अफगाणिस्तानच्या राजधानीतील मदरशात झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात तालिबानचा सर्वोच्च धर्मगुरू रहीमुल्लाह हक्कानी मारला गेला. तालिबानच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने त्याच्या कृत्रिम पायात लपवलेल्या आयईडीचा स्फोट केला. रहिमुल्ला आयएसविरोधात सक्रिय होता. या हत्येची जबाबदारी आयएसने घेतली आहे.
रहिमुल्लाह हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री आणि हक्कानी नेटवर्कचे नेते सिराजुद्दीन हक्कानी यांचे वैचारिक गुरू मानले जात होते. रहिमुल्ला हा सोशल मीडियावर तालिबानचा चेहरा होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. यापूर्वी हक्कानीवर दोन हल्ले झाले होते. ते तालिबान लष्करी आयोगाचे सदस्य राहिले आहेत. त्या काळात अमेरिकन सैन्याने त्यांना अटक करून अनेक महिने बग्राम तुरुंगात ठेवले होते.