चीनमध्ये आलाय चिचुंद्रीपासून पसरणारा नवा व्हायरस

शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (10:07 IST)
चीनच्या वुहान प्रांतातल्या कोरोना व्हायरसने मागच्या दोन वर्षांत जगभरात थैमान घातले होते. आता यात नव्या लांग्या हेनिपाव्हायरसची भर पडली आहे. या नव्या व्हायरसच्या संसर्गामुळे अवघं जग पुन्हा चिंताग्रस्त झालंय.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या एका चमूने हा हेनिपाव्हायरस कुटुंबातील नवा विषाणू शोधलाय. शास्त्रज्ञांच्या मते, 2018 ते 2021 दरम्यान चीनमध्ये लांग्या हेनिपाव्हायरसचे (LayV) किमान 35 रूग्ण आढळले होते.
 
4 ऑगस्ट रोजी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालात लांग्या हेनिपाव्हायरस संसर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. या विषाणूचा व्यक्ती ते व्यक्ती प्रसार झाल्याचे संदर्भ सापडलेले नाहीत.
 
लांग्या हेनिपाव्हायरस हा विषाणू हा प्राण्यापासून आला असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. हा प्राणी म्हणजे लांब नाकाचा उंदरासारखा दिसणारा श्रू प्राणी असल्याचं शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात म्हटलंय. मात्र या विषाणूवर सध्या संशोधन सुरु आहे.
 
चीनमध्ये आढळलेल्या लांग्या विषाणू संसर्गाच्या 35 प्रकरणांपैकी, 26 रुग्णांचे तपशीलवार विश्लेषण करण्यात आले आहे. यात सर्व रुग्णांना ताप आल्याचं दिसून आलं. या विषाणूची लागण झालेल्या 54 टक्के रुग्णांमध्ये थकवा, 50 टक्के मध्ये खोकला, 50 टक्के डोकेदुखी, 35 टक्के उलट्यांची तक्रार नोंदवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त किमान 35 टक्के रुग्णांना यकृत आणि 8 टक्के रुग्णांना किडनीचा त्रास जाणवला आहे.
 
या विषाणूमुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
बीबीसीने मुलाखत घेतलेल्या तज्ज्ञांच्या मते, "नवा विषाणू आढळून आलाय याचा अर्थ असा नाही की, आता जगभरात याची साथ येणार आहे. पण या विषाणूचं स्वरूप गंभीर आहे. कारण या गटातील इतर विषाणूंचा यापूर्वीही उद्रेक झाला असून आशिया आणि ओशनिया मध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमण झालं होतं."
 
'हॉट स्पॉट नाही'
हेन्ड्रा हेनिपाव्हायरस (HeV) आणि निपाह हेनिपाव्हायरस (NiV) हे विषाणूसुद्धा लांग्या हेनिपाव्हायरस( LayV) गटात मोडणारे आहेत. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, हेन्ड्रा विषाणूचं संक्रमण तसं दुर्मिळ आहे. मात्र मृत्यूदर 57 टक्क्यांच्या आसपास आहे.
 
निपाहच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 1998 ते 2018 दरम्यान या उद्रेकांमुळे जे संक्रमित झाले होते त्यांच्यातील मृत्यूदराचं प्रमाण 40 ते 70% दरम्यान होतं. दोन्ही विषाणूंमुळे श्वसन आणि न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात.
 
भारतात 2018 मध्ये निपाहचा सर्वांत गंभीर उद्रेक झाला होता. यात केरळ राज्यात संसर्गाची 19 प्रकरण समोर आली होती. या प्रकरणांपैकी 17 मृत्यू झाले होते.
 
संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती तसेच अनेक देशांनी पुरवलेल्या वेगवेगळ्या आकडेवारीमुळे या मृत्यूदरांची कोव्हिडच्या मृत्यूदराशी तुलना करणं तसं कठीण आहे. पण कोरोना व्हायरसपेक्षा हेन्ड्रा आणि निपाह विषाणूची प्राणघातकता जास्त होती. कोरोना विषाणूचा पहिला उद्रेक डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये झाला होता.
 
साओ पाउलो विद्यापीठातील इमर्जिंग व्हायरसवर संशोधन करणारे प्राध्यापक जानसेन डी अरोजो यांच्या मते, लांग्या विषाणूच्या शोधामुळे नवा साथरोग येण्याच्या शक्यता तशी कमी आहे. तसेच संशोधन अहवालात नमूद करण्यात आलेले संक्रमित रुग्ण हे दीर्घ कालावधीतील आहे.
 
डी. अरोजो पुढे सांगतात, "कोरोना विषाणूमुळे ज्या प्रकारे हॉटस्पॉट तयार झाले होते तसे हॉटस्पॉट लांग्या संक्रमित रुग्णांमुळे तयार झालेले दिसत नाहीत."
 
यूकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगमधील व्हायरोलॉजीचे प्राध्यापक इयान जोन्स सांगतात की, लांग्या विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित झाल्याची अजूनपर्यंत तरी नोंद नाहीये.
 
अजून तरी म्युटेशन दिसलेलं नाही
इयान जोन्स बीबीसीशी बोलताना सांगतात, "यात महत्त्वाचं काय असेल तर, हेन्ड्रा आणि निपाह हे साथरोग विषाणू नाहीत. कोव्हिडची जशी साथ आली होती तशी या विषाणूंची साथ येत नाही. तसेच या विषाणूमध्ये अजून तरी कोणत्याही प्रकारचं म्युटेशन आढळलेलं नाही. म्हणजेच या विषाणूंचा नवा व्हेरियंट येत नाही."
 
पण असं असलं तरी लांग्या विषाणूच्या नव्या संक्रमणावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञांच म्हणणं आहे.
 
सर्व संक्रमित रुग्ण हे चीनमधील शेडोंग आणि हेनान प्रांतातील रहिवासी आहेत. या रुग्णांचा एकमेकांशी जवळचा संपर्क नव्हता. संशोधकांनी नऊ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची लांग्या विषाणूची चाचणी केली असता कुटुंबात एकही संसर्ग आढळला नाही.
 
संक्रमित झालेल्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकरी आहेत हे लक्षात घेता, हा विषाणू प्राण्यांच्या संपर्कातून लोकांपर्यंत पोहोचल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आलाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती