाणबुडीत पाच प्रवाशांसाठी 96 तास पुरेल एवढा ऑक्सिजन असतो.
 
ओशियनगेटच्या मालकांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, पोलर प्रिन्स नावाचं एक जहाजही या मोहिमेचा भाग होतं. या जहाजाच्या मदतीनेच पाणबुडीला टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पोहोचवलं जातं.
 
त्यांनी हेही सांगितलं की, आताच्या घडीला पाणबुडीमधले प्रवाशांचा बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाहीये. कारण पाण्याच्या इतक्या खाली जीपीएस काम करत नाही आणि रेडिओही नाही.
 
त्यांनी सांगितलं, “जेव्हा सपोर्ट शिप पाणबुडीच्या बरोबर वरती असतं, तेव्हा ते टेक्स्ट मेसेज करून संदेशाची देवाणघेवाण करू शकतं. पण आता या संदेशांचं उत्तर मिळत नाहीये.”
 
त्यांनी सांगितलं की, पाणबुडीमधल्या प्रवाशांना बाहेरून बोल्ट लावून सील केलं जातं. अशा परिस्थितीत पाणबुडी पृष्ठभागावर आली, तरी प्रवासी बाहेर पडू शकत नाहीत. पाणबुडीचे कर्मचारीच बाहेरून ती उघडू शकतात.
 
शंभर वर्षं उलटून गेली, तरी टायटॅनिकचे अवशेष समुद्र तळाशी शाबूत आहेत. आपल्या पहिल्याच प्रवासात हिमनगाला धडकून समुद्रात बुडालेलं टायटॅनिक हे त्या काळातलं सर्वांत मोठं जहाज होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती