चीनमधली तरुण पिढी लग्न करायला तयारच होईना

बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 (09:51 IST)
फॅन वांग
 चेनच्या आईने तिला लग्नासाठी आत्तापर्यंत 20 हून अधिक स्थळं दाखवली आहेत.
 
ती म्हणते की यातली काही स्थळं तर इतरांपेक्षा खूपच वाईट होती. याचं कारण म्हणजे तिने ठेवलेली अट. तिला भेटणारे बहुतेक पुरुष ही अट मान्य करण्यास नकार देतात.
 
चेनची अट अशी आहे की, तिला मुलं जन्माला घालायची नाहीयेत.
 
चेन केवळ तिचं आडनाव बदलू इच्छिते. तिचं वय केवळ 20 वर्षे आहे. ती म्हणते, "मुलं जन्माला घालणं खूप थकवणारं असतं. मला मुलं आवडत नाहीत."
 
ती म्हणते, "परंतु ज्याला मुलं नको आहेत असा माणूस शोधणं अशक्य आहे. एखाद्या पुरुषासाठी मुलं न होणं... त्याला मारुन टाकल्यासारखं आहे."
 
या सगळ्या भेटी अयशस्वी झाल्यानंतरही तिच्यावरील लग्नाचा दबाव कमी झालेला नाही.
 
चेनच्या पालकांची इच्छा आहे की तिने लग्न करावं आणि तिला मुलं व्हावी.
 
चीनमधील कुटुंबांची घटती आकडेवारी
चीनमध्ये विवाहाच्या प्रमाणासह जन्मदर कमी होतोय, अशात चिनी कम्युनिस्ट पक्ष लाखो तरुण स्त्रिया आणि पुरुषांना लग्न करण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
 
गेल्या वर्षी, चीनची लोकसंख्या 60 वर्षांत पहिल्यांदाच घटली. त्यांचा प्रजनन दर खूपच कमी झाला.
 
1986 पासून विवाह नोंदणीची संख्याही केवळ 60 लाख 83 हजार इतकी नीचांकी राहिली आहे. हा 1986 नंतरचा नीचांक आहे.
 
अर्थव्यवस्थेची मंद गती आणि वाढती बेरोजगारी यामुळे हताश झालेले तरुण त्यांच्या पालकांनी केलेल्या पारंपारिक निवडीकडे पाठ फिरवत आहेत.
 
त्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढत आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ज्या राष्ट्रीय पुनरुत्थानाची हाक दिली आहे त्यापासून ही स्थिती फारच दूर आहे.
 
विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी प्रयत्न
विशेष म्हणजे देशातील ही चिंता आता राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यापर्यंत पोहोचली आहे.
 
नुकतंच त्यांनी एक भाषण दिलं, यात त्यांनी लग्न आणि मूल जन्माला घालण्याची नवीन संस्कृती विकसित करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. शिवाय लग्न, मुलं आणि कुटुंबाबाबत तरुणांचा दृष्टीकोन तयार करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करण्याचं आवाहन केलं आहे.
 
यासाठी चिनी अधिकारी प्रयत्नच करत नाहीत असं नाही.
 
देशातील तरुणांनी लग्न करावं आणि जोडप्यांनी मुलं जन्माला घालावी यासाठी प्रोत्साहन द्यावं म्हणून सरकारी अधिकारी सक्रीय झाले आहेत.
 
या वर्षाच्या सुरुवातीला, पूर्वेकडील झेजियांग प्रांतातील एका लहान शहराने जाहीर केलं होतं की वधू 25 वर्षे किंवा त्याहून कमी वयाची असल्यास जोडप्यांना 1,000 युआन बक्षीस दिलं जाईल.
 
यामुळे स्थानिक लोक संतप्त झाले. लोकांचं म्हणणं होतं की, सरकारला कसं काय वाटलं की एवढे कमी पैसे देऊन ते लोकांचा निर्णय बदलवू शकतील.
 
तेच दुसऱ्या बाजूला घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी अधिकाऱ्यांनी 30 दिवसांच्या 'कूलिंग ऑफ पिरियड'चा आग्रह धरला आहे. अधिकार्‍यांच्या या निर्णयामुळे वैयक्तिक निवडींवर परिणाम होईल आणि घरगुती हिंसाचाराचा सामना करणार्‍या महिलांना हानी पोहोचेल अशी चिंता निर्माण झाली आहे.
 
तेच ग्रामीण भागात बहुसंख्य अविवाहित पुरुष योग्य वधू शोधण्यासाठी धडपडत आहेत. तेथील अधिकाऱ्यांनी वधूसाठी जास्त पैशांची मागणी थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
 
अर्थशास्त्रज्ञांची चिंता
अर्थशास्त्रज्ञ ली जिंगकुई म्हणतात की, इतर प्रोत्साहनांप्रमाणे हे देखील काम करणार नाही.
 
त्यांचं म्हणणं आहे की, वधूसाठी जास्त किंमत मोजावी लागत नसली तरी पुरुष अजूनही वधूच्या शोधात आहेत. जसं की, घर, कार किंवा इतर गोष्टींमुळे ही स्पर्धा वाढली आहे.
 
तज्ञांचं म्हणणं आहे की, पुरुषप्रधान चीनच्या नेतृत्वाला तरुणांच्या, विशेषतः महिलांच्या या निवडीमागील कारण समजलेलं नाही.
 
चीनमधील सर्वात शक्तिशाली निर्णय घेणाऱ्या सात सदस्यीय स्थायी समिती पॉलिटब्युरो मध्ये अनेक दशकांपासून केवळ पुरुषांचा समावेश आहे.
 
पक्षनेतृत्व अगदी याच्या खालोखाल आहे, ज्यात 20 हून अधिक जागा आहेत. गेल्या दोन दशकांपासून यात केवळ एक महिला सदस्य होती. तीही सदस्य गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत राहिली. आता यात एकही स्त्री नाही.
 
ली म्हणतात, "प्रत्येक अधिकाऱ्याची बायको सरकारमध्ये असते. त्यामुळे त्यांना याचं गांभीर्य नाही."
 
प्रेम महाग बनत चाललंय
तज्ज्ञांच्या मते, चीनमधील अविवाहित लोकसंख्या दोन अद्वितीय गटांनी बनलेली आहे. एक शहरी महिला आणि दुसरं ग्रामीण पुरुष.
 
ग्रामीण भागातील पुरुष आर्थिक अपेक्षांसह संघर्ष करतात. जसं की वधूच्या उच्च किंमती आणि कुटुंबाला आधार देणारी सुरक्षित नोकरी. यामुळे ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण होत असून जीवनसाथी निवडण्यासाठी त्या अधिक वेळ घेत आहेत.
 
शांघायमध्ये काम करणाऱ्या 28 वर्षीय कॅथी टियान सांगतात, "जेव्हा मी चायनीज नववर्षासाठी घरी गेले, तेव्हा मला ग्रामीण चीनमधील लग्नाच्या बाजारपेठेत एक महिला म्हणून चांगलं वाटलं."
 
त्या म्हणतात की, उत्तर अनहुई प्रांतात त्यांना थोडं वयस्कर मानलं जाईल, कारण त्या भागात महिलांचं 22 व्या वर्षी लग्न केलं जातं. पण त्यांचा अनुभव यापेक्षा वेगळा होता.
 
त्या म्हणतात, "मला काहीही द्यावं लागत नाही, पण पुरुषाला घर, गाडी, लग्नसमारंभ, तसेच वधूला पैसे द्यावे लागतात. या लग्नाच्या बाजारात मी वरच्या स्थानावर आहे असं मला वाटलं."
 
दुसरीकडे, शहरी महिलांचं म्हणणं आहे की त्या लग्नाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतात आणि बाकीचा समाज याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो यात फरक आहे. त्यामुळे या दोन वर्गातील दरी रुंदावत चालली आहे.
 
चेन म्हणते, "मला कोणतीही चिंता नाही. मला बाकीच्यांची काळजी वाटते."
 
ती सांगते, तिच्या पालकांच्या पिढीत आणि आता फरक आहे. आता जीवन एक आव्हान आहे आणि प्रेम म्हणजे महागडी गोष्ट. स्त्रियांकडे आता अधिक पर्याय आहेत.
 
ती म्हणते, "आता आमचा दृष्टिकोन असा आहे की मुलं जन्माला घातलीच पाहिजेत असं नाही."
 
त्यांच्या आसपासच्या जगाप्रमाणे स्त्रिया हे देखील लक्षात घेतात की सरकारी मोहिमा महिलांवर लक्ष केंद्रित करतात आणि भागीदार म्हणून पुरुषांच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात.
 
या असमान अपेक्षा त्यांना पालक बनण्याच्या कल्पनेपासून दूर नेत आहेत.
 
पालकांच्या जबाबदाऱ्या
चीनमधील तरुण मातांमध्ये अशी एक म्हण तयार झाली आहे की, मुलांचं संगोपन असं करा जणू त्यांचे वडील मरण पावले असावेत. याचा अर्थ पती नोकरी करत नाही किंवा वडिलांच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही किंवा मुलाच्या संगोपनात मदत करत नाही.
 
33 वर्षीय डेटा सायंटिस्ट आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगतात, "मी जितक्या विवाहित पुरुषांना ओळखते , ते सगळे असाच विचार करतात की, कुटुंबातील त्यांची एकमेव जबाबदारी म्हणजे पैसे कमवणे."
 
त्या सांगतात "मुलांसोबत नसल्याबद्दल आईमध्ये अपराधीपणाची भावना असते. उशिरापर्यंत बाहेर राहणं योग्य नाही असंही त्यांना वाटतं. पण वडिलांना कधीच असं अपराधी वाटत नाही."
 
परंतु चीनच्या सत्ताधारी पक्षाला असं अजिबात वाटत नाही की, असमानता आणि बदलत्या अपेक्षा या आव्हानांवर मात करणं आवश्यक आहे.
 
त्याच वेळी, चिनी तरुण म्हणतात की, अधिकारी त्यांना इतक्या सहजपणे आकर्षित करू शकणार नाहीत.
 
त्यांना येणाऱ्या सामाजिक दबावांबद्दल विचारलं असता, ते शांघायमधील कोव्हिड लॉकडाऊन दरम्यान लोकप्रिय झालेलं एक वाक्य सांगतात.
 
कठोर निर्बंधांविरुद्ध अधिकाऱ्यांशी वाद घालणाऱ्या तरुणाचं हे वाक्य होतं, "ही आमची शेवटची पिढी आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती