सुनिता विल्यम्स : व्हायचं होतं व्हेटरनरी डॉक्टर पण बनल्या अंतराळवीर, 'समोसे' अन् 'गीता' घेऊन गेल्या अंतराळात

सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (14:49 IST)
आपण राहतो त्या ग्रहाला वरून पाहण्याची संधी मिळाली त्यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते."
नासाच्या एका व्हिडिओमध्ये स्वतःबद्दल माहिती देताना अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी व्यक्त केलेल्या या भावना आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा ISS) मध्ये मोहिमेवर गेलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स सध्या तांत्रिक अडचणीमुळे अंतराळातच अडकल्या आहेत.
सुनिता आणि त्यांचे सहकारी बुश विल्मोर हे 5 जून रोजी ISS वर एका मोहिमेवर गेले. एक्सपिडिशन 71 असं या मोहिमेचं नाव असून, या मोहिमेवरून ते 8 दिवसात परतणार होते. पण अद्याप ते तिथंच अडकून आहेत.
सुनिता ज्या यानात (स्टारलायनर) ISS वर गेल्या आहेत, त्यात हेलिअम गळतीसह काही अडचणी आल्या आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात असल्याचं या मोहिमेचे कमांडर सुश विल्मोर यांनी 10 जुलैला नासाशी बोलताना सांगितलं. त्यांना परत आणण्यासाठी नासाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
अशा प्रकारची समस्या येऊ शकते या विचारानं आम्ही त्यासाठी सज्ज होतो, त्यामुळे त्यावर काम करत असल्याचं सुनिता यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
 
लवकर परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सुनिता यांनी म्हटलं होतं. आम्ही सुरक्षितपणे परत येऊ याचा विश्वास असल्याचंही यावेळी विल्मोर यांनी बोलताना सांगितलं होतं.
दरम्यान, सुनिता आणि विल्मोर अडकल्यानं त्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.
 
सुनिता विल्यम्स यांचा आजवरचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी असा राहिलेला आहे. अमेरिकेतच जन्म झालेला असला तरी भारतीय संस्कृतीशी त्यांची नाळ जुळलेली असल्याचं अनेकदा त्यांच्या कृतींमधूनही दिसतं.
 
सुनिता विल्यम्स यांच्या याच भारावून टाकणाऱ्या प्रवासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. अरविंदा अनंतरामन यांनी 'सुनिता विल्यम्स:अ स्टार इन अ स्पेस' या पुस्तकात त्यांचा प्रवास मांडला आहे. तसंच सुनिता यांनीही अनेक कार्यक्रमांत त्यांच्या प्रवासाबाबत माहिती दिली आहे.
 
मूळ गुजरातचे पांड्या कुटुंब
सुनिता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या हे मूळचे गुजरातच्या अहमदाबादमधल्या मेहसाना जिल्ह्यातील झुलासन गावचे. डॉक्टर असलेले दीपक पांड्या यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण अहमदाबादेत पूर्ण केलं.
 
दीपक यांचे भाऊ नवीन अमेरिकेत असल्यानं दीपकही त्याठिकाणी गेले. दोन वर्ष त्याठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावल्यानंतर पुन्हा भारतात यायचं असं ठरवून दीपक पांड्या अमेरिकेत गेले. पण तसं झालं नाही.
 
अमेरिकेत दीपक पांड्या यांची बोनी झोलोकर यांच्याशी मैत्री झाली. पुढं या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्नं केलं. त्यानंतर दीपक पांड्या अमेरिकेतच स्थायिक झाले.
दीपक आणि बोनी यांना जय, दिना आणि सुनिता अशी तीन मुलं झाली. 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेच्या ओहियोमध्ये सुनिता यांचा जन्म झाला. सर्वांमध्ये सुनिता या लहान होत्या.
 
दीपक हिंदू आणि आई कॅथलिक असल्यानं घरात संमिश्र वातावरण आणि सर्व धर्मांप्रती आदर करण्याची शिकवण त्यांना मिळाली.
 
दीपक रविवारी चर्चमध्ये जायचे आणि जाताना भगवद् गीता सोबत घेऊन जायचे. मुलांना रामायण, महाभारतातील कथा ऐकवल्या. भारतीय संस्कृतीशी नाळ ठेवली, असं पुस्तकात म्हटलं आहे.
 
सुनिता यांच्या घरात सर्वच विषयांवर मोकळेपणानं चर्चा व्हायच्या. पण मुलांच्या फिटनेसवर पांड्या दाम्पत्याचं विशेष लक्ष्य असायचं. त्यातूनच त्यांनी तिन्ही मुलांना पोहण्याच्या सरावाची चांगली सवय लावली.
सर्वांना वाटले स्विमरच होणार
शाळेत प्रवेशानंतर सुनिता यांची पहिली मैत्री झाली ती स्विमिंग पूलबरोबर.
 
मुलांना व्यायामाची सवय असावी आणि शिस्त लागावी म्हणून दीपक आणि बोनी यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले.
 
दीपक सकाळी साडेपाचला मुलांना पोहोण्यासाठी घेऊन जायचे. हॉर्वर्ड विद्यापीठातील स्विमिंग पूलमध्ये त्यावेळी ते पोहण्याचा सराव करायचे.
 
लांब, ओले केस घेऊनच पांड्या भगिणी शाळेत जायच्या. जणू ती त्यांची ओळखच बनली होती. सकाळी दोन तास आणि सायंकाळी शाळेनंतर दोन तास त्यांचा पोहण्याचा सराव चालायचा.
भावंडांमध्ये सुनिता यांना स्विमिंगची अधिक आवडत होती. सहाव्या वर्षापासून त्यांनी पोहण्याच्या स्पर्धांत भाग घेतला आणि अनेक पदकं जिंकली.
 
हायस्कूलमध्ये असताना सकाळी स्विमिंग, नंतर लाफगार्डचं काम पुन्हा स्विमिंगचा सराव आणि त्यानंतर स्विमिंग इन्स्ट्रक्टरचं काम असं त्यांचं व्यस्त वेळापत्रक होतं. त्यामुळं सुनिता जलतरणपटूच होणार असंच सर्वांना वाटत होतं.
 
पदवी पूर्ण होईपर्यंतक सुनिता यांचं हे रुटिन कायम होतं आणि त्यात प्रचंड शिस्तही होती.
 
डॉक्टर व्हायचं होतं, कारण..
सुनिता स्विमर बनणार असं सगळ्यांना वाटत असलं, तरी त्यांना स्वतःला मात्र तसं होणार नाही याची खात्री होती. कारण त्यांची ओढ वैद्यकीय शिक्षणाकडं होती.
 
वैद्यकीय शिक्षणाकडं ओढ असण्याचं कारण म्हणजे, सुनिता यांना प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम होतं. त्यांच्या आईकडून हा गुण त्यांना उपजतच मिळालेला होता.
 
लहानपणापासून अनेक श्वान त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर राहिले. या प्राणीप्रेमामुळंचं प्राण्यांचं डॉक्टर बनणार बनायचं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. बेली आणि गॉर्बी या त्यांच्या दोन श्वानांसाठीचं त्यांचं प्रेम सर्वांना माहिती आहे.
वडील डॉक्टर होतेच. त्यामुळे कुटुंबातूनही त्यांना यासाठी प्रोत्साहन मिळालं. याच विचारातून त्यांनी नीधम हायस्कूलमधून शिक्षणही पूर्ण केलं. पण नियतीनं मात्र सुनिता यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलेलं असावं.
 
व्हेटरनरी डॉक्टर बनण्यासाठी सुनिता यांनी अर्ज केला होता, पण त्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळं त्यांनी भाऊ जय यांच्या सल्ल्यानुसार युएस नेव्हल अ‍ॅकेडमीमध्ये प्रवेश घेतला होता.
 
अशी सापडली नवी दिशा
सुनिता यांचे भाऊ जय युएस नेव्हल अ‍ॅकेडमीमध्ये शिकत होते. स्विमिंग आवडत असल्यानं त्यांनी सुनिताला तिथं प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. सुनिता यांनाही तो विचार आवडला.
 
व्हेटरनरी डॉक्टर बनायचं स्वप्नं मागं पडलं. त्याचं त्यांनी फार काही वाईट वाटून घेतलं नाही. प्रवेश घेताना आवडते लांब केस कापावे लागल्याचं जास्त दुःख होत होतं.
 
अ‍ॅकेडमीत सुनिता यांचं प्रशिक्षण सुरू असताना त्यांना स्विमिंगच्या सरावाचा फायदा होत होतं. अ‍ॅकेडमीत चार वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांनी नेव्ही डायव्हींगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथं एकच जागा होती. ती मिळाली नाही म्हणून त्यांनी नेव्ही एअर विभाग निवडला.
त्यातही त्यांना जेट पायलट व्हायचं होतं. पण तिथंही कॉम्बॅट एअरक्राफ्टऐवजी हेलिकॉप्टरची निवड करावी लागली. पण त्यांना हेलिकॉप्टर फ्लाइंगही आवडू लागलं. सुनिता निपुण पायलट बनल्या. 1990 च्या आखाती युद्धात मोहिमेचा भाग म्हणून साहित्य, रसद पुरवण्याचं काम त्यांनी केलं.
 
ठरवलं ते मिळालं नाही तरी आहे त्यातला सर्वोत्तम मार्ग निवडत त्यातून आनंद घेत सुनिता पुढे जात होत्या. त्याच मार्गावरचा त्यांचा पुढचा टप्पा होता, टेस्ट पायलट बनण्याचा.
 
सुनिता 1993 मध्ये मे रीलँडच्या नेव्हल टेस्ट पायलट स्कूलमध्ये गेल्या. त्यासाठीही अत्यंत कठीण प्रक्रियेचा सामना केल्यानंतर त्यांची निवड झाली.
 
'हेलिकॉप्टर उडवू शकते तर अंतराळातही जाऊ शकते'
टेस्ट पायलटच्या प्रशिक्षणादरम्यान सुनिता यांनी टेक्सासच्या ह्युस्टनमधील जॉन्सन अंतराळ केंद्राला भेट दिली. त्याठिकाणी अंतराळवीर जॉन यंग यांच्याबरोबर काही प्रात्याक्षिकं केली.
 
यंग हे चंद्रावर जाऊन आलेले होते. सुनिता त्यानं खूप प्रभावित होत्या. जॉन यांच्या वर्गातच सुनिता यांच्या मनात सर्वप्रथम आपण अंतराळवीर बनू शकतो हा विचार आला.
 
चंद्रावर लँडिंग करण्यासाठी जॉन यांना हेलिकॉप्टर फ्लाइंग शिकावं लागलं होतं, हे ऐकताच जणू सुनिता यांच्या मनानं अंतराळात झेप घेतली होती.
 
मीही हेलकॉप्टर उडवू शकते, तर मीही अंतराळात जाऊ शकते असा विचार आला आणि ती चक्रं त्यांच्या मनात फिरू लागली. त्यांनी चौकशी केली आणि अखेर नासामध्ये अर्ज केला.
अर्ज फेटाळला गेला. पण सुनिता मागे हटणार नव्हत्या. त्यांनी 1993 मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंग मॅनेजमेंटमध्ये मास्टर्ससाठी प्रवेश घेतला. 1995 मध्ये पदवी पूर्ण केली. नंतर आणखी तयारी करत 1997 मध्ये त्यांनी पुन्हा नासासाठी अर्ज केला.
 
दुसऱ्या प्रयत्नात 1998 मध्ये नासानं त्यांचा अर्ज स्वीकारला. ट्रेनी अ‍ॅस्ट्रॉनॉट म्हणून त्यांची निवड झाली आणि नवं स्वप्न जगण्यासाठी त्या ह्युस्टनला निघाल्या.
 
इंजिनीअर, नेव्हीत डायव्हर, हेलिकॉप्टर पायलट, टेस्ट पायलट यानंतर आता खऱ्या अर्थानं नव्या क्षितिजाकडं झेप घेण्यासाठीच्या त्यांच्या स्वप्नवत प्रवासाची ही सुरुवात होती.
 
पहिल्या मोहिमेची आतुरता अन् कल्पनाची एक्झिट
नासामध्ये निवड झाल्यानंतर ऑगस्ट 1998 मध्ये सुनिता यांचं प्रशिक्षण सुरू झालं. त्यावेळी अंतराळात विविध प्रयोगांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र स्थापन करण्याचं काम सुरू होतं. हा इतिहास सुनिता यांनी स्वतः अनुभवला.
 
अंतराळ मोहिमांवर गेलेल्या अनेकांबरोबर त्यांचं खडतर प्रशिक्षण झालं. टेस्ट पायलट असल्यानं फ्लाईट इंजिनीअर म्हणून पहिल्या अंतराळ मोहिमेवर जाण्याची वाट त्या पाहत होत्या.
 
2002 मध्ये त्यांना पहिल्यांदा मोहिमेसाठी निवडण्यात आलं. पण नंतर एक अत्यंत वाईट घटना घडली आणि सगळंकाही बदलून गेलं.
आंतराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर 16 दिवस घालवल्यानंतर 16 जानेवारी 2003 रोजी कल्पना चावला सहा सहकाऱ्यांसह पृथ्वीवर परतत होते. त्याचवेळी एसएस कोलंबिया यानानं पेट घेत अपघात झाला आणि त्यात सर्वांबरोबर कल्पना यांचाही अंत झाला.
 
या अपघातात अंत झालेले सगळे सुनिता यांचे मित्र होते. नासामध्ये कल्पना सुनिता यांच्या सिनिअर होत्या, त्यांची चांगली मैत्रीही होती. अंतराळाबरोबरच मी जीवनाबद्दलही कल्पनाकडून बरंच काही शिकले होते, असं सुनिता सांगतात.
 
कल्पना यांच्या अपघाती निधनानंतर जेव्हा सुनिता भारतात आल्या होत्या, त्यावेळी त्या कल्पना यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठीही गेल्या होत्या. कल्पनाचं कुटुंब माझ्या कुटुंबासारखं आहे, असं सुनिता यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
अखेर तो क्षण आला
कोलंबिया यानाच्या अपघातानंतर नासानं अंतराळ मोहिमा काही काळ स्थगित केल्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचं कामही थांबलं. त्यामुळे सुनिता यांना ठरलेल्या वेळी अंतराळ मोहिमेवर जाता आलं नाही.
 
पण 2005 मध्ये पुन्हा मोहिमा सुरू झाल्या आणि सुनिता 2006 मध्ये मोहिमेवर जाणार असं ठरलं. पाहता पाहता तो दिवसही उजाडला.
 
सुनिता यांच्या पहिल्या मोहिमेच्या लाँचसाठी त्यांचे पती, आई-वडील, बहीण सगळे आलेले होते. 9 डिसेंबर 2006 चा तो दिवस होता. मोहिमेपूर्वी अंतराळवीरांना विलगीकरणात ठेवलं जातं. त्यामुळं सुनिता कुटुंबीयांना भेटू शकल्या नाही.
 
ढगाळ वातावरणामुळे लाँच एक दिवस पुढं ढकलण्यात आलं आणि त्यानंतर जे घडलं तो इतिहास होता. 14 जणांचा समावेश असलेल्या पथकासह सुनिता अंतराळात झेपावल्या होत्या. त्यांच्या पहिल्या अंतराळ प्रवासावर.
जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळाच्या या मोहिमेचा अनुभव सुनिता यांच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय होता, असं सुनिता यांनी अनेक व्यासपीठांवर सांगितलं आहे.
 
पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात गेल्यानंतर गुरुत्वाकर्षणातील फरकामुळे तरंगण्यात सुनिता यांना अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा त्या कशाला तरी धडकत होत्या. या सर्व आठवणी आणि अनुभव सुनिता यांनी ब्लॉगद्वारे सांगितल्या आहेत. सुनिता यांचे अंतराळातले अनेक व्हिडिओही नासाच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत.
 
त्यानंतर 2012 मध्ये सुनिता विल्यम्स पन्हा एकदा दीर्घ अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या. 14 जुलै 2014 ते 18 नोव्हंबर 2012 दरम्यानचा काळ त्या अंतराळात होत्या.
 
अंतराळात सोबत नेले समोसे
सुनिता बॉस्टन मॅरेथॉनसाठी पात्र झाल्या होत्या. या शर्यतीसाठी पात्र होणं ही मोठी अभिमानास्पद बाब असल्यामुळं सुनिता यांनी अंतराळातून यात भाग घ्यायचं ठरवलं. 23 हजार स्पर्धकांबरोबरच अंतराळातून त्यांनी ट्रेडमिलवर धावायला सुरुवात केली. 42.2 किमी अंतराची ही शर्यत सुनिता यांनी 4 तास 24 मिनिटांत पूर्ण केलं.
 
ISS मध्ये अ‍ॅस्ट्रॉनॉट्सनी काही प्रयोगही केले. त्यात एक प्रयोग झाडं उगवण्याचा होता. त्यांनी पेरलेलं सोयाबीन यशस्वीपणे उगवल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला होता.
 
प्रसिद्ध सेलब्रिटी टॉक शो होस्ट मार्था स्टिवर्ट यांच्या शोसाठी सुनिता यांनी थेट अंतराळातून इंटरव्ह्यू देखील दिला होता.
सारा नावाच्या विद्यार्थिनींनं सुनिता यांना अंतराळातून पृथ्वीकडं पाहिल्यानंतर कसं वाटतं असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना सुनिता यांनी पृथ्वीवरील खंड आणि देशांचं वर्णन केलं होतं.
भारताबद्दल बोलताना त्यांनी भारत आणि पूर्वेकडील भागाचं वर्णन करताना वरून हा भाग रहस्यमय किंवा गूढ वाटतो असं म्हटलं होतं. पण वरून पाहताना कोणत्याही सीमा दिसत नाही आपण सगळे एक असल्याची भावना निर्माण होते, असं सुनिता म्हणाल्या होत्या.
 
सुनिता अंतराळात जाताना सोबत समोसा आणि भगवत गीता घेऊन गेल्या होत्या, त्याचीही खूप चर्चा झाली होती.
त्याबाबत बोलताना सुनिता म्हणाल्या होत्या की, "मी सोबत नेण्याचं कारण म्हणजे,त्या गोष्टी माझ्यासाठी खास होत्या. माझ्या वडिलांना मला दिलेली ती भेट होती. मीही इतरांसारखीच आहे, हे त्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो," असं सुनिता म्हणाल्या होत्या.
 
अभिमानास्पद कामगिरी
सुनिता यांनी आतापर्यंत मिळवलेल्या यशात त्यांनी अनेक प्रकारे अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
हवाई उड्डाणाचा विचार करता सुनिता यांना जवळपास 3000 तासांपेक्षा जास्त उड्डाणांचा अनुभव नासात अंतराळवीर म्हणून काम करण्यापूर्वीच होता. त्यांनी 30 वेगवेगळ्या एअरक्राफ्टचं उड्डाण केलं आहे.
अंतराळ मोहिमांतील त्यांची कामगिरी पाहता, सर्वाधिक स्पेसवॉक करणाऱ्या महिलांच्या यादीत त्या दुसऱ्या स्थानी आहेत. पेगी व्हिटसन या पहिल्या क्रमांकावर आहेत.
यापूर्वी सुनिता विल्यम्स यांनी दोन अंतराळ मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यात त्यांनी एकूण 50 तास आणि 40 मिनिटांचा स्पेसवॉक केला आहे.
 
सध्या त्या तिसऱ्या अंतराळ मोहिमेवर आहेत.
 
सुनिता विल्यम्स यांनी 9 दिवसांत तीन स्पेसवॉक करत एक अनोखी कामगिरी केली होती. 2007 मध्ये 31 जानेवारी 4 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारीला त्यांनी हे स्पेसवॉक केले होते.
 
तर दिवसांचा विचार करता या दोन मोहिमांमध्ये सुनिता विल्यम्स यांनी एकूण 322 दिवस अंतराळामध्ये घालवले आहेत.
 
बॉस्टन मॅराथॉनशी खास नातं
सुनिता विल्यम्स यांचं जगातील सर्वांत जुन्या मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक असलेल्या बॉस्टन मॅरेथॉनशी खास नातं राहिलं आहे. सुनिता किशोरवयात असताना त्यांनी एकदिवस अचानक आईला त्यांना बॉस्टन मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचं असं सांगितलं.मॅरेथॉन त्याचदिवशी 45 मिनिटांनंतर सुरू होणार होती.
सुनिता यांची तशी काही तयारीही नव्हती. पण तरीही सुनिता यांच्या आई बोनी यांनी सुनिताला प्रोत्साहन दिलं. घरापासून स्पर्धेचं ठिकाण 30 मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यांनी लगेचच सुनिता यांना तिथं नेलं.
 
ही मॅरेथॉन 26 मैल अंतराची होती. सुनिता ती कशी पूर्ण करणार याची चिंता त्यांच्या आईला होती. त्यामुळं अर्ध्या अंतरावर गाडी घेऊन त्या सुनिता यांचा वाटत पाहत होत्या.
सुनिता या अर्धं अंतर पार करून त्यांच्याजवळ आल्या. पण त्यांनी त्यांचे शूज काढून आईला दिले. शूजमुळं त्यांना त्रास होत होता. असं सांगत अनवानी पायांनी त्यांनी उरलेली अर्धी मॅरेथॉन पूर्ण केली. अशा प्रकारची जिद्द त्यांच्या लहान वयापासून पाहायला मिळाली.
 
त्यांचं मॅरेथॉनसाठीचं हे प्रेम अंतराळातही पाहायला मिळालं. 2007 च्या बॉस्टर मॅरेथॉनसाठी त्या पात्र ठरल्या होत्या. पण त्यावेळी त्या अंतराळ मोहिमेवर होत्या. तसं असलं तरी सुनिता यांना मॅरेथॉन सोडायची नव्हती.
 
अंतराळातून त्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या. समोर मॅरेथॉनचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहत, ट्रेडमिलवर धावत त्यांनी 26 मैल अंतराची ही मॅरेथॉन साडेतीन तासांत पूर्ण केली.
जीवनात फिटनेसचं महत्त्वं सांगण्यासाठी त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
 
मित्रामध्येच मिळाला साथीदार
करिअरच्या दृष्टीनं बरंच काही घडत असताना सुनिता यांच्या खासगी जीवनातही नवे रंग भरायला सुरुवात झाली होती.
नेव्हल अ‍ॅकेडमीत असताना त्यांच्या बॅचमध्ये मायकल विल्यम्स नावाचा मित्र होता. पण शिक्षणानंतर त्यांचा एकमेकांशी संपर्क नव्हता. नंतर एका मित्राच्या लग्नात त्यांची परत भेट झाली आणि नंतर भेटी वाढत गेल्या.
त्यांच्या भेटींचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोन वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फ्लाइट स्कूलमधलं प्रशिक्षण पूर्ण होत असताना, त्यांनी लग्न केलं.
अमेरिका, युरोप आणि भारतातील मित्र नातेवाईंच्या उपस्थितीत त्यांचा विवाह झाला होता.
सध्या तिसऱ्यांदा अंतराळात मोहिमेवर गेलेल्या सुनिता या काही तांत्रिक अडचणीमुळं त्याठिकाणी अडकलेल्या आहेत.
 
सुनिता विल्यम्स यांनी काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी बोलताना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला होता. तो म्हणजे, " एका गोष्टीत अडकून राहू नका. अपयश आलं तरी तेही गरजेचं असतं. त्यामुळे कायम दुसरा पर्याय स्वीकारण्याची तयारी ठेवा. कारण मी ते केलं नसतं तर आज इथपर्यंत पोहोचू शकले नसते."
सुनिता यांनी दिलेल्या या सल्ल्याला त्यांच्या स्वानुभवाची जोड आहे हे सर्वात महत्त्वाचं.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती