म्यानमारमध्ये एकामागून एक दोन तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी झालेल्या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोक घाबरून घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पडले. पहिला भूकंप सकाळी 11:50 वाजता झाला, त्याची तीव्रता 7.2 इतकी होती. यानंतर, दुसरा भूकंप दुपारी 12:02 वाजता आला, त्याची तीव्रता 7 इतकी होती.
भूकंपाचे धक्के थायलंडपर्यंत जाणवले. त्याचा सर्वाधिक परिणाम बँकॉकमध्ये दिसून आला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 आणि 7.0 होती. दोन्ही भूकंपांचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होते. काही अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की म्यानमारमध्ये अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली: पोलिस
बँकॉक पोलिसांनी सांगितले की, दुपारी थायलंडची राजधानीत झालेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपात बांधकाम सुरू असलेली एक उंच इमारत कोसळली. संभाव्य मृतांची संख्या अद्याप माहित नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना बँकॉकच्या लोकप्रिय चतुचक मार्केटजवळ घडली. कोसळण्याच्या वेळी घटनास्थळी किती कामगार होते याची तात्काळ माहिती मिळू शकली नाही.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, बँकॉकमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर कोलकाता आणि इम्फाळमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदू मध्य म्यानमारमध्ये होते, जे मोनीवा शहरापासून सुमारे 50 किलोमीटर पूर्वेस होते. तथापि, अद्याप कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही.