कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील लढाईत 'हे' 3 मुद्दे ठरणार महत्त्वाचे

मंगळवार, 30 जुलै 2024 (13:07 IST)
अमेरिकेच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ होते आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. त्यांनी राष्ट्रध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे.
कमला हॅरिस यांचा आजवरचा राजकीय प्रवास तसा सुरळीत झाला आहे. मात्र, ज्या पद्धतीनं रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यावर टीका करत आहेत, त्यावरून असं फार काळ राहणार नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचे पोलस्टर (त्यांची प्रचार मोहिम चालवणारे आणि जनमत चाचणी घेणारे) टोनी फ्रॅब्रिजियो सद्यपरिस्थितीला 'हॅरिस हनीमून' असं म्हणतात.
यामागे प्रसारमाध्यमांचा चांगला वापर आणि सकारात्मक ऊर्जा यांचा एकत्रितपणे केलेल वापर हे कारण असल्याचं ते मानतात.
 
त्यांना वाटतं की, "याच कारणामुळे कमला हॅरिस यांना आघाडी मिळाली आहे. मात्र, हनीमून काळ संपतो देखील. विवाहानंतरच्या जीवनाचं वास्तव समोर येतं."
म्हणजेच असंही म्हणता येईल की, कमला हॅरिस आणि अमेरिकन मतदारांमधील नातं देखील स्पष्ट होईल.
सध्यातरी कमला हॅरिस यांची टीम आनंदात आहे आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य त्यांच्याबद्दल आशा ठेवून आहेत.
सुरुवातीला रिपब्लिकन पक्षाचे नेते बायडन यांच्या घोषणेमुळे आश्चर्यचकित झाले होते, मात्र आता ते कमला हॅरिस यांच्यावर टीका करत आहेत.
इथे आपण अशा तीन मुद्द्यांबाबत जाणून घेऊया, ज्या मुद्द्यांच्या आधारे रिपब्लिकन पार्टी कमला हॅरिस यांच्यावर टीका करत आहे.
 
1. कमला हॅरिस यांना 'रॅडिकल लेफ्टिस्ट' म्हणणं
2020 मध्ये कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत होत्या.
 
मात्र, त्यांची ही मोहिम यशस्वी झाली नव्हती, त्यांना यात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. त्यांच्याकडून देण्यात आलेले संदेश पुरेसे स्पष्ट नसणं, निवडणूक प्रचार मोहिमेत अंतर्गत वाद आणि त्यांनी दिलेल्या काही मुलाखती ही कारणं त्यामागे होती.
 
अर्थात, या दरम्यान इतरही काही गोष्टी घडल्या. उमेदवारीच्या शर्यतीत असणाऱ्या इतर उमेदवारांप्रमाणे कमला हॅरिस देखील डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक मतदारांशी ताळमेळ साधण्यासाठी 'डाव्या' विचारसरणीकडे वळल्या.
 
थर्ड वे या सेंट्रिस्ट डेमोक्रॅटिक थिंक टॅंकमधील सार्वजनिक घडामोडी (पब्लिक अफेअर्स) साठीचे उपाध्यक्ष मॅट बेनेट म्हणतात, "उमेदवारांवर प्रचंड दबाव होता. जेव्हा तुम्ही प्राथमिक मतफेरीत सहभागी होता, तेव्हा सर्वसाधारण निवडणुकीत पोहोचण्याच्या तुलनेत तुमचा राजकीय प्राधान्यक्रम खूपच वेगळा असतो."
 
2019 मध्ये झालेल्या डिबेट आणि मुलाखतीत कमला हॅरिस यांनी सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्यवस्थेसाठी खासगी आरोग्य विमा बंद करण्याचं समर्थन केलं होतं.
त्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी च्या तरतुदींना इतर प्राधान्यक्रमांकडे वळवण्यास आणि पोलीस व्यवस्थेत सुधारणा करण्यास समर्थन दिलं होतं.
 
त्यांनी अमेरिकेत विनादस्तावेज प्रवेश करण्यास गुन्हेगारी श्रेणीतून वगळण्याचं समर्थन केलं होतं. त्याचबरोबर ICE म्हणजे इमिग्रेशन अॅंड कस्टम्स इन्फोर्समेंट (स्थलांतर आणि सीमा शुल्क अंमलबजावणी) रद्द करण्यास पाठिंबा दिला होता.
 
त्यांनी ग्रीन न्यू डील (हवामान बदला आणि अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठीची धोरणं) पर्यावरण कायद्याला पाठिंबा दिला होता आणि समुद्रात ड्रिलिंग करण्यावर बंदी घालण्यास पाठिंबा दिला होता.
 
आता कमला हॅरिस यांची ही भूमिका त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.
 
पेनसिल्व्हेनियात सीनेटसाठी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार असलेले डेव्हिड मॅककॉर्मिक यांनी कमला हॅरिस यांच्या 2019 मधील भूमिकेवर हल्ला चढवताना त्यांना आपले प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक सिनेटर बॉब केसी यांच्याशी जोडलं. त्याशिवाय टीव्हीवर एक जाहिरात देखील तयार केली.
 
याचबरोबर ट्रम्प यांनी 'मीट सॅन फ्रान्सिस्को रॅडिकल कमला हॅरिस' या मथळ्यासह एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात त्यावेळेस कमला हॅरिस यांनी ज्या धोरणांना पाठिंबा दिला होता अशा अनेक धोरणांवर बोट ठेवण्यात आलं आहे.
 
अर्थात, या प्रकरणात बेनेट यांचं म्हणणं आहे की, "चांगले नेते आपल्या धोरणांमध्ये बदल करू शकतात मात्र ते आपली तात्विक भूमिका किंवा विचारसरणी बदलत नाहीत, असा युक्तिवाद त्या करू शकतात. त्यांची विचारसरणी, भूमिका बदललेली नाही."
 
2. बायडन यांच्या कामांशी कमला हॅरिस यांना जोडून पाहणं
अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आलं की, जो बायडन यांची निवडणूक प्रचार मोहिम अनेक महिन्यांपासून तितकीशी प्रभावी ठरलेली नाही.
 
त्यांची स्थलांतराशी (इमिग्रेशन) संबंधित धोरणं लोकांना आवडलेली नाहीत. महागाई जरी घटलेली असली आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा झालेली असली तरी लोक महागाईसाठी त्यांना दोष देतात. त्यांच्यावर टीका करतात.
 
याचबरोबर गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात इस्रायलला अमेरिका पाठिंबा देते आहे. या मुद्द्याबाबत तरुण मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली नाराजी वाढली आहे.
 
आतापर्यत या सर्व मुद्द्यांसंदर्भात रिपब्लिकन पक्ष बायडन यांच्यावर हल्ला चढवत होता, टीका करत होता. मात्र आता बायडन यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामांशी कमला हॅरिस यांना जोडण्यात येतं आहे.
स्थलांतराच्या (इमिग्रेशन) मुद्द्याला कमला हॅरिस यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पार्टी करते आहे. कमला हॅरिस यांनी 2022 मध्ये इमिग्रेशन संदर्भात केलेली वक्तव्ये आणि दाव्यांसंदर्भात प्रसारमाध्यमं त्यांना 'बॉर्डर झार' म्हणत आहेत. त्यांच्यावर टीका केली जाते आहे.
 
ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराशी निगडीत राजकीय कृती समिती चालवणारे टेलर बुडोविच म्हणतात, "सध्याच्या परिस्थितीत कमला हॅरिस यांची ओळख एक अयशस्वी आणि लोकप्रिय नसलेल्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून आहेत. त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्या बॉसच्याच पाठीत खंजीर खुपसला. ही उमेदवारी त्यांनी स्वत:च्या क्षमतेवर मिळवलेली नाही. मात्र ही बाब मतदारांच्या लक्षात येईल. निवडणुकीतील त्यांची स्थिती आणखी वाईट होईल."
 
डेमोक्रॅटिक पक्षाचे रणनितीकार बेनेट यांचं म्हणणं आहे की बायडन यांच्या कामगिरी, त्यांचा कार्यकाळ यापासून कमला हॅरिस स्वत:ला वेगळं ठेवू शकणार नाहीत. मात्र एकीकडे रिपब्लिकन पक्ष त्यांच्यावर आणि डेमोक्रॅटिक पक्षावर हल्ले चढवत असताना त्या मतदारांना एक नवी दिशा नक्की दाखवू शकतात.
 
3. सरकारी वकील म्हणून कमला हॅरिस यांच्या कार्यकाळावर टीका
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचार मोहिमेतील आपल्या पहिल्याच जाहीर प्रचारसभेत कमला हॅरिस यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
 
त्यांनी या मुद्द्यावर भर दिला की न्यायालयात वकील आणि कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून काम करताना त्यांनी 'सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना' तोंड दिलं आहे.
 
त्या असंही म्हणाल्या, "डोनाल्ड ट्रम्प कशा प्रकारचे व्यक्ती आहेत हे मला माहित आहे."
 
क्रेग वरोगा डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रचार मोहिमेचे सल्लागार आणि अमेरिकन विद्यापीठात सहाय्यक प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) आहेत. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा हा कार्यकाळ त्यांची सुपरपॉवर असल्याचं क्रेग म्हणतात. त्यांच्या या क्षमतेचा वापर त्या 2019 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रचार मोहिमेत पूर्णपणे करू शकल्या नव्हत्या.
 
मात्र, ट्रम्प कशाप्रकारे प्रतिहल्ला करू शकतात या गोष्टीचा संकेत त्यांची प्रचार मोहिम आधीपासूनच देते आहे. त्यांचा प्रचार मोहिमेचे व्यवस्थापक क्रिस लासिवीटा यांनी आणखी एका डेमोक्रॅटिक कथित शक्तीशाली उमेदवाराला आव्हान देऊन रिपब्लिकन पक्षात आपलं स्थान निर्माण केलं होतं.
 
2004 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेले जॉन केरी, व्हिएतनाम युद्धातील अनुभवांच्या माध्यमातून स्वत:ला एक योद्धा दाखवण्याचा प्रयत्न करत होते. असा योद्धा जो इराक युद्धाच्या काळात एक प्रभावी सेनापती (कमांडर-इन-चीफ) ठरू शकतो.
यानंतर लासिवीटा यांनी केरी यांच्या देशभक्ती आणि शौर्याबद्दल प्रश्न निर्माण करणाऱ्या अनेक आक्रमक जाहिराती चालवल्या होत्या.
 
यावेळेस देखील काहीसं असंच दिसतं आहे. कमला हॅरिस सरकारी वकील असताना त्यांनी केलेल्या कामांवर रिपब्लिकन पक्ष चर्चा करतो आहे.
 
अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये कृष्णवर्णीय पुरुषांबाबत कठोर होण्याचा आरोप हॅरिस यांच्यावर केला जातो आहे. कृष्णवर्णीयांकडून कमला हॅरिस यांना मिळणारा पाठिंबा कमी करण्याचा हेतू यामागे आहे.
 
तर दुसरीकडे रिपब्लिकन पक्ष आणखी काही उदाहरणं देतो आहे. त्यात कमला हॅरिस यांनी काही लोकांविरोधात खटला न चालवण्याचा निर्णय घेतला होता किंवा त्या व्यक्तींना पॅरोलची परवानगी दिली होती. हे लोक नंतरच्या काळात नवीन गुन्हे करण्याची शक्यता होती. ही उदाहरणं देऊन कमला हॅरिस यांच्यावर टीका केली जाते आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प यांचे पोलस्टर (त्यांची प्रचार मोहिम चालवणारे आणि जनमत चाचणी घेणारे) टोनी फ्रॅब्रिजियो म्हणतात की, 'कमला हॅरिस जशा आहेत आणि त्यांनी जे केलं आहे, या गोष्टी त्या बदलू शकत नाहीत.'
 
ते म्हणाले, मतदार लवकरच त्यांच्याकडे बायडन यांची भागीदार आणि त्यांच्या कामातील सहाय्यक म्हणून पाहू लागतील. मतदारांना त्यांच्या धोकादायक उदारमतवादी पार्श्वभूमी बद्दल कळेल. ट्रम्प यांच्या वक्तव्यांमध्ये आणि प्रचार सभांमध्ये कमला हॅरिस यांच्यावर हल्ला चढवण्याबरोबरच रिपब्लिकन पक्षाला मोठा विजय मिळवू देण्यासाठी प्रयत्न केले जातील. यादरम्यान, कमला हॅरिस कशा प्रकारच्या उमेदवार आहेत आणि त्या कोणत्या गोष्टींना पाठिंबा देतात हे दाखवण्याचा प्रयत्न कमला हॅरिस आणि त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेद्वारे केला जाईल.
 
कमला हॅरिस यांच्याबद्दल मतदारांचा दृष्टीकोन काय असेल?
टोनी फॅब्रिजियो यांचं म्हणणं आहे की, "कमला हॅरिस कोण आहेत आणि त्यांनी काय केलं आहे, ही गोष्ट त्या बदलू शकत नाहीत."
ते म्हणतात, मतदारांना लवकरच कळेल की त्या बायडन यांच्या भागीदार आणि त्यांच्या कामातील सहाय्यक आहेत. त्यांचे विचार गरजेपेक्षा जास्त उदारमतवादी आहेत.
अशा परिस्थितीत जाहिराती, ट्रम्प यांची भाषणं आणि प्रचार सभांमध्ये करण्यात आलेली वक्तव्ये यांच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्ष कमला हॅरिस यांच्यावर हल्ला चढवेल.
या दरम्यान, कमला हॅरिस कोण आहेत आणि कशासाठी निवडणुकीत उभ्या आहेत, हे दाखवण्याचा कमला हॅरिस आणि त्यांच्या प्रचार मोहिमेचा प्रयत्न असेल.
क्रेग वरोगा यांचं म्हणणं आहे की कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून कोणाची निवड करतात यातून ही बाब ठळकपणे दाखवली जाईल.
ते म्हणतात, "लोकांना दिसेल असा राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराकडून घेण्यात आलेला हा खरा निर्णय असेल. या निर्णयातून त्या भविष्याकडे कशाप्रकारे पाहतात, कोणती धोरणं अंमलात आणणार हे लोकांना समजून घेता येणार आहे."
 
जर कमला हॅरिस यांनी एका मध्यममार्गी सहकाऱ्याची निवड केली, तर त्यातून मतदारांना हा विश्वास मिळेल की त्याचं शासन मध्यमार्गी असेल. रिपब्लिक पक्षाचा उमेदवार त्यांना ज्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, तसं ते अती डाव्या विचारसरणीचं नसेल.येत्या आठवड्यांमध्ये कमला हॅरिस यांची पारख, त्यांचे शब्द, वक्तव्ये, मत आणि त्यांच्या मागील प्रचार मोहिमेद्वारे केली जाईल.यातून ही बाब स्पष्ट होईल की नोव्हेंबर महिन्यात जेव्हा लोक मतदान करतील तेव्हा ते कमला हॅरिस यांच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहत आहेत. यातूनच ही गोष्ट निश्चित होईल की डेमोक्रॅटिक पक्षाचं ''हनीमून'' पराभवाने संपेल की ते पुढील आणखी चार वर्षे सुरू राहील.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती